मोडक, बाळाजी प्रभाकर : ( २२ मार्च, १८४७ – २ डिसेंबर, १९०६ )

बाळाजी प्रभाकर मोडक यांचा जन्म दक्षिण कोकणातील आचरे येथे झाला. त्यांचे शिक्षण सांगली, बेळगाव व पुण्याच्या डेक्कन कॉलेजात झाले. सांगलीत दादा छापखाने या शिक्षकांमुळे त्यांना गणिताची गोडी लागून त्यांच्या पुढील विज्ञान शिक्षणाचा पाया घातला गेला. प्रथम ते राजाराम हायस्कूल, कोल्हापूर येथे सहाय्यक शिक्षक, तर लगेच एका वर्षामध्ये राजाराम कॉलेजमध्ये भौतिकशास्त्राचे प्राध्यापक झाले. त्यांनी मुंबई इलाख्याच्या गॅझेटमधील कोल्हापूर विषयक खंडाचे मराठी भाषांतर केले. डॉ. सेठना व डॉ. के. आर. कीर्तिकर यांच्या मदतीने त्यांनी कोल्हापूरच्या शिक्षण खात्यात सुधारणा सुचविणारा अहवाल तयार केला. मोडकांच्या शिफारसीने कोल्हापूरात औद्योगिक वस्तुसंग्रहालयाची स्थापना झाली. कोल्हापूरातील नेटिव्ह जनरल लायब्ररीच्या (आताचे करवीर नगर वाचन मंदिर) विकासात व सदर्न मराठा बेन्केच्या पुनरुज्जीवनात मोडकांचा सिंहाचा वाटा होता. मोडकांनी इतिहास, भूगोल, विज्ञान, बँकिंग इत्यादी विषयांवर सुमारे ४३ (३८ प्रकाशित व ५ अप्रकाशित) मराठी पुस्तके लिहिली व भाषांतरीत केली.

राजाराम हायस्कूलमधून एका शैक्षणिक प्रकल्पासाठी, पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सॅम्युअल कुक यांच्याकडे, रसायनशास्त्राचे सैद्धान्तिक व प्रात्यक्षिक शिक्षण घेतल्यावर, मोडकांनी दिलेल्या जाहीर सप्रयोग व्याख्यान मालेतून त्यांचे पहिले वैज्ञानिक पुस्तक रसायनशास्त्रपूर्वार्ध  प्रसिद्ध झाले. चित्र, प्रयोग आणि दैनंदिन घटनांद्वारे वैज्ञानिक सिद्धांत समजावणाऱ्या, सोप्या भाषेतील मोडकांच्या पुस्तकाचे, विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी व विविध ज्ञानविस्तारकार भाईसाहेब गुप्त्यांनी कौतुक केले. भावी काळात विज्ञान शिक्षण मराठीतून सुरू झाल्यास, पाठयपुस्तके उपलब्ध असावीत, म्हणून मोडकांनी विज्ञानावर २६ पुस्तके मराठीत लिहिली. यंत्रशास्त्र, निरिंद्रीय व सेंद्रीय रसायनशास्त्र, शेतकी, प्राणीशास्त्र, खनिज, वनस्पतीजन्य व प्राणीजन्य पदार्थ, आरोग्यशास्त्र, उष्णता, विद्युत, चुंबकत्त्व, ध्वनी व प्रकाश इत्यादी विज्ञानशाखांमधील अत्याधुनिक संशोधन मराठीत आणणारे मोडक पहिलेच लेखक होत. भारतीय रंग व्यवसायाच्या पुनरुज्जीवनासाठी मोडकांनी शिल्पकलाविज्ञान या मासिकांत आधुनिक पाश्चिमात्य रंगनिर्मिती व तंत्रज्ञांनाविषयी लेख लिहिले. त्यांच्या वैज्ञानिक पुस्तकांतील परिशिष्टात, स्वतः नव्याने तयार केलेली जी परिभाषा, इंग्रजी प्रतिशब्दासह मोडक देत, तिचा समावेश नंतरच्या विज्ञान वाङमयात व हल्लीच्या मराठी विज्ञान पाठ्यपुस्तकात झालेला आढळतो. लोकाश्रय व राजाश्रय असो वा नसो, मोडकांची शास्त्रीय पुस्तके कमी किंमतीत निघतच राहिली. भारतीय संस्थानिक, सरकार व खाजगी संस्थांनी विज्ञान प्रसार, शिक्षण व संशोधनाच्या चळवळीस आर्थिक सहा़य्य करावे अशी शिफारस मोडकांनी केली. विज्ञान बुद्धीप्रामाण्यावर व प्रत्यक्ष अनुभवावर आधारलेले असल्यामुळे, शिक्षणात विज्ञानाचे स्थान उंचावल्यास, भारतीयांच्या अंधश्रद्धा नष्ट होतील असे मोडकांना वाटे.

