चिटणीस, चेतन एकनाथ : (३ एप्रिल १९६१ – ) चेतन एकनाथ चिटणीस यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे वडील भौतिकशास्त्रज्ञ आणि आई जैवरसायनतज्ज्ञ असल्याने लहानपणापासून घरचे वातावरण विज्ञान विषयाला पोषक असे होते. शालेय शिक्षण अहमदाबादला झाल्यावर त्यांनी मुंबईच्या आय.आय.टी.मधून भौतिकशास्त्रातील एम.एस्सी. केली. पुढे ते ह्यूस्टनच्या राईस विद्यापीठातून भौतिकीमध्ये एम.एस. झाले. त्यानंतर  बर्कलेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठातून फुफ्फुसाच्या रोगाला कारणीभूत ठरणाऱ्या स्यूडोमोनॉस एरीगुनोसा  या परजीवीवर संशोधन करून त्यांनी पीएच्.डी. मिळवली.

भारतीयांना त्रस्त करणाऱ्या मलेरिया रोगावर त्यांनी लुईस मिलर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले. १९९५ साली ते इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग आणि बायोटेक्नॉलॉजी (ICGEB) या दिल्ली येथील संस्थेत संशोधक म्हणून कार्यरत झाले. चेतन चिटणीस यांचे सर्व लक्ष मलेरिया निर्मूलनावर प्रथमपासून होते.

मलेरियाचा संसर्ग झाल्यानंतर यकृत पेशीमध्ये परजीवीची बीजकवके (sporozoite) तयार होतात. यकृत पेशीतील परजीवीचे जीवनचक्र रक्तपेशीबाह्य चक्र या नावाने ओळखले जाते. यकृत पेशीमध्ये बीजकवकांचे भंजनपूर्व स्थितीमध्ये (schizont)   रूपांतर होते. बीजकवकांच्या भंजनपूर्व अवस्थेमुळे यकृत पेशी फुटते. लहान भंजनपूर्व अवस्था तांबड्या पेशीमध्ये प्रवेश करतात. एकदा तांबड्या पेशीमध्ये प्रवेश झाला म्हणजे त्यापासून मलेरियाच्या परजीवीची अमैथुन बीजे (merozoites) वाढतात. तांबड्या पेशीत शिरताना पेशीआवरणातून ती कोणत्या प्रकारे व कशाबरोबर सहबद्ध (ligand)  होतात यावर चेतन चिटणीस यांचे संशोधन आधारलेले आहे. जर अमैथुनबीजे पेशी आवरणाबरोबर सहबद्ध झालीच नाहीत व  सहबद्धतेचे कारण समजले तर मलेरियाचा प्रसार थांबवता येईल. तसेच तर त्यांचा पेशीमधील शिरकाव थांबेल. मलेरिया परजीवीची तांबड्या पेशीतील अवस्था मलेरियाच्या आजारास व मलेरियाच्या लक्षणास कारणीभूत आहे.

चेतन चिटणीस व त्यांच्या सहकार्‍यांनी तांबड्या पेशीवरील ग्राही प्रथिने व अमैथुनबीजे सहबद्ध होण्यातील रेण्वीय कारणे अमैथुनबीजांची नेमकी पद्धत शोधण्याचे ठरवले आहे. एकदा तांबड्या पेशीमध्ये अमैथुनबीजांचा प्रवेश झाला म्हणजे त्यांच्या शरीराच्या प्रतिक्षम यंत्रणेचा संबंध येत नाही व परिणामी मलेरियाची अनियंत्रित वाढ होते. यासाठी तांबड्या पेशीवरील ग्राही प्रथिने व तांबड्या पेशीबद्ध प्रतिजन प्रथिनांचा अभ्यास दोन मलेरियाच्या परजीवींचा चालू आहे. प्लास्झमोडीयम व्हायव्हॅक्स (Plasmodium vivax)   प्लाझमोडियम फॅल्सिपेरम (Plazmodiumfalciparuam) मधील विशिष्ट प्रथिने यासाठी कारणीभूत आहेत. एकदा या प्रथिनांचा अभ्यास पूर्ण झाला म्हणजे मलेरियाच्या लसीवर लक्ष केंद्रित करता येईल अशी खात्री चेतन चिटणीस यांनी दिली.

मलेरियाचे परजीवी तांबड्या रक्तपेशींना बांधले जाणार नाहीत असे द्रव्य शोधून काढण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. असे प्रतिद्रव्य मिळाले तर मलेरियावर निश्चित मात करता येईल असा विश्वास चेतन चिटणीस आणि त्यांच्या संशोधन सहकाऱ्यांना होता. भारतात परतल्यावर त्यांनी त्याच दिशेने संशोधन कार्य करण्यास सुरुवात केली. मलेरियाच्या परजीवीला बध्द करणारे प्रथिन तर त्यांनी शोधलेच परंतु त्याचबरोबर रक्तपेशीतील कोणते गुणसूत्र मलेरियाला कारणीभूत होते हेही शोधले.

चेतन चिटणीस यांना अनेक परितोषिकांनी गौरवण्यात आलेले आहे. त्यात युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया रिजेंटस फेलोशिप, ते फोगार्टी इंटरनॅशनल फेलो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ बेथेस्डा, अमेरिकन सोसायटी ऑफ मायक्रोबायॉलॉजी अॅवार्ड यंग सायंटिस्ट, डॉ. बी. एन. सिंग मेमोरियल अवार्ड ओरेशन ऑफ इंडियन सोसायटी ऑफ पॅरासायटॉलॉजी यांचा समावेश आहे. काउन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ँड इंडस्ट्रीयल रीसर्च यांनी त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनासाठी शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार हा भारताचा विज्ञानातील पुरस्कार देण्यात आला. जीवविज्ञानतील इन्फोसिस पुरस्कार मिळाला आहे. आजवर त्यांचे १०० शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले असून त्यांