आतियाह, एम. एफ. : ( २२ एप्रिल, १९२९ – ११ जानेवारी, २०१९ )
मायकेल फ्रान्सिस आतियाह हे भूमितिमध्ये विशेष प्राविण्य असलेले इंग्रज गणिती होते. त्यांना संस्थिती (Topology) आणि बैजिक भूमितिमध्ये विशेष रस होता. त्यांनी के-सिद्धांत, जे-गट (J-group), निर्देशांकाचा सिद्धांत, प्रमापन (Gauge) सिद्धांत यावर प्रकर्षाने संशोधन केले.
आतियाह यांचा जन्म लंडनमधील हॅम्पस्टेड (Hampsted) येथे झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी महाविद्यालयात झाले. तेथूनच त्यांना ‘Some Applications of Topological Methods in Algebraic Geometry’ या प्रबंधावर डॉक्टरेट पदवी मिळाली. नंतर ते तेथेच सहसंशोधक व सहाय्यक प्राध्यापक होते. त्यानंतर ते केंब्रिज येथील पेम्ब्रॉक (Pembroke) महाविद्यालयात विद्यापीठीय अध्यापक व सहमार्गदर्शक म्हणून कार्यरत होते. नंतर ते ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रपाठक व सहप्राध्यापक झाले आणि १९६३-६९ मध्ये ऑक्सफर्ड येथील न्यू कॉलेजमध्ये भूमितीचे प्राध्यापक झाले. नंतर ३ वर्षे अमेरिकेतील प्रिन्स्टन (Princeton) येथील प्रगत अभ्यासाच्या संस्थेत (Institute for Advanced Study) प्राध्यापक म्हणून कार्य करून पुन्हा ऑक्सफर्ड येथील सेंट कॅथेरीन महाविद्यालयात (St.Catherine’s College) संशोधक-प्राध्यापक म्हणून रुजू झाले. १९९७ ते २०१९ म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत ते एडिनबर्ग विद्यापीठात (University of Edinburgh) मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.
आतियाह यांनी अनेक गणितज्ञांसोबत विविध विषयांवर विपुल संशोधन आणि लेखन केले. त्यांचे समग्र साहित्य सात खंडांत प्रसिद्ध झाले आहे.
आतियाह व फ्रेडरीच हिझब्रुंक (Friedrich Hirzebrunch) यांनी संस्थितीजन्य (Topological) के-सिद्धांत शोधून काढला. त्यात शून्याव्या के-गटाबद्दल चर्चा होती. परंतु लवकरच ते सर्व कोटीच्या (degree) के-गटासाठी विस्तारीत केले गेले. अँडम (Adam) बरोबर काम करून विषम अविभाज्य संख्येवरील परिणामही त्यांनी सिद्ध केले. एक सदिश संभार (Vector Bundle) हा अनेक अविघटनीय (indecomposable) सदिश संभारांची बेरीज असते, असे दाखवून आतियाह यांनी विवृत्ती वक्रावरील (elliptic curve) सदिश संभाराचे वर्गीकरण केले. वर्तुळावरील पहिल्या श्रेणीचा सदिश संभार दाखवणारी एक फिरवलेली कागदाची पट्टी म्हणजेच मोबियस बॅण्ड (Mobius band) हे सदिश संभाराचे सर्वात सोपे उदाहरण आहे. के-सिद्धांत हा या उदाहरणाच्या वरच्या श्रेणीतील उदाहरणावर काम करण्याचे एक साधन आहे. आतियाह यांच्या के-सिद्धांतावरील कामाचा बॉट-आवर्तनाचे (Bott Periodicity) प्रमेय हा मध्यवर्ती विषय होता.
