भरूचा, फरेदुन रुस्तुमजी: ( ४ मे १९०४ – ३० मार्च १९८१ )

मुंबईतील पारशी कुटुंबात जन्मलेल्या फरेदुन यांचे शालेय शिक्षण पाचगणीत झाले. सह्याद्रीतील पाचगणी महाबळेश्वर परिसरात वावरल्याने त्यांच्यात निसर्गाची आवड निर्माण झाली. मुंबईच्या विल्सन महाविद्यालयातून विज्ञान शाख़ेत बी. ए. उत्तीर्ण झाल्यावर ते केंब्रिज विद्यापीठाच्या डाउनिंग कॉलेजमधून पारिस्थितीकी (इकॉलॉजी) विषयात संशोधन करून एम. एस्सी झाले. फान्समधील मॉपेलिए विद्याठातील ब्राउ-ब्लँके (Brown- Blanquet) यांच्या देखरेखीखाली लिहिलेला त्यांचा डी. एस्सीचा प्रबंध आदर्श समजला जातो.

ते १९३५ मध्ये भारतात परतल्यावर मुंबईच्या विज्ञान संस्थेत प्राध्यापक पदावर रूजू झाले. झाडे आणि झुडपे यांच्यामधील परस्पर संबंध या विषयात संशोधन करणारे ते भारतातील पहिले वनस्पतीशास्त्रज्ञ होते. सह्याद्रीतील दमट–पानगळीची वने, गवताळ प्रदेश, तिवरवने, शेतातील तण, शहरातील पावसाळी झुडपे तसेच वाळवंटी प्रदेश यात वाढणाऱ्या वनस्पती समूहांचा अभ्यास असलेले ३०-३५ प्रबंध त्यांच्या देखरेखीखाली तयार झाले. सन १९५३ ते १९५९ या काळात ते विज्ञान संस्थेचे संचालक होते. नंतर युनोने त्यांना तज्ज्ञ म्हणून सिरिया विद्यापीठात दमास्कस येथे पाठवले. पाठोपाठ दोन वर्षे त्यांनी इराकमधील बगदाद विद्यापीठात शिकवले. तेथून परतल्यावर मुंबईत विज्ञान संस्था, महर्षी दयानंद कॉलेज आणि पुण्यातील वाडिया कॉलेज येथे मानद प्राध्यापक म्हणून १९७२ पर्यंत पारिस्थितीकी हा विषय शिकवत असत. या विषयाबरोबरच त्यांचे फ्रेंच आणि जर्मन या भाषांवर प्रभुत्व होते म्हणून या भाषा शिकवण्याचे काम फरेदुन भरूचा करत असत.

सह्याद्री आणि राजस्थानच्या वाळवंटातील वनस्पतीवरील संशोधन, विशेषत: जमिनीचा पोत रासायनिक द्रव्ये इत्यादींचा वनस्पती वाढीवरचा परिणाम, तिवरवने आणि खारी जमीन, दगड आणि भिंतींवर वाढणारी झाडे, कुजणाऱ्या कचऱ्यावर वाढणारी झाडे यांच्यातील संबंधावरील त्यांचे संशोधन महत्वाचे ठरले. या विषयावरील त्यांचे संशोधन आणि पुस्तके आजही मार्गदर्शक ठरतात. भारतीय कृषि-संशोधन परिषदेने पुरस्कृत केलेल्या प्रकल्पासाठी राजस्थानच्या वाळवंटातील वनस्पतींवर संशोधन करण्यासाठी फरेदुन भरूचा पोखरण परिसरात एका विद्यार्थ्यासह भेट देत असत. १९९८ साली भारताने पोखरण येथे केलेल्या अणुचाचणीपूर्व आणि नंतर तेथील वनस्पतींवर त्याचा काय परिणाम झाला हे त्यांनी अभ्यासले होते.

फरेदुन भरुचा यांनी  पारिस्थितीकी शास्त्रातील शिक्षण आणि संशोधन देशात रुजवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले त्यांच्या या कार्यामुळे फरेदुन भरूचा यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले. ते दिल्लीच्या नॅशनल इन्स्टिट्यूटऑफ सायन्सेसचे फेलो होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय वनस्पती कॉंग्रेसच्या वनविभागाचे तीन वेळा उपप्रमुखपद भूषविले. श्रीलंका येथील चर्चासत्रासाठी फरेदुन भरूचा यांना युनेस्कोकडून आमंत्रण मिळाले होते. केंब्रिज येथील ‘डिक्शनरी ऑफ एमिनंट सायंटिस्टस ऑफ द वर्ल्ड’ यात फरेदुन भरूचा यांचा उल्लेख आहे. ‘मार्क्वीस हूज हू’  या ग्रंथात जगातील महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये त्यांची गणना झाली आहे. जगातील महत्त्वाचे वनस्पतीशास्त्रज्ञ म्हणून हंट बोटॅनिकल लायब्ररी, कार्नेजी मेलन युनिव्हर्सिटी, पिट्सबर्ग, पेन्सिल्वानिया, येथे त्यांच्या छायाचित्राची तसबीर लावलेली आहे.

फरेदुन भरुचा यांचे मुंबईत निधन झाले.

संदर्भ :

  • Chaphekar, S.B.,  Faredoon Rustomji Bharucha. Biographical Memoirs.Indian National Science Academy, New Delhi.Pp.50-55, 1985.
  • Damania, A.B.,  Prof. F. R. Bharucha. Asian Agri-History, 19(2): pp. 145-146, 2015.

समीक्षक : चंद्रकांत लटटू