बहुगुणा, सुंदरलाल : ( ९ जानेवारी १९२७ )

सुंदरलाल बहुगुणा यांचा जन्म उत्तराखंडच्या पहाडी प्रदेशातल्या टिहरी जवळच्या गावात झाला. ते तेरा वर्षांचे असताना त्यांची भेट गढवालचे स्वातंत्र्यसैनिक देव सुमन यांच्याशी झाली. त्यांना भेटल्यावर बहुगुणा गांधीजींच्या अहिंसा तत्त्वाने देशकार्य करण्यासाठी प्रेरित झाले. त्यांनी पहाडी प्रदेशात पारतंत्र्याविरोधात निषेध दर्शवायला सभा घ्यायला, पत्रके वाटायला सुरुवात केली. वयाच्या १८ व्या वर्षी ते लाहोरला शिकायला गेले. परत आल्यावर त्यांनी हरिजनांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून मोहीम उघडली. १९६५ ते १९७० मध्ये टिहरी गावात आणि त्याच्या आसपासच्या गावात त्यांनी दारूबंदीची मोहीम सुरू केली. तिथे खरे तर दारू पिणे ही प्रथा नसली तरी भारत आणि चीन या मार्गावर सहजी दारू उपलब्ध झाल्याने दारूबंदीसाठी मोहीम सुरू करणे क्रमप्राप्त झाले. त्यासाठी त्यांनी महिलांना एकत्र केले आणि आंदोलने ही केली.

   आदिवासी महिला चिपको आंदोलन करताना

हिमालयात असलेली जंगले, झाडे यांचे रक्षण करायला हवे याची प्रखर जाणीव त्यांना झाली. उत्तर प्रदेशातील झाडे, जंगले नष्ट करणा-या जंगलाच्या ठेकेदारांविरुद्ध त्यांनी आंदोलन सुरू केले. तेच चिपको आंदोलन. पर्यावरण विषयक चळवळ हिमालयात आणि नंतर संपूर्ण भारत देशात आणि त्याही पलीकडे पसरली. चिपको आंदोलनात स्त्रिया एकत्र येऊन साखळी तयार करत आणि खरोखरच झाडाला मिठी मारून ते तोडण्यापासून वाचवत होत्या. अगोदर आम्हाला कापा आणि मगच झाडाला कापा. हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. चिपको आंदोलनाची प्रेरणा त्यांना कर्नाटकातील अप्पीको चळवळीपासून मिळाली. पर्यावरणशास्त्र हेच खरे अर्थशास्त्र हे त्यांचे घोषवाक्य होते. त्यावेळी, बहुगुणा यांनी उपोषणही केले. या आंदोलनाचे फलित म्हणजे उत्तराखंडमध्ये सरकारने त्यानंतर १५ वर्षापर्यंत वृक्षतोडीस बंदी घातली. त्या आंदोलनाला आंतरराष्ट्रीयस्तरावर इको-फेमिनिजम (स्त्रीवादी-पर्यावरणवाद) असेही म्हणतात. १९८१ ते १९८३ मध्ये त्यांनी पर्यावरण वाचवा हा संदेश घेऊन हिमाचल प्रदेशातील चंबाच्या लंगेरा गावापासून ५००० किलोमीटरची पदयात्रा केली. ते म्हणाले; जंगले आम्हाला काय देतात? राळ, इमारती लाकूड आणि परकीय चलन? आपण आपल्या वृत्ती आणि कृतीकडे डोळे उघडे ठेऊन पाहायला हवे. पुनर्विचार करायला हवा. आपण जंगले नष्ट करतो, त्यामुळे विध्वंसक पूर येतात. लोक तीर्थक्षेत्री आल्याच्या भावनेने इथे येतात आणि आम्ही त्यांना काय देतो ? पूर ? विनाश ? अशा त्यांच्या बोलण्याने त्यांनी लोकांची चूक त्यांच्या लक्षात आणून दिली, आणि सांगितले, जंगले आपल्याला काय देतात ? माती, पाणी आणि शुद्ध हवा. माती, पाणी आणि शुद्ध हवा हेच आपले जीवन आहे. आपल्या जगण्यासाठी जंगले गरजेची आहेत. झाडांपासून इमारती लाकूड मिळवणे हा उद्देश असू शकत नाही. त्यापासून आपल्याला अन्न, चारा, इंधन आणि खत मिळते आणि हेच मूळ अर्थशास्त्र आहे. झाडे अमूल्य मातीची धूप व्हायचे थांबवतात. आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा करतात.

टिहरी धरण बांधायचे मुख्य कारण हिमालयातून गावागावातून वाहत येणा-या गंगा नदीचा मार्ग बदलून नवी दिल्लीत येणाऱ्या तिच्या पाण्याचा ओघ वाढवणे, हे होते. पण, त्यामुळे, पहाडी प्रदेशातील लोकांना पाणी मिळणे कठीण होत होते. स्त्रियांना त्यांच्या कुटुंबासाठी मिळणा-या चार लिटर पाण्यासाठी रात्ररात्र वाट बघत बसायला लागायला लागली आणि म्हणून टिहरी धरणाविरोधात भागीरथी नदीच्या तीरावर त्यांनी काही वेळा अन्न सत्याग्रह केलेला आहे. त्यांचे म्हणणे होते की, १०० मेगावॅटपेक्षा अधिक क्षमतेचे धरण बांधू नये. टिहरी धरण प्रकल्प १९७२ साली सुरू झाला आणि त्यानंतर सुरू झालेले हे आंदोलन २००४ सालापर्यंत चालले.

त्यांच्या अशा अहिंसेने चालणा-या कार्यासाठी त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री (१९८१), जमनालाल बजाज (१९८६), राईट लाईवलीहूड (१९८७), पद्मविभूषण (२००१) अशा पुरस्कारांनी गौरवले गेले आहे. विज्ञानाची डॉक्टरेट पदवी आयआयटी, रुडकीकडून मिळाली (१९८९).

प्रत्येक गोष्टीकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून बघणारे सुंदरलाल बहुगुणा पर्यावरण गांधी तसेच वृक्षमित्र म्हणून ओळखले जातात.

समीक्षक : अ.पां. देशपांडे