मोडकांनी राजाराम कॉलेजात असताना कोल्हापूर सरकारच्या आर्थिक मदतीने १८८३ ते १८९६ पर्यंत, दरवर्षी नाताळच्या सुट्टीत भरविलेल्या विज्ञान प्रदर्शनांचा वृत्तांत ‘शिल्पकला विज्ञान’ व ‘करमणूक’ ह्या मासिकांत छापून आलेला आढळतो. यात मोडकांचे विद्यार्थी आणि मोडकांकडून प्रशिक्षण घेतलेली काही अशिक्षित मंडळी, प्रेक्षकांना प्रयोग दाखवून त्या मागील वैज्ञानिक सिद्धांत समजावून सांगत. क्ष-किरणयंत्र, कॅमेरा, वायुभारमापक, उष्णतामापक, सूक्ष्मदर्शक, फॅरेडेचे भेंडोळे, तारायंत्र, फोनोग्राफ, पाणचक्की, स्वयंचलित वाहन, शस्त्रक्रिया व अभियांत्रिकी उपकरणे, कॅलिडोस्कोप यासारखी उपकरणे मोडक प्रदर्शनात मांडीत. मोडकांनी प्रदर्शनात मांडलेल्या विजेच्या दिव्यांमुळे दक्षिण महाराष्ट्रात विजेचे दिवे आले. १५-१६ हजार प्रेक्षक खेचून, सुनियोजितपणे वार्षिक विज्ञान प्रदर्शने आयोजित करणारे, १९ व्या शतकात भारतात मोडकांखेरीज कोणी आढळत नाही. मोडकांचे विद्यार्थी व शाहू छत्रपतींचे जनक वडील आबासाहेब कागलकर, मोडकांना खर्चिक प्रयोग सामग्री आणून देत. मोडकांचे शिष्य असलेले मिरजचे संस्थानिक बाळासाहेब मिरजकर (खरे नाव गंगाधर पटवर्धन) यांनी, मोडकांच्या प्रेरणेने शास्त्रीय पुस्तके लिहिली आणि मिरजमध्ये ‘गणेश कलागृह’ ही सुसज्ज प्रयोगशाळा उभारली.

सन १८९२ ते १८९५ या काळात मोडकांनी कोल्हापूर संस्थान व त्यांच्या मांडलीक संस्थानांची औद्योगिक पहाणी केली. उद्योगधंदे, कारागीर व शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी, मोडकांनी मोफत धंदे शिक्षण, सक्तीचे प्राथमिक शिक्षण व आधुनिक तंत्रज्ञानाचा हिरीरीने पुरस्कार केला. खनिज संपत्ती, जंगले, धंद्यास उपयुक्त वनस्पती, कारागिरांची स्थिती व ग्रामीण कर्जबाजारीपणा या विषयी भारतीयांच्या दृष्टिकोनातून शिफारसी करणाऱ्या आणि सर्व उद्योगधंदे व शेतीचा एकत्रितपणे, गावोगावी फिरुन, खानेसुमारी पद्धतीने केलेल्या व भारतीय डोक्याने आखून नियोजित केलेल्या हया भारतातील पहिल्या औद्योगिक पहाणीसाठी, मोडकांना पारितोषिक देण्याची सूचना लोकमान्य टिळकांनी केली होती.

मोडकांचा कोल्हापूरच्या स्वदेशी वस्तूंच्या विक्रेत्यांशी व तळेगावच्या वि. गो. विजापूरकरांच्या समर्थ विद्यालयाशी जवळचा संबंध होता. भारतीय भाषांमधून सार्वत्रिक विज्ञान शिक्षण दिल्याशिवाय, देशी उद्योगधंदे स्वावलंबी होउन, स्वदेशी चळवळ मूळ धरु शकणार नाही असे मोडकांना वाटे. भारतीय कारागीरांना धंद्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणासाठी परदेशी पाठवावे, व त्यासाठी शाळा कॉलेजात भारतीय भाषांबरोबरच इंग्रजीतीलही शास्त्रीय परिभाषा शिकवावी असे मोडकांचे म्हणणे होते.

संदर्भ :

  • Dhumatkar, Abhidha; ‘Balaji Prabhakar Modak and Spread of Science In Maharashtra In The 19th’ (An unpublished M. Phil, Dissertation), University of Mumbai, 1998.
  • Dhumatkar, Abhidha ‘Forgotten Propagator of Science Kolhapur’s Balaji Prabhakar Modak’, Economic & Political weekly, Nov 30, 2002 PP 4807 –4816.
  • Dhumatkar, Abhidha; ‘Balaji Prabhakar Modak – A Nineteenth Century Science Propagator in Maharashtra’, Indian Journal of History of Science, September 2004 Vol. 39, No.3 ISSN 0019 – 5235 PP 307-334.

समीक्षक : अ.पां. देशपांडे