कॅमिलो गॉल्गी : ( ७ जुलै १८४३ – २१ जानेवारी १९२६) कॅमिलो गॉल्गी यांचा जन्म उत्तर इटलीमधील ब्रेसीआ राज्यातील फोर्टेनो नावाच्या खेड्यात झाला. गॉल्गीच्या विज्ञानातील योगदानामुळे आता ते गाव फोर्टेनो गॉल्गी म्हणून ओळखले जाते. गॉल्गीचे वडील हे पेशाने डॉक्टर व ब्रेसिआमधील जिल्हा वैद्यकीय अधिकारी होते. १८६५ साली गॉल्गी यांनी पेव्हिआ विद्यापीठातून (Pevia University) वैद्यक विषयाची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी पेव्हिआ येथीलच सेंट मॅटिओ इस्पितळात (St. Matteo Hospital) संशोधनाला सुरुवात केली. त्यावेळी त्यांचा भर चेतासंस्थांवरील संशोधनावर होता.
या काळात इन्स्टिटयूट ऑफ सायकॅट्रीमधील सेसार लोम्ब्रोसो (Cesare Lombroso) यांच्याकडे गॉल्गी यांनी इंटर्नशिप केली. याच काळात प्रायोगिक पॅथॉलॉजी प्रयोगशाळेमधील ग्युलिओ बिझोझेरो (Giulio Bizzozero) या हुशार, तज्ज्ञ व तरुण प्राध्यापकाकडे सुद्धा त्यांनी शिक्षण घेतले.
बिझोझेरोच्या मार्गदर्शनामुळेच गॉल्गीला प्रायोगिक संशोधन आणि पेशीशास्त्रातील तंत्रज्ञानामध्ये (हिस्टोलॉजिकल टेक्निकस) विशेष रुची निर्माण झाली. १८६९ साली गॉल्गी यांनी जो लेख लिहिला, तो लोम्ब्रोसो यांच्या सिद्धांताच्या प्रभावाखाली होता, त्यात ते लिहितात की मानसिक आजार हे चेताकेंद्रामधील जैविक जखमांमुळे होतात. असे लिहूनही गॉल्गीना याची जाणीव होती की सिद्धांत हे पुरेशा पुराव्यांनीच सिद्ध करता येतात. यामुळेच गॉल्गी यांनी मानसिक आजारांवरील संशोधन थांबवून चेतासंस्थेच्या प्रायोगिक अभ्यासावर आपले लक्ष केंद्रित केले.
उती रंगद्रव्यीकरण आणि स्थिरीकरण या पद्धती एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर सुरू झाल्या होत्या. असे असूनही या पद्धती चेतासंस्थेची रचना समजून घेण्यासाठी अपुऱ्या व असमाधानकारक होत्या. १८७२ साली आर्थिक अडचणींमुळे गॉल्गीला शैक्षणिक संशोधन थांबवावे लागले आणि त्यांनी जवळच्या ठिकाणी असलेल्या एका इस्पितळात मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून पद स्वीकारले. त्या इस्पितळातील स्वयंपाकगृहाचेच रूपांतर त्यांनी प्राथमिक प्रयोगशाळेत केले व स्वतःचे चेतीय ऊतींच्या रंगद्रव्यीकरणाचे संशोधन पुन्हा सुरू केले.
गॉल्गी यांनी १८७३ साली संशोधक नोंद गॅझेटा मेडिका इटॅलिना (‘Gazzetta Medica Italina’) मध्ये प्रकाशित केली. त्यात ते लिहितात की प्रदीर्घ प्रयत्नानंतर धातू-बीजारोपणाद्वारे (Metal impregnation) चेतीय ऊतींच्या घटकांचे निरीक्षण करता येते. हा शोध होता ब्लॅक रिऍक्शनचा. यामध्ये पोटॅशियम बायक्रोमेट व सिल्वर नायट्रेट वापरून चेतीय ऊतींचा अभ्यास केला जातो. अशी उत्क्रांती घडवून आणणारी ही रंगद्रव्यीकरण पद्धती आजही वापरात आहे. या पद्धतीलाच गॉल्गी रंगद्रव्यीकरण (Golgi staining) पद्धत असेही म्हणतात. या पद्धतीमध्ये मर्यादित संख्येतील चेतापेशींचे बीजारोपण करता येते तसेच या पद्धतीमुळे पहिल्यांदाच चेतापेशींचे सुस्पष्ट चित्रण शक्य झाले. १८७५ साली गॉल्गीने ऑल्फॅक्टोरी बल्ब (Olfactory bulb) वरील लेख प्रकाशित केला. त्यामध्ये त्यांनी वापरलेल्या पद्धतीने दिसलेल्या चेतापेशींच्या घटकांचे चित्र काढलेले होते.
गॉल्गी यांनी १८८५ साली फाईन ‘ॲनाटॉमी ऑफ सेंट्रल नर्व्हस ऑर्गन’ या विषयावर एक प्रबंध प्रकाशित केला. १८८६ ते १८९२ या दरम्यान गॉल्गी यांनी मलेरियाला कारणीभूत असणाऱ्या प्लास्मोडियमचे जीवनचक्र आणि सततचा ताप व लाल रक्तपेशींमधून प्लास्मोडियमचे उत्सर्जन याबाबत महत्त्वपूर्ण संशोधन केले.
गॉल्गी यांनी १८९७ साली चेतापेशींमधील घटक शोधले. त्यानंतर त्याच्याच नावाने म्हणजे गॉल्गी अपरेटस (Golgi apparatus ) म्हणून ओळखले जाऊ लागले. १९०० साली किंग उंबेर्टो I (King Umberto I) याने गॉल्गीला सेनेटर म्हणून नेमले. १९१३ साली गॉल्गी रॉयल नेदरलँड्स अकॅडेमी ऑफ आर्टस् अँड सायन्सेसचे परदेशीय सदस्य झाले.
गॉल्गी १८८१ साली जनरल पॅथोलॉजी विभाग, पेव्हिआ विद्यापीठ येथे रुजू झाले. त्या ठिकाणी त्यांनी अतिशय कार्यशील अशी त्याच्या प्रयोगशाळेची ओळख ठेवली होती. त्या ठिकाणीच पुढे १९२२ सालचे शांततेचे नोबेल विजेते फ्रीडॉफ नॅन्सेन (Fridtjof Nansen), हे सुद्धा शिकले. याच प्रयोगशाळेत अडेलची नेग्रीने (Adelchi Negri) इंटरन्यूरोनल इन्क्लुजन्स नेग्री बॉडीचा शोध लावला. याचाच वापर रेबीजचे संक्रमण ओळखण्यासाठी होतो. याच प्रयोगशाळेत एमिलीओ वेरोटी (Emilio Veratti) यांनी पहिल्यांदा स्नायूपेशींमधील सार्कोप्लास्मिक रेटिक्युलमचा (Sarcoplasmic reticulum) उल्लेख केला.
गॉल्गी यांचा मृत्यू पेव्हिआ, इटलीमध्ये झाला.
पेव्हिआ विद्यापीठातील ऐतिहासिक संग्रहालयातील एक खोली गॉल्गी यांच्या संबंधित दस्तऐवजांसाठी ठेवण्यात आलेली आहे. १९०६ सालचे शरीरशास्त्राचे नोबेल गॉल्गी आणि सॅंटियागो रॅमॉन कॅजल (Santiago Ramon Cajal) यांना विभागून देण्यात आले.
संदर्भ :
- https://www.nobelprize.org/prizes/medicine/1906/golgi/biographical/
- https://www.nobelprize.org/prizes/medicine/1906/golgi/article/
- https://www.sciencedirect.com/science/article/pii/S0165017307000033
- https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/17639783
समीक्षक : रंजन गर्गे