आतियाह-सिंगर निर्देशांक प्रमेय हे एक महत्त्वपूर्ण योगदान त्यांच्या नावावर आहे. त्यात एखाद्या विकलन परिकर्मीचा निर्देशांक संस्थितीय अविकार (Topological invariant) काढण्याचे साधे व सोपे सूत्र विकसित केले आहे. तसेच आतियाह, बॉट आणि पतोडी यांनी उष्णतेचे प्रमेय वापरून निर्देशांक प्रमेयाची नवीन सिद्धता दिली.
प्रमापन (Gauge) सिद्धांत आणि त्यासंबंधित विषयावरही आतियाह यांचे बरेच शोधलेख प्रकाशित झाले आहेत. प्रमापन सिद्धांतात विशिष्ट अरेषीय आंशिक विकलक समीकरण (Nonlinear Partial Differential Equation) सोडविण्याच्या काही पद्धती त्यांनी विकसित केल्या.
आतियाह यांची उल्लेखनीय पुस्तके अशी आहेत : K-Theory, Introduction to commutative Algebra, Vector field on manifolds, Geometry on Yang-Mill’s fields, Geometry and dynamics of magnetic manifolds, Geometry and Physics of knots.
ते लंडनच्या गणित सोसायटीचे अध्यक्ष होते. केंब्रिज येथे आयझॅक न्यूटन इंस्टिटयूट फॉर मॅथेमेटीकल सायन्सेस ही संस्था स्थापन करण्यात आतियाह यांनी पुढाकार घेतला आणि त्या संस्थेचे ते पहिले संचालक होते. ते रॉयल सोसायटीचे अध्यक्ष होते. ते विज्ञान आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीवरील पग्वाश (Pugwash) परिषदेचे अध्यक्ष होते. आंतरराष्ट्रीय समस्यांसाठी आंतर-अकादमी मंडळ बनवण्यात तसेच यूरोपियन अकादमीची संघटना आणि यूरोपियन गणित मंडळ यांची पायाभरणी करण्यात त्यांचे मोठे योगदान होते.
त्यांना के-सिद्धांताचा विकास आणि आतियाह-सिंगर प्रमेयासाठी गणितातील सर्वोच्च मानाचे फिल्डस पदक, रॉयल सोसायटीचे रॉयल पदक, लंडन गणित संस्थेचे डी मॉर्गन (DeMorgan) पदक, विज्ञानासाठी राजा फैजल हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार, रॉयल सोसायटीचे कोप्ले (Copley) पदक, अमेरिकन तत्त्वज्ञान सोसायटीचे बेंजामिन फ्रँकलिन पदक, भारतीय राष्ट्रीय सायन्स अकादमीचे जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पदक आणि गणितातील जीवनगौरव असे आबेल पारितोषिक (विभागून) असे अनेक पुरस्कार व सन्मान मिळाले.
जगातील ३२ हून अधिक देशांतील विद्यापीठांकडून आतियाह यांना सन्माननीय पदव्या प्रदान केल्या गेल्या आहेत. राष्ट्रीय विज्ञान अकादमीचा परदेशी सदस्य म्हणून ते अमेरिका, फ्रांस, स्वीडन, भारत अशा अनेक देशांत निवडले गेले होते.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून डॉक्टरेट मिळवलेल्या उल्लेखनीय विद्यार्थ्यांत सायमन डोनाल्डसन (Simon Donaldson), के. डेव्हिड एलवर्दी (K. David Elworthy), नायजेल हितचिन (Nigel Hitchin), लिसा जेफरे (Lisa Jefferey), फ्रान्सिस कोवेन (Francis Kowen) यांचा समावेश आहे.
आतियाह यांचे ८९ व्या वर्षी निधन झाले. त्याच्या काही महिने आधी त्यांनी रिमान परिकल्पना (Riemann Hypothesis) या गणितातील प्रदीर्घ काळ अनुत्तरित असलेल्या प्रश्नाची त्यांच्या मते सोपी सिद्धता मांडली होती, मात्र ती मान्य झाली नाही.
संदर्भ :
समीक्षक : विवेक पाटकर