बोर्डेट, जूल्स : (१३ जून १८७० ते ६ एप्रिल १९६१ ) जूल्स बोर्डेट यांचा बेल्जियममधील सोयग्निस येथे झाला. ब्रसेल्समध्ये १८९२ मध्ये डॉक्टर ऑफ मेडिसिन पदवी मिळवल्यानंतर पॅरिसमधील पाश्चर इंस्टिट्यूट मध्ये त्यानी १९०१ पर्यंत काम केले. मूळ पाश्चर इन्स्टिट्यूट पॅरिस मध्ये आहे. परंतु प्रारंभी तेथे काम केल्याने जूल्स बोर्डेटनी बेल्जियम मधील संस्थेलाही तेच नाव देण्याचा आग्रह धरला. त्यानंतर ब्रसेल्स मध्ये १९०१ साली पाश्चर इन्स्टिट्यूट याच नावाने संस्था स्थापना केली. या संस्थेच्या प्रारंभापासून १९४० पर्यंत ते तेथे संचालक होते.
हे प्रसिद्ध बेल्जियन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, वैद्यकीय डॉक्टर होते. जूल्स बोर्डेट ह्यांनी मानवी रक्तरसात जीवाणू नष्ट करणारे घटक असतात असा शोध लावला. यामुळे संसर्गजन्य रोगांचे निदान व उपचार करणे सोपे झाले. या शोधाबद्दल त्यांना १९१९ सालचे शरीरक्रियाशास्त्र आणि वैद्यक विषयाचा नोबेल पुरस्कार दिला गेला.
बेल्जियममधील पाश्चर इन्स्टिट्यूटमध्ये सुमारे १८९४ ते १९०१ या काळात जीवाणू (bacteria) आणि रक्तातील तांबड्या पेशींचा (erythrocytes) मानवी रक्तद्रव्यात कसा नाश होतो यावर काम केले. यातूनच रक्तरसविज्ञान (serology) या नव्या वैद्यकीय शाखेचा प्रारंभ झाला. रक्तरसविज्ञान शाखेत शरीरद्रावात (body fluids) रोगप्रतिक्षमता संबंधित जैवरासायनिक क्रियांचा अभ्यास केला जातो.
आपल्या रक्तरसात शरीरात आलेल्या अनाहूत जीवाणूपेशीभित्तिकांचे विलयन होते. जीवाणू विलयन (bacteriolysis) आणि पर्यायाने जीवाणूंचा नाश कसा केला जातो हे त्यांनी १८९५ मध्ये दाखवून दिले. या क्रियेसाठी रक्तद्रव्यातील दोन घटक जबाबदार असतात असे त्याना आढळले. यातील एक घटक उष्मा-स्थिर (heat-stable) प्रतिजन असून तो रोगकारक जीवाणूंरोधी प्रतिक्षमता आधीच विकसित झालेली आहे अशा प्राण्यांमध्ये आढळतो. रक्तद्रव्यातील दुसरा घटक, उष्मा-संवेदनाशील (heat-sensitive) प्रतिजन आहे हे त्यांना समजले. तो त्याकाळी अलेक्सिन ह्या नावाने ओळखला जाई. अलेक्सिन हे नाव एडवर्ड बुकनर यांनी (रसायन विज्ञान नोबेल विजेता १९०७) दिले होते. अशा संयुगाना आता संपूरक (complement) म्हणतात. उष्मा-संवेदनाशील प्रतिजन सर्व पृष्ठवंशीय (vertebrates), म्हणजे कणा असणाऱ्या प्राण्यांच्या शरीरात आढळतो . १८९८ च्या सुमारास जूल्स बोर्डेट यांच्या असे लक्षात आले की एका प्राण्याच्या शरीरातील तांबड्या रक्तपेशी दुसऱ्या प्राण्यात टोचून घातल्या तर नष्ट केल्या जातात (hemolysis). ही क्रिया आपल्या रक्तद्रव्यात शिरलेल्या जीवाणूंच्या पेशी भित्ती विलयनासारखी (bacteriolysis) आहे.
संपूरकसंस्था म्हणजे रक्त रसातील प्रथिन रेणूंचा संच आहे. संपूरकसंस्था ही प्रतिक्षमता संस्थेचा एक भाग आहे. संपूरकांमुळे रोगप्रतिक्षमता व शरीरातील जंतूभक्षक पेशींच्या कामात मदत मिळते. अर्धविघटित पेशींचे पूर्ण विघटन होते. रक्तरसात असलेल्या जीवाणू पेशींचे विलयन होते. संपूरकसंस्था उपजत आहे.
जूल्स बोर्डेटनी आपला मेहुणा, ऑक्टेव्ह झान्गू (बेल्जियन उच्चार), यांच्या सहकार्याने ब्रुसेल्स मध्ये १९०६ साली केलेल्या रोग प्रतिक्षमता शास्त्रातील संशोधनातून संपूरक स्थिरीकरण परीक्षा (complement fixation test) निर्माण झाली. या परीक्षणामधून जीवाणू विरुद्ध प्रतिद्रव्य असल्यास त्याचे प्रमाण शोधता येत असे. या प्रतिक्षम निदान परीक्षेचा (immunodiagnostic test) कोणत्या जीवाणूचा संसर्ग झाला आहे हे कळण्यासाठी होतो. या संपूरक स्थिरीकरण परीक्षेत थोडे फार बदल करून इतर निदान पद्धती विकसित केल्या. उदा., वॅासरमन परीक्षा – गरमी (Syphilis) गुप्त रोगाचे निदान करण्यासाठी होते. शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी गरमी हा गंभीर संसर्गजन्य आजार होता. वॅासरमन परीक्षा आणि पॉलअर्लिक ह्यांनी नव्याने निर्माण केलेले प्रतिजैविक साल्वार्सान किंवा संयुग ६०६ (Salvarsancompound 606) ह्या दोन्हीच्या एकत्रित परिणामांमुळे यूरोप आणि उत्तर अमेरिकेत गरमी हा रोग आटोक्यात आला.
जूल्स बोर्डेट आणि ऑक्टेव्ह झांगू यांनी १९०६ मध्ये डांग्या खोकल्याच्या दंडाणूचा शोध लावला. जूल्स बोर्डेट ह्यांच्या सन्मानार्थ ह्या जीवाणूला बोर्डेटेला पर्च्यूसिस असे नाव ठेवण्यात आले. डांग्या खोकल्याचा प्रादुर्भाव जगभर आहे.
लहान मुलांना दिली जाणारी DTP लस (Diphtheria, Tetanus, and Pertussis) दिली जाते ती घटसर्प, धनुर्वात आणि डांग्या खोकला ह्या पासून त्यांचे रक्षण करते. जूल्स बोर्डेट यांचा डीटीपी लस निर्मितीत मोठा वाटा आहे.
त्यांचे निधन त्यांच्या राहत्या घरीबेल्जियमधील ब्रुसेल्स येथे झाले.
संदर्भ :
- https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/20029083
- https://www.nobelprize.org/nobel_prizes/medicine/laureates/1919/bordet-facts.html
- https://www.nobelprize.org/nobel_prizes/medicine/laureates/1919/press.html
- http://www.aai.org/About/History/Notable-Members/Nobel-Laureates/JulesBordet
- https://www.pasteur.fr/en/institut-pasteur/history/jules-bordet-1870-1961
समीक्षक : मोहन मद्वाण्णा
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.