स्वामिनाथन, मोनकोंबू सांबशिवन :   (७ ऑगस्ट, १९२५ –  ) मोनकोंबू सांबशिवन स्वामिनाथन यांचा जन्म तमिळनाडूमधील कुंभकोणम येथे झाला. त्यांचे कुटुंब मूळचे केरळ राज्यातील कट्टनाड (अलेप्पी जिल्हा) येथील होते. तेथे त्यांची मोठी भातशेती व कॉफीच्या बागा होत्या. स्वामिनाथन यांचे वडील सांबशिवन हे कॉंग्रेस कार्यकर्ते होते व महात्मा गांधींच्या स्वदेशी चळवळीत त्यांचा मोठा सहभाग होता या वारशामुळे त्यांना तरुण वयातच शेतीतील कमी उत्पादकता व शेतकऱ्याचे दारिद्र्य या विषयी मानसिक दु:ख होत असे. १९४२-४३ साली बंगालमध्ये पडलेल्या दुष्काळात लक्षावधी लोकांचे मृत्यू झाले. यामुळे त्यांनी स्वतः शेतीशिक्षण व संशोधन यात आपलेआयुष्य व्यतीत करण्याचे ठरविले. त्यांनी१ ९४४ साली बी.एससी. (प्राणीशास्त्र) ही पदवी मिळविल्यानंतर १९४७ साली कोईमतुर येथील शेतकी कॉलेजमधून बी.एससी. (कृषी ) ही पदवी विशेष प्राविण्य व अनेक सुवर्णपदके मिळवून प्राप्त केली. १९४९ साली त्यांनी अनुवंशशास्त्र व रोपपैदास या विषयात इंडियन अॅग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटमधून (एम.एस्सी. ) केली. त्याचवेळी त्यांनी भारतीय प्रशासन सेवेची परीक्षा दिली होती व त्यात त्यांची नियुक्ती भारतीय पोलीस सेवेमध्ये झाली होती. मात्र त्याच वेळी त्यांची नेदरलँडमध्ये बटाटा या पिकावर अनुवंशशास्त्राचा विशेष अभ्यास करण्यासाठी युनेस्कोतर्फे फेलोशिपसाठी निवड झाली. नेदरलँडमध्ये एक वर्ष काम केल्यानंतर ते इंग्लंडमध्ये केंब्रिज विद्यापीठात वनस्पती व रोपपैदास या विषयाचा विशेष अभ्यास करण्यासाठी दाखल झाले व १९५२ साली हॉवर्ड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएच्.डी. ही पदवी मिळविली. त्यांनी विस्कॉन्सिन-मॅडिसिन विद्यापीठात पोस्ट-डॉक्टरल संशोधन केले. त्यानंतर भात-संशोधन केंद्र कटक (ओरिसा ) येथे काही काळ काम केले.

इंडियन ॲग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट (एआयआरआय), नवी दिल्ली येथील वनस्पतीशास्त्र विभागात ते १९५४ साली असिस्टंट सायटोजेनेटीसिस्ट म्हणून रुजू झाले. येथेच ते १९६१ साली विभाग प्रमुख झाले व १९६६ मध्ये ते संस्थेचे संचालक झाले. ते एक उत्कृष्ट प्राध्यापक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २२ एम. एससी. व ७७ पीएच्.डी. च्या विद्यार्थ्यांनी आपला अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संशोधन मासिकांतून ६०० च्यावर लेख व कित्येक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. १९७२ साली स्वामिनाथन इंडियन कौन्सील ऑफ ॲग्रीकल्चरल रिसर्च (आयसीएआर) या संस्थेचे महासंचालक झाले.

पंतप्रधान श्री. लाल बहादूर शास्त्री यांनी १९६५ साली सुरू केलेल्या हरितक्रांतीची धुरा स्वामिनाथन यांच्या खांद्यावर होती आणि भारतीय शेतकऱ्यांच्या शेतांत गव्हाचे व तांदळाचे उच्च उत्पन्न देणारे वाण पेरल्याने गहू आणि तांदूळ उत्पादनांत भारत स्वयंपूर्ण होऊ शकला.

पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींनी १९८० साली स्वामिनाथन यांची योजना आयोगावर नेमणूक केली. १९८२ साली स्वामिनाथन यांची आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था, मनिला (फिलिपाईन्स) येथे महासंचालक म्हणून नेमणूक झाली. त्यांच्या संशोधनाचा फायदा केवळ फिलिपाईन्सलाच नव्हे तर आशियाखंडातील चीन, व्हिएतनाम, कांपुचिया, थायलंड, मलेशिया, उत्तर कोरिया, टांझानिया, ब्रह्मदेश, श्रीलंका, नेपाळ, इराण, इजिप्त, बांगलादेश आणि पाकिस्तान या देशांनाही झाला. या संशोधनामुळे शेतकरी आणि वैज्ञानिक यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला. या महत्वपूर्ण संशोधनासाठी १० नोहेंबर १९८७ रोजी स्वामिनाथन यांना प्रेसिडेन्शिअल गोल्डन हार्ट या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले.

फिलिपाईन्सहून १९८८ साली परत आल्यावर त्यांनी चेन्नई येथे एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन ही संस्था स्थापन केली. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरणाला पोषक व सामाजिक समतेतून विकास, निसर्गात ढवळाढवळ न करता गरीबातील गरिबास व महिलांनाही तो पोषक कसा राहील यावर भर देऊन समाजासाठी विज्ञान या भावनेने ही संस्था कार्यरत आहे. स्वामिनाथन यांनी शेती संशोधनाबरोबर मॅन्ग्रोव्ह इकोसिस्टीम (खारफुटीचे पर्यावरण), जैविक विविधता संगोपन, अनुवंशिक संगोपन, निसर्ग व नैसर्गिक स्त्रोतांचे संगोपन, पर्यावरण संरक्षण व विकास इत्यादी विषयांवरही संशोधन करून मार्गदर्शन केले आहे. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशन ही संस्था देशाच्या कानाकोपऱ्यातील सहा लाख गरीबांपर्यंत पोहोचून त्यांच्या आयुष्यात बदल घडवू शकली आहे. संस्थेने आजवर ४,००० पोषण उद्यानांची निर्मिती केली असून १६,२०० हेक्टर उजाड जमीन शेतीखाली आणली आहे.

स्वामिनाथन यांना संशोधन व विकासाच्या कामगिरीबद्दल असंख्य पुरस्कार मिळाले आहेत. राष्ट्रीय स्तरावर पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, आंतरराष्ट्रीय स्तरावर ११ आणि भारतातील ३३ विद्यापीठांच्या ऑनररी डॉक्टरेट्स त्यांना मिळाल्या आहेत. याशिवाय त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत.

संदर्भ :

समीक्षक : विठ्ठल चापके