चितळे, श्यामला दिनकर : (१५ फेब्रुवारी १९१८ – ३१ मार्च २०१३) श्यामला चितळे यांचा जन्म नाशिकमध्ये झाला. त्यांचे शिक्षण घरीच झाले आणि सोळाव्या वर्षी लग्न झाले. सासरच्या प्रोत्साहनामुळे बी.एससी. व एम.एससी.चे शिक्षण नागपूर येथे झाले. त्यानंतर, इंटरनॅशनल इडा स्मिथ शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी इंग्लंडमधील रेडिंग विद्यापीठातील सुप्रसिद्ध जीवाष्म शास्त्रज्ञ हॅरिस (Harris) यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच्.डी. मिळवली. भारतात परतल्यावर त्या नागपूर आणि मुंबई येथील विज्ञान संस्थांत वनस्पतीशास्त्रात अध्यापन आणि  संशोधन करण्यात निवृत्तीपर्यंत व्यस्त राहिल्या.

श्यामला चितळे या अश्मयुग वनस्पतीशास्त्र या विषयातील तज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. नागपूरच्या विज्ञान संस्थेत त्यांनी या विषयाचे एक उत्कृष्ट संशोधन केंद्र  स्थापन केले. अश्मयुगातील वनस्पतींच्या अवशेषांचे अनेक नमूने तेथील संग्रहालयात साठवले. क्रेटेशिअस काळातील, म्हणजे १३५ दशलक्ष वर्षापूर्वीच्या काळातील, वनस्पतींच्या तज्ञ म्हणून त्या ओळखल्या जात. मुंबईच्या विज्ञान संस्थेत काम करतानाही त्यांनी अश्मयुगातील वेगवेगळ्या काळातील वनपरिस्थिती (Ancient Forest Ecosystems)  दर्शवणाऱ्या चित्रांचा संग्रह तयार करून या विषयाची माहिती सर्वसामान्य नागरिकांना सहज समजेल अशा पद्धतीने मांडली.

भारतातील दक्खन पठाराच्या गाळातील थरांच्या उत्खननात अश्मीभूत वनस्पती अवशेषांवर संशोधन करताना त्यांना व त्यांच्या विद्यार्थ्यांना खोड, पाने, फुले, फळे यांचे ठसे आणि साचे मिळाले. सध्या अस्तित्वात असलेल्या वनस्पती प्रकारांशी तुलना केल्यावर त्या ठशांचे या वनस्पतींशी संबंध जोडण्यात त्यांना यश मिळाले. कार्बन डेटिंग तंत्राचा अवलंब करून त्या  ठशांतील वनस्पतींचा काळ ठरवता आला. अशा तऱ्हेने ओळख पटलेल्या अवशेषाना त्यांनी व सहकाऱ्यांनी या विषयातील तज्ञांच्या आदराप्रीत्यर्थ नावे दिली, जसे – सहानिओकार्पोन (फळ), शुक्लानथस (खोड), हरिसोस्ट्रोबस (फुले गुच्छ), चितळेकार्पोन (फळ), चितळे- पुष्पम (फूल), इत्यादी. त्यातील एक, इंडोवायटीस चितळेइ (बी), या द्राक्षाशी नाते असलेल्या अवशेषांचे नमूने चितळे यांनीच उभारलेल्या क्लिव्हलांड विद्यापीठाच्या वनस्पती अवशेष संग्रहालयात साठवलेले आहेत.

श्यामला चितळे यांनी १९९२ मध्ये स्थापन केलेल्या क्लीव्हलँड फोसिल सोसायटीतील संग्रहात त्यांनी जमा केलेले शेलमधील जीवाष्म नमूने ठेवलेले आहेत. हे शेल ठिसूळ असून संग्रहित करणे अशक्य ठरत होते. म्हणून  त्यातील जीवाणू अल्कोहोलने मारून आणि मेणाचा वापर करून ते जीवाष्म टिकवण्याची पद्धत प्रमाणित केली. ही पद्धत आज जगात सगळीकडे वापरली जाते.

हर्बेरीयममध्ये साठवण्यासाठी वनस्पती नमूने सुकवताना पाना-फुलांचा रंग जातो. रंग जाऊ नये यासाठी रॉकेल, एरंडेल यांची  प्रक्रिया करून पिव्हिसीत गरम इस्त्रीच्या दाबाखाली नमुने साठवण्याची पद्धतही उपयुक्त असते हे त्यांनी दाखवून दिले.

क्लीव्हलँड संग्रहालयात संशोधक म्हणून १९८० पासून तीन दशके कार्य करताना त्यांनी जीवाश्मांचे ६०० नमूने साठवले. त्यांच्या प्रयत्नाने त्या संग्रहालयात सुमारे २८,००० जीवाष्म नमूने साठवलेले आहेत, त्यात १५०० नमूने दगडी कोळशातील अवशेष आहेत. दहा कोटी वर्षांपूर्वी वनस्पती केवळ मुळे-पाने विरहित लव्हाळ्याच्या रुपात होत्या. क्लेव्हलांड्रोडेनड्रोन ओहायेन्सीस  ही लहान झुडूपासारखी  दिसणारी एक मीटर उंचीची वनस्पती क्लब मॉस असून त्याच्या वरच्या टोकाला असलेल्या फुलोरा-सदृश पिशवीत दोन प्रकारचे बीजाणू होते. श्यामला चितळे यांनी वर्णन केलेले हे झुडूप, हा मॉस-जीवाष्म, जगातील एकुलता एक नमूना आहे.

श्यामला चितळे यांनी १५० च्यावर शोध निबंध प्रसिद्ध केले आणि १४ विद्यार्थ्यांना पीएच्.डी. साठी मार्गदर्शन केले. नागपूरमध्ये असताना १९७० साली The Botanique हे वनस्पतीशास्त्रातील संशोधन लेखांना वाहिलेले नियतकालिक सुरु केले. सुमारे ६७ वर्षे भारत आणि अमेरिका येथे अथक संशोधन कार्यात मग्न असलेल्या श्यामला चितळे सन २०११ मध्ये अमेरिकेत निवृत्त झाल्या, तरी २०१२ मध्येही त्या नियमितपणे त्यांनी उभारलेल्या संग्रहालयात जात असत.

श्यामला चितळे यांना लखनौच्या सावित्री बिरबल सहानी फाउंडेशनने अश्मयुग वनस्पतीशास्त्रातील संशोधनाबद्दल पदक दिले, तर पुण्याच्या आघारकर संशोधन संस्थेने त्यांच्या आयुष्यभराच्या कार्याबद्दल गौरव केला. वनस्पती अवशेषाच्या नमुन्यांचे संग्रहालय स्थापन केल्याबद्दल ओहायो संस्थानाने कार्डीनल अवार्ड देऊन त्यांचा सन्मान केला.

अमेरिकेत त्यांचे  निधन झाले.

संदर्भ :

  • Kapgate, K., Manchester, R. and Pigg Kathleen B. Obituary. Pp.34-37.
  • Saoji, Aarti. 2013. Dr. (Mrs.) Shyamala Chitaley: An Ageless Allure. 21-24.
  • Both Ref. and other information from – The Botanique 17 (1-2)2013. Chitaley Memorial First Anniversary Volume, 31.03.2014.

 समीक्षक : चंद्रकांत लट्टू