जॉई, डॉमिनिक डेव्हिड : (८ एप्रिल, १९६८ )

डॉमिनिक जॉईस यांचे पदवीपूर्व आणि पीएच.डी.चे शिक्षण मेर्टन महाविद्यालय, ऑक्सफर्ड येथे झाले. त्यांनी सिमॉन डोनाल्डसन (Simon Donaldson) यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरेट मिळवली. Hyper Complex and Quaternionic Manifolds and Scalar Curvature on Connected Sums हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. जॉईस यांचे अध्ययन, अध्यापन, संशोधन बहुतांशी ब्रिटनमध्ये झाले असले तरी अमेरिकेतील प्रिन्स्टन आणि बर्कले विद्यापीठांमध्येही संशोधनात त्यांनी काही काळ व्यतीत केला.

जॉईस यांच्या संशोधनाची मुख्य शाखा विकलक भूमिती ही असली तरी बैजिक भूमिती, आंतरगुणनरक्षी भूमिती आणि साधित भूमिती या भूमितीच्या अन्य शाखांमध्येही रस निर्माण झाल्याने त्यांनी आपल्या संशोधनाचे क्षेत्र विस्तारले. त्यांचे संशोधन प्रामुख्याने Holonomy Groups या नावाने ओळखल्या जाणाऱ्या काही अतिविशिष्ट भौमितिक संरचनांसंबंधी आहे. या संरचनांची उदाहरणे तयार करणे आणि त्यांचे गुणधर्म अभ्यासणे यात त्यांना विशेष रुची आहे. जॉईस यांचे विशेष प्रशंसा मिळालेले संशोधन समष्टी (Manifolds) विषयी आहे. समष्टी  म्हणजे विशिष्ट मितीचा वक्र अवकाश (curved space of some dimension). जॉईस मॅनिफोल्डस (Joyce Manifolds – Manifolds with G2 Holonomy) या नावाने त्यांचे संशोधन विख्यात आहे. त्यांनी The exceptional Holonomy Groups G2 and Spin(7) या दोन असाधारण भौमितिक संरचनांवर पुष्कळ काम केले. हे संशोधन सैद्धांतिक भौतिकशास्त्राच्या रज्जु किंवा मालिका सिद्धांत (String Theory) या शाखेत उपयुक्त आहे. नंतर ते कॅलिब्रेटेड भूमिती (Calibrated Geometry) या शाखेकडे वळले. नंतर Lagrangian 3-fold Singularities वरील संशोधन करीत असताना त्यांनी Invariants of Calabi-Yau 3-folds M यांच्या अस्तित्वासंबंधी एक अटकळ मांडली आणि तिच्याबद्दलचे संशोधन सुरू केले.

जॉईस यांची चार पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांपैकी Compact Manifolds with Special Holonomy आणि Riemannian Holonomy Groups and Calibrated Geometry ही त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेली पुस्तके आहेत तर  Calabi-Yau Manifolds and Related Geometries आणि A Theory of Generalized Donaldson-Thomas Invariants या दोन पुस्तकांचे ते सहलेखक आहेत, याशिवाय त्यांचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध आहेत.

जॉईस यांची गणितातील उच्च प्रतीची क्षमता तरुण वयातच दिसून आली. त्यांना वयाच्या एकोणतिसाव्या वर्षीच लंडन मॅथेमॅटिकल सोसायटीचे ज्युनिअर व्हाईटहेड पारितोषिक (Whitehead Prize) विभागून मिळाले आणि पस्तिसाव्या वर्षी यूरोपिअन मॅथेमॅटिकल सोसायटीचे युवा गणितज्ञाला दिले जाणारे पारितोषिकही मिळाले. लगेच वर्षभरात केम्ब्रिज विद्यापीठाकडून ब्रिटिश गणितज्ञाला दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या ॲडम्स पुरस्काराचे (Adams Prize) ते मानकरी ठरले. सन २०१२ मध्ये ते रॉयल सोसायटीचे सदस्य झाले.

संदर्भ :

समीक्षक : विवेक पाटकर