ऐतिहासिक घटनांमधील साक्षीदारांकडून त्यांच्या स्मृतींवर आधारित माहिती गोळा करणे व त्यांचे विश्लेषण करणे म्हणजे मौखिक इतिहास होय. ही क्रिया एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिकपद्धतीने जात असते. असंरचित मुलाखतीच्या माध्यमातून व्यक्तीकडून एखाद्या घटनेची, कार्यक्रमाची किंवा क्रियेची माहिती गोळा करण्याची ही पद्धती होय. मौखिक इतिहास हा व्यक्तिच्या आठवणींवरती आधारित असतो. भूतकाळात घडलेल्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक या घटना व्यक्ती तिच्या आठवणींच्या आधारे एखाद्यास सांगतो व ऐकणारा त्या आठवणींच्या आधारावरून विश्लेषण करीत असतो.

मौखिक इतिहासपद्धती ही ऐतिहासिक दस्तऐवजीकरणासाठी वापरात येणारी सर्वात जुनी पद्धती मानली जाते. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात युरोपियन समाजात प्रामुख्याने अशिक्षित–सर्वसामान्य समाजावरील संशोधनात मौखिक इतिहासपद्धतीचा वापर केला गेला. मौखिक इतिहासपद्धतीचा वापर ब्रिटनमधील कामगारांची परिस्थिती समजून घेण्यासाठी देखील केला गेला. तसेच पहिल्या व दुसऱ्या जागतिक युद्धांतील साक्षीदारांकडून युद्धाच्या आठवणी जाणून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या पद्धतीचा वापर करण्यात आला.

१९४० मध्ये ध्वनीमुद्रणाच्या साह्याने मौखिक इतिहास घेतला गेला; मात्र एकविसाव्या शतकात त्यासाठी डिजिटल ध्वनीमुद्रणाचा वापर होत आहे. मुलाखतिचे दस्तावेज किंवा मौखिक इतिहासाचे ध्वनीमुद्रणाचे लिप्यंतरण, सारांशित वा अनुक्रमित केले जाऊन ते संग्रहालय किंवा ग्रंथालयात ठेवले जातात. या ध्वनीमुद्रीत मौखिक इतिहासाचा उपयोग संशोधन, प्रकाशन, माहितीपट, प्रदर्शन, नाटक वा सादरीकरणाच्या इतर प्रकारात केला जाऊ शकतो.

मौखिक इतिहासाचा मुळ उद्देश अशा व्यक्तिची मुलाखत घेण्याचा असतो की, ज्याला इतिहासातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे एखादा महत्त्वपूर्ण अलिखित इतिहास उलगडण्यासाठी लोकांचा दबलेला आवाज पुढे आणण्याचे, लोकांना व्यक्त करण्याचे मौखिक इतिहास हे एक साधन आहे. स्त्रिया, कामगार, अल्पसंख्याक इत्यादी लोकांची माहिती आणि त्यांवर भूतकाळात झालेले अन्याय-अत्याचार मौखिक इतिहासामुळे कोणत्या ना कोणत्या व्यक्तीच्या माध्यमातून पुढे येऊ शकते. त्यामुळे मौखिक इतिहास हे ऐतिहासिक संशोधनासाठी सामाजिक व राजकीय क्षेत्रात महत्त्वाचे पूरक असे साधन मानले जाते. त्याचप्रमाणे मौखिक इतिहास हे भूतकाळ व वर्तमानकाळ यांना जोडण्याचे काम करते. या पद्धतीमुळे लोक समाजाला व स्वत:ला कसे सादर करतात, हे समजण्यास मदत होते.

मौखिक इतिहासाचा वापर १९८० मध्ये ‘इतिहास’ व ‘आठवणी’ यांच्या सहसंबंधातील उदयामुळे मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. आठवण ही मौखिक इतिहासाचा खूप मोठा आधार आहे. आठवण ही सामाजिक उत्पादनाचे प्रभावी साधन मानता येत; कारण आठवणीतून दैनंदिन जीवनातील भूतकाळ व वर्तमानकाळ यांना जोडणारे ज्ञान तयार होत असते. मौखिक इतिहासपद्धतीमुळे दुर्लक्षित घटकांची जाणीव, संवेदना समजून घेण्यास मदत होते. मौखिक इतिहास हा सत्ताधारी घटकाकडून न येता, तो थेट भोगलेल्या व्यक्तिच्या तोंडून बाहेर येत असतो. ग्लक यांच्या मते, ‘ज्या स्त्रियांनी औपचारिक शिक्षण घेतले नाही किंवा ज्या स्त्रियांना संवाद साधण्यास जमत नाही, अशा स्त्रियांची माहिती घेण्यासाठी व त्यांना सशक्त बनविण्यासाठी मौखिक इतिहास महत्त्वाचे साधन आहे.

कोणताही घटक जसजसा व्यापक बनत जातो, तसतसा त्याच्या विकासाच्या मार्गात आव्हाने निर्माण होत जातात. हा प्रकार काहीसा मौखिक इतिहासाच्या बाबतीतही सिद्ध होताना दिसतो. प्रत्यक्षार्थवादाच्या (positivism) वाढत्या प्रभावामुळे मौखिक इतिहासपद्धतीकडे तथाकथित विश्वसनियतेच्या मुद्द्यावरून संशयास्पदपद्धतीने बघितले गेले. पुढे महायुद्धोत्तर काळात मात्र युरोप आणि अमेरिका यांमध्ये सामाजिक इतिहास या अभ्यास विषयाच्या उदयामुळे मौखिक इतिहासपद्धतीचे एकप्रकारे पुनरुज्जीवन झाले. या पुनरुज्जीवनाच्या टप्प्यावर प्रामुख्याने दबलेल्या, परिघावरील तसेच सर्वसामान्य आवाजांचे दस्तावेजीकरण करण्यासाठी उपयुक्त आणि योग्य पद्धती म्हणून मौखिक इतिहास पद्धती प्रस्तापित झाल्याचे दिसते.

प्रत्यक्षार्थवादाने मौखिक इतिहासावर टिका करताना म्हटले आहे की, मौखिक इतिहासपद्धती वापरताना राजकीय दृष्टिकोन बळावू शकतो. वस्तुनिष्ठता आणि व्यक्तिनिष्ठतेच्या पातळीवर प्रत्यक्षार्थवादींनी प्रश्न उपस्थीत केला; कारण मौखिक इतिहासाद्वारे अशा व्यक्तीची माहिती घेतली जाते, ज्या बरेचदा मृत असतात आणि मौखिक इतिहास सांगणाऱ्या व्यक्तीला तिच्या स्वतःच्या इतिहासाबद्दल विशेष ओढ असते. त्यामुळे त्या आपल्याला माहिती देताना ते  ‘कल्पनेतील विश्व’ अशी माहिती सांगू शकतात. त्यांनी सांगितलेली ती मौखिक माहिती रास्त असेलच असे नाही. मौखिक इतिहासपद्धतीवर वस्तुनिष्ठतेच्या बाबतीत मोठी टीका केली जाते. असे मानले जाते की, संशोधक एखाद्याच्या मौखिक माहितीमध्ये सोयीनुरूप बदल करू शकतो किंवा मुलाखत घेताना त्या व्यक्तिबद्दल त्याच्या मनात भावनिकता निर्माण होऊ शकते. त्यामुळे मौखिक इतिहासपद्धतीच्या संशोधनामध्ये वस्तुनिष्ठता कमी असू शकते, असे मानले जाते.

मौखिक इतिहासाच्या बाबतीत ज्या अडचणी आल्या आहेत, त्या सर्वसाधारणपणे सर्वच संशोधनपद्धतींपुढे आलेल्या दिसतात. मौखिक इतिहासाच्या विकसित स्वरूपाने या सर्व अडचणींवर मात केले असून ही पद्धती देखील पुढे जात आहे. या विकसित स्वरुपात वस्तुनिष्टतेच्या आक्षेपाची दखल घेतांना असे म्हटले गेले की, एखादी आठवण किंवा ऐतिहासिक सत्य यातील तथाकथित तथ्य शोधण्याऐवजी ती आठवण किंवा ते ऐतिहासिक सत्य कोणत्या विशिष्ट प्रकारे मांडले गेले आहे, याकडे बघणे अधिक गरजेचे आहे. ही सत्याची विशिष्ट प्रकारची मांडणी संशोधकांसाठी महत्त्वाचे दालन खुले करणारी ठरू शकते.

स्त्रीवादी अभ्यासकांनी यात मोठी कामगिरी बजावली आहे. स्त्रीवादी अभ्यासकांनी असे म्हटले की, प्रत्यक्षार्थवादाने किंवा इतर पारंपरिक संशोधनपद्धतींमध्ये गृहीत धरलेल्या तथाकथित वस्तुनिष्ठतेमुळे स्त्रियांचा तसेच इतर परिघावरील समूहांचा इतिहास पुढेच आला नाही. त्यामुळे मौखिक इतिहासाच्या गाभ्याशी असलेली व्यक्तिनिष्ठता हीच या पद्धतीचे बलस्थान आहे. त्यामुळे अलिखित इतिहासासंदर्भात दबलेल्या व परिघावरील समूहांचा आवाज पुढे आणण्यासाठी मौखिक इतिहास ही संशोधनपद्धती महत्त्वाचे साधन मानली गेली आहे.

१९४८ मध्ये डॅलन नेवील व पॉल थॉमसन यांनी मौखिक इतिहासाचा वापर सुरू केला. या पद्धतीवरती पॉल थॉमसन यांनी १९८७ मध्ये लिहिलेले द वॉइस ऑफ द पास्ट हे अतिशय मूलभूत पुस्तक आहे. मौखिक इतिहासाची ‘मौखिक इतिहास समाज’ (Oral History Society) नावाची जागतिक संघटना आहे. ज्याच्या माध्यमातून मौखिक इतिहास नावाचे मासिक चालवले जाते.

संदर्भ :

  • Bloor, M.; Wood, F., Keywords in Qualitative Methods : A Vocabulary of Research Concepts, New Delhi, 2006.
  • Denzin, N.; Lincoln, Y., Collecting and Interpreting Qualitative Materials, New Delhi, 2003.
  • Perks, R.; Thomson, A., The Oral History Reader, London, 2006.
  • Thompson, P.; Bornat, Joanna., The Voice of the Past : Oral History, New York, 2000.
  • Sangster, Joan, Telling our stories : feminist debates and the use of oral history, 1994.

समीक्षक : मयुरी सामंत