रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात प्रसिद्ध पन्हाळे-काजी लेण्यांजवळ असलेला किल्ला. पन्हाळे-काजी येथील झोलाई देवी ग्रामदेवतेच्या मंदिरापासून गडावर पोहोचता येते.

तटबंदी तोडून काढलेल्या पायवाटेने गडाच्या माथ्यावर प्रवेश होतो. गडावर तटबंदीचे अवशेष तसेच विटा व खापरांचे अनेक तुकडे दिसतात. माथ्यावर मधोमध एका जोत्यावर छ. शिवाजी महाराजांचा पुतळा नव्यानेच बसविला आहे. जोत्याशेजारी जुन्या बांधकामाचा एक घडीव दगड आहे. माथ्यावर बांधकामाची एकूण चार जोती दृष्टीस पडतात. या जोत्यांवर विटांचे बांधकाम दिसून येते.
येथे खडकात खोदलेली पाण्याची तीन टाकी असून यांपैकी फक्त एक टाके सुस्थितीत आहे. टाक्यापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या खोदलेल्या आहेत. या टाक्यांत बारमाही पाणी असते. हे खांबटाके प्रकारातील आहे. इतर दोन टाक्यांपैकी एक पूर्णपणे, तर दुसरे टाके अर्धवट गाळाने भरलेले आहे. टाक्यांपासूनची वाट पुढे गड व झोलाई देवी मंदिराचा डोंगर यामधील खिंडीत येते. मंदिरामागील भागात जुन्या मंदिराचे दोन उत्तम कलाकुसर असलेले दगड आहेत.

किल्ल्याच्या पायथ्याशी पन्हाळे-काजी ही प्रसिद्ध प्राचीन ऐतिहासिक लेणी आहेत. पन्हाळे-काजीचे जुने नाव पन्हाळे असे असून त्याचा पुरावा विक्रमादित्याच्या ताम्रपटात मिळतो. शिलाहार राजा पहिला अपरादित्य (कार. ११२७—११४८) याने आपल्या मुलाला प्रणाल म्हणजे पन्हाळे या राजधानीच्या शहरात प्रणालक राज्याचा अधिपती नेमले.

शिलाहारांच्या काळामध्ये प्रणालक म्हणजे पन्हाळे हे गाव अस्तित्वात होते, हे दिसून येते. प्रणालक दुर्ग हा किल्लादेखील त्याच काळातीलच असावा, असे तेथे असलेल्या पुरातत्त्वीय अवशेषांवरून दिसून येते. नंतर आदिलशाही, छ. शिवाजी महाराज, पेशवे व इंग्रज यांच्या काळात या भागात किल्ला बांधल्याची किंवा कोणतीही ऐतिहासिक घटना घडल्याची माहिती उपलब्ध नाही.
संदर्भ :
- गोगटे, चिं. ग. महाराष्ट्र देशातील किल्ले (भाग – २), पुणे, १९०५.
- जोशी शं. ना. आंग्रे शकावली, पुणे, १९३९.
- जोशी, सचिन विद्याधर, दुर्गजिज्ञासा, पुणे, २०१३.
समीक्षक : जयकुमार पाठक
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.