पुरुषोत्तम पाटील : (०३ मार्च १९२८-१६ जानेवारी २०१७). मराठी साहित्यातील ख्यातनाम कवी आणि संपादक. पुरुषोत्तम पाटील यांचे मूळ गाव ढेकू (ता.अमळनेर, जि.जळगाव ).त्यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील बहादरपूर (ता.पारोळा) या मामाच्या गावी झाला. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. त्यांचे मराठी सातवीपर्यंत शिक्षण बहादरपूरला झाले. त्यानंतर ते अमळनेरच्या प्रताप हायस्कूलमधून मॅट्रीकची (१९४६) आणि त्यानंतर प्रताप महाविद्यालयातून इंटरची (१९४९) परीक्षा उत्तीर्ण झाले. याच काळात ते कविता लिहू लागले. इंटरनंतर पुढील शिक्षणासाठी ते पुण्याला आले.फर्गसन महाविद्यालयात त्यांनतर त्यांनी प्रवेश घेतला.

फर्गसनमधील साहित्य सहकार या वाङमयीन मंडळाचे चिटणीस म्हणून काम करताना पुण्यातील वाङमयीन वातावरणाशी त्यांचा परिचय होत गेला. वाङमयीन चर्चा-चिकित्सा करण्याची सवय त्यांना लागली. या  समृद्ध वाङमयीन पर्यावरणाचा त्यांच्या काव्यलेखानाला फायदाच झाला. त्यांच्या कविता सत्यकथा या वाङमयीन नियतकालिकातून प्रकाशित होऊ लागल्या.एक नवोदित कवी म्हणून त्यांची ओळख निर्माण होऊ लागली.मात्र कवितेत रमल्यामुळे शैक्षणिक अपयशाला त्यांना सामोरे जावे लागले.त्यातून सावरण्यासाठी कवी बा.भ.बोरकर यांचा मोठा आधार त्यांना मिळाला.१९४८ ते १९५२ या काळात बोरकरांचे लेखनिक व सचिव म्हणून त्यांनी काम केले.बोरकरांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा सहवास त्यांना लाभला.

शिक्षण सुरु असतानाच १९५३ साली मुंबईला दैनिक नवशक्ती मध्ये संपादक प्रभाकर पाध्ये यांच्या हाताखाली उपसंपादक म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली.मात्र दैनिकाच्या रुक्ष आणि साचेबंद कामात त्यांचे मन रमले नाही.ती नोकरी सोडून बहादरपूरच्या रा.का.मिश्र विद्यालयात उपशिक्षकाची नोकरी त्यांनी स्वीकारली.दरम्यानच्या काळात १९५४ साली ते बी.ए.झाले.शिक्षकाची नोकरी टिकवायची असेल तर बी.टी.ही पदवी प्राप्त करणे क्रमप्राप्त होते.त्यासाठी त्यांनी कोल्हापूरच्या एम.ए.टीचर्स ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि बी.टी.ही पदवी प्राप्त केली (१९५५).त्यानंतर एम.ए.ची पदवीही त्यांनी प्राप्त केली (१९५८).पुढे जळगाव जिल्ह्यातील चिंचोली,हातेड येथील विद्यालयामध्ये मुख्याध्यापक म्हणून त्यांनी नोकरी केली (१९५९-१९६१). धुळे येथील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून १९६१ साली ते रुजू झाले आणि याच महाविद्यालयातून १९८८ साली ते सेवानिवृत्त झाले.मधल्या काळात (१९७४-१९७६) दोंडाईचा जि.धुळे येथील नवीन महाविद्यालयात प्राचार्यपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली.

१९४७-४८ पासून कविता लिहिणाऱ्या पुरुषोत्तम पाटील यांचा पहिला कवितासंग्रह तळ्यातल्या सावल्या १९७८ मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर परिदान हा त्यांचा दुसरा संग्रह १९९८ मध्ये आला. संख्यात्मक दृष्ट्या अत्यंत अल्प अशी कविता त्यांनी लिहिली.शिवाय त्यांच्या कवितांचा आकारही लहान चणीचा आहे. अल्पाक्षरत्व,सूचकता आणि अर्थसंपृक्तता यांनी त्यांच्या काव्याविश्वाला पृथगात्मता प्राप्त करून दिली आहे. १९४०-५० च्या दशकातील सौंदर्यात्मक कवितेचा गाढ संस्कार त्यांच्या व्यक्तित्वावर झाला आहे.मुळात ग्रामीण जनजीवनातून घडलेल्या त्यांच्या वृत्तीला, त्यांच्या मुग्ध,सोशिक,भावनाप्रधान पिंडाला सौंदर्यवादी दृष्टी अनुकूल ठरली.त्यांच्या कवितेचा स्वभावधर्म यातून घडत गेला.त्यांच्या कवितांतून प्रामुख्याने दोन मनातील नाजूक भावबंधाचा अत्यंत हळुवार आविष्कार जाणवतो. संयत खानदानी प्रेमभावनेचा ग्रामीण स्तरावरील आविष्कार,स्त्रीपुरुषातील प्रौढ व संयमी अशा अर्थपूर्ण नात्याचा शोध ही त्यांच्या कवितेची प्रधान वैशिष्टे आहेत. शब्द भावना यांचा मितव्यय,शब्दांची चोखंदळ निवड,शब्द घडविण्याची असोशी अशी मराठी कवितेची सौंदर्यवादी परंपरा त्यांच्या कवितेने समृद्ध केली आहे.

आयुष्याच्या उत्तरार्धातील सुमारे चार दशके पुरुषोत्तम पाटील यांनी वाङमयीन नियतकालिकांच्या संपादनासाठी वाहिलेली असल्याचे दिसते. अनुष्टुभ (प्रारंभ १९७७) या नियतकालिकांचे संपादक म्हणून त्यांनी सन १९७८ ते १९८३ अशी साडेपाच वर्ष काम केले.त्यांच्या संपादकीय कारकीर्दीतच अनुष्टुभ हे नियतकालिक मराठी वाङमयीन विश्वात सुस्थापित झाले.त्यानंतर कविता या साहित्यप्रकारासाठी एक स्वतंत्र नियतकालिक असावे असा विचार करून त्यांनी आपल्या वयाच्या ५७ व्या वर्षी कविता-रती हे द्वैमासिक सुरु केले.कविता-रती या नियतकालिकाचा पहिला अंक १९८५ मध्ये प्रकाशित झाला. कविता आणि कवितेची समीक्षा यासाठी कार्यरत राहण्याची आपली भूमिका कविता-रतीच्या विविध अंकांतून त्यांनी सिद्ध केली. तीन दशके एका कविताविषयक नियतकालिकाचे संपादक म्हणून त्यांनी कवी,समीक्षक,वाचक या सर्वांशी साधलेला संवाद महत्वाचा ठरतो. सौंदर्यवादी दृष्टीच्या मर्यादांचे भान बाळगून समकालीन मराठी काव्यसंस्कृतीच्या स्पंदनाचा स्वर ऐकण्याची त्यांची स्वागतशील संपादकीय भूमिका लक्ष वेधून घेणारी ठरली.

पुरुषोत्तम पाटील यांनी दैनिक लोकमत,देशदूत ,केसरी यांतून वाङमयीन व सामाजिक सांस्कृतिक विषयावर सदरलेखनही केले.किंबहुना आयुष्याच्या उत्तरार्धात कविता-रतीच्या संपादनात ते पूर्णपणे गुंतलेले असताना कवितेपेक्षा ललित वैचारिक स्वरूपाचे गद्य त्यांनी सातत्याने लिहिले.समकालीन घटना-घडामोडी यांवर ओघवत्या शैलीत मर्मभेदक भाष्य करणारे तुकारामांची काठी आणि निवडक मराठी कवितांचे मर्म उलगडून दाखविणारे अमृताच्या ओळी ही त्यांची दोन पुस्तके अशा लेखनातून सिद्ध झाली आहेत.

त्यांच्या तळ्यातल्या सावल्या या कवितासंग्रहाला केशवसुत पुरस्कार आणि परिदान या कवितासंग्रहाला बालकवी पुरस्कार असे राज्यशासनाचे मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.महाराष्ट्र शासनाने २००३ साली गौरववृत्ती देऊन त्यांचा सन्मान केला आहे.साहित्य अकादेमीचे मराठी सल्लागार आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ अशा संस्थांचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले आहे.

धुळे येथे अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • पाटील, आशुतोष (संपा),कविता-रती,पुरुषोत्तम पाटील आदरांजली विशेषांक, वर्ष ३३, अंक २, ३, २०१८.