ढाणके, सुखदेव : (१७ ऑगस्ट १९४७). मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवी, मराठी भाषेतील सर्वधारा या नियतकालिकाचे संपादक. त्यांचा जन्म गोकुळसरा (ता. धामणगाव रेल्वे, जि. अमरावती) या गावी मजुरी करून गुजराण करणाऱ्या निरक्षर दलित कुटुंबात झाला. गोकुळसरा हे गाव अमरावती व वर्धा या दोन जिल्ह्यांना विभागणाऱ्या वर्धा नदीकाठी आहे. गावात शाळा नसल्याने सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या दिघी या गावी त्यांचे इयत्ता चौथीपर्यंतचे शिक्षण झाले. पाचवी ते आठवी पर्यंतचे शिक्षण गावापासून १५ कि.मी. अंतरावरील झाडगाव या गावी मोफतच्या निवासी शाळेमध्ये झाले. पुढे हॉयरमॅट्रिक धामणगाव रेल्वे येथे आणि पुढील उच्चशिक्षण अमरावती येथील श्री. शिवाजी कॉलेज आणि विदर्भ महाविद्यालय (विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्था) येथे झाले. आर्थिक स्थिती अत्यंत हालाखीची असतानाही आईवडिलांनी त्यांना शिकवले. एम. ए., बी. एड. एवढे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी आर्वी (जि. वर्धा ) येथील एका शाळेत पाच वर्षे शिक्षकाची नोकरी केली नंतर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील आदर्श महाविद्यालयात १८ वर्षे आणि त्यानंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागात सहा वर्षे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. ३० जून २००६ रोजी ते सेवानिवृत्त झाले.

सुखदेव ढाणके यांनी कविता, कादंबरी या ललित साहित्यप्रकारांसह समीक्षा लेखन आणि संपादनाचे कार्य केले आहे. त्यांचे प्रकाशित साहित्य पुढीलप्रमाणे – कवितासंग्रह :- व्यथाफुली (१९८३), रक्तसेतू (१९९७), हुर्दुक (२००४), पिंडपात (२०१५) कादंबरी:- चेडा (२००१) समीक्षा:- बाबुराव बागूल: व्यक्ती आणि वाङ्मय (२००६)

सुखदेव ढाणके यांची कविता सामान्य माणसाचे व्यथामग्न जगणे शांतपणे सांगणारी कविता आहे. ती अनेक उपेक्षा, अवहेलना, दुःख सोसणाऱ्या तळपातळीवरच्या माणसांच्या अविश्रांत जीवनरीतीची आणि उत्कट जीवनप्रीतीची कविता आहे. न संपणाऱ्या दुःखांशी अदम्य जीवनासक्तीने, खूप सकारात्मक दृष्टीने सदासर्वदा विनातक्रार एकाकी लढणाऱ्या समाजशील पण अभावग्रस्त माणसांची जीवनवृत्ती या कवितेतून अधोरेखित होते. सभोवतीचा अंधार आपल्याला ग्रासून टाकण्याच्या अगोदर प्राणपणाने जळून उजळून निघणाऱ्या सृजनशील आणि विचारशील माणसांची ही साधी कविता आहे. सर्व पातळ्यांवरच्या बेगडीपणाच्या पार्श्वभूमीवर माणसांच्या साधेपणाचे आशयसौंदर्य हे सुखदेव ढाणके यांच्या कवितेचे सामर्थ्य आहे.’मी दारिद्र्याच्या सम्राटांचा वंशज… भुकेकंगालांचा चक्रवर्ती’ अशा शब्दांत कवीने तळपातळीवरील माणसाशी असणारे अनुभवसिद्ध नाते सांगितले आहे. या कवितेतील माणसे व्यथामग्न आहेत, वेदनामयी आयुष्य जगताना, निराश, हताश असतानाही ही माणसे जीवनविन्मुख होत नाहीत उलट ताठ कण्याने, अभंग नीतिमत्तेने, उदंड आत्मविश्वासाने परिस्थितीशी लढत राहतात. हे लढणे जिकिरीचे असले तरी कोणताही अभिनिवेश दर्शवणारे, बेगडी आक्रोश करणारे नाही, तर सत्यकथन करणारे आहे. शेतकऱ्यांच्या न संपणाऱ्या दुःखांशी ही कविता तादात्म्य पावते. दुःखभोगी गावगाडा भाषा आणि लोकसंस्कृतीसह या कवितेतून व्यक्त होत राहतो. दुःखी माणसांच्या दुःखाच्या तऱ्हा जेव्हा कलाकृती होतात तेव्हा त्या दुःखी माणसांचे अश्रू पुसत त्यांना जगण्याचे बळ देतात.

सुखदेव ढाणके यांची कविता दुःखी माणसांच्या दुःखांच्या तऱ्हा सांगणारी आहे. सुखी कुटुंब एक सारखेच असतात, प्रत्येक दुःखी कुटुंबाच्या दुःखांची तऱ्हा निराळी असते, या टॉलस्टॉयच्या विधानाचा प्रत्यय त्यांच्या कवितेतूनही येतो .गावगाड्यातील अभावग्रस्त दुःखी कुटुंबांच्या अनेक कहाण्या कवेत घेऊन एकूणच माणसांच्या दुःखाची कविता या कवीने लिहिली आहे. सभोवतीच्या न संपणाऱ्या दुःखातही माणसांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवताना  ईश्वराच्या अस्तित्वाविषयी नकारही या कवितेत दर्शविला जातो. गावातल्या माणसाने अन्यायाविरुद्ध लढा उभारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असा विचार देखील काही कवितांमधून व्यक्त होत राहतो.

नव्या अर्थसघन प्रतिमानिर्मितीचे सामर्थ्य त्यांच्या कवितेत आहे. नव्या आणि अर्थसघन प्रतिमा या कवितेत सातत्याने येतात. कृषिसंस्कृतीमध्ये बैलाचे महत्त्व फार महत्त्वाचे आहे. बैलाविषयी सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत अर्थपूर्ण प्रतिमा येतात. किती हाकलावा आयुष्याचा बैल, दुःखावर उमटले पावसाचे खूर, संथ नक्षत्रामधुनी वाजती दंवाचे पाय, तळहाताचे शेत झाले शब्दांचे बीज रुजून आले, रक्ताच्या दरग्यात उन्हाचा ऊद धुपारत होता, आतड्यात रुतलेला खोल भुकेचा नांगर, आज झाला चोळामोळा माझ्या गावाचा कागद, रुमण्याच्या अंकुशाचा संसदेवर धाक, कष्टाच्या लिपीचे पुस्तक तू या आणि अशा अर्थसघन प्रतिमा हे सुखदेव ढाणके यांच्या कवितेचे एक सामर्थ्य आहे.

सुखदेव ढाणके यांच्या अल्पाक्षरी कवितेची भाषा अतिशय सुंदर आहे. सुभाषित होण्याचे सामर्थ्य असणाऱ्या कितीतरी ओळी या कवितेत अनेकदा येतात. अर्थसघन शब्दकळेचे सौंदर्य लाभलेल्या कविता त्यांच्या चारही संग्रहात आहेत. त्यांच्या काही कवितांमधून आईविषयीची प्रगल्भ आणि उन्नत अशी जाणीव व्यक्त झाली आहे. हुर्दुक या संग्रहातील ‘माय’ या कवितेत ‘बाईपण’ आणि ‘आईपण’ यांचे एकरूपत्व व्यक्त झाले आहे. पिंडपात या संग्रहातील ‘बाई’ ही कविता स्त्रीत्वाचा गौरव करणारी आहे. स्त्री मधली आदिम माता आणि बळिवंत शेतकऱ्यातील आदिम पिता हे दोन्ही आदिबंध त्यांच्या कवितेत वेगवेगळ्या संदर्भात येतात. अल्पाक्षररमणीयत्व आणि अर्थसघन शब्दलावण्य ही त्यांच्या कवितेची सामर्थे अनेक कवितांमधून प्रतीत होत राहतात.

ढाणके यांच्या कवितेत अनेक ठिकाणी अर्थसूचक जोड शब्द येतात, जसे रक्तजाळी, जळस्मीत, कृपालोभ, ओथंबहरीक, ऊरथडी, स्मृतिस्तोत्र, अंधारसंभ्रम, रैनबसेरा, अंधारतुडुंब, तिमिरझुंझार, चंद्रसजल, देठदुखिला, चित्रचकवा, पीळपीळशील, जगपोशिंदा, केशरनवती, चिखलमाखणी, पाठधोपटणी, जन्मचाकोरी, चांदणपीठ, थेंबलिपी, रक्तलागवड असे कितीतरी जोडशब्द या कवितेचे आशयलावण्य खुलवणारे आहेत. अल्पाक्षरत्व हे सुखदेव ढाणके यांच्या कवितेचे एक सामर्थ्य आहे.ज्याप्रमाणे छायाचित्रात दृश्य आणि भाषा या दोहोंची एकत्रित अभिव्यक्ती होते त्याचप्रमाणे ढाणके यांच्या कवितेतील शब्दकळेद्वारा अनेकदा दृश्यात्मकतेची अभिव्यक्ती होते. शब्दांच्या ठायी असलेल्या पारंपरिक अर्थाच्या सामर्थ्यासह त्याला नादात्मकतेचे, दृश्यात्मकतेचे अनेकार्थसूचक सामर्थ्य या कवितेत लाभते. हे या कवितेतील शब्दकळेचे एक वैशिष्ट्य आहे. माणूस,त्याच्या सभोवतीचे सामाजिक सांस्कृतिक पर्यावरण,त्याचे मूल्य विचार , त्याच्या व्यथा , त्याची माणुसकी, त्याचे जगणे आदी अनेक गोष्टी कवेत घेणारी ही कविता आहे.

चेडा ही कादंबरी भारतीय जातिव्यवस्थेचे वास्तव दर्शवणारी आहे. गावातला एक संवेदनशील मुलगा सभोवतीच्या विषमतावादी पर्यावरणात लहानाचा मोठा होतो. स्वातंत्र्याने, परिवर्तनाच्या चळवळीने, शिक्षणाने विचार दिला, मूल्ये दिली. ही मूल्यनिष्ठा, समताविचार अंगी बाणवलेल्या तरुणाला मात्र विषमतावादी आणि जातियवादी व्यवस्था सर्व पातळ्यांवर छळते. गावगाड्यातल्या जातीयवादी पर्यावरणाचे वास्तवदर्शी चित्रण या कादंबरीत केले आहे. निरपेक्ष प्रेमाची ही भावस्पर्शी कहाणी भारतीय माणसांच्या मनमनात रुतून बसलेल्या जातीयवादाचा भीषण चेहरा दाखवणारी आहे. बाबूराव बागूल व्यक्ती आणि साहित्य या समीक्षा ग्रंथात सुखदेव ढाणके यांनी नीरक्षीरविवेकाने बाबूराव बागूल यांच्या साहित्याची चिकित्सा केली आहे.

सेवानिवृत्त झाल्यावर एक वर्षानंतर सुखदेव ढाणके यांनी सर्व कला आणि वाङ्मयप्रकारांना वाहिलेले नियतकालिक सर्वधारा जानेवारी २००७ मध्ये सुरू केले. आजघडीला मराठी भाषेतील एक प्रतिष्ठित नियतकालिक म्हणून सर्वधाराचा लौकिक आहे. दशकपूर्ती वर्षाच्या निमित्ताने सर्वधाराचे कविता ,कथा कादंबरी आत्मकथने या साहित्यप्रकारांवर पाच महत्त्वाचे विशेषांक प्रकाशित झाले. या नियतकालिकाचे विशेषांकांसह सर्व अंक संग्रहमूल्य आणि संदर्भमूल्य असणारे आहेत. सेवानिवृत्तीनंतर काव्यलेखनासह आणि सर्वधाराचे संपादनाचे मौलिक कार्य ढाणके करीत आहेत. ते यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे झालेल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ मराठी प्राध्यापक परिषदेच्या २६ व्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते.

संदर्भ :

  • जोशी,विष्णू (संपादक), काव्याग्रह (कवी सुखदेव ढाणके विशेषांक) वाशिम,२०२१.

समीक्षक : देवानंद सोनटक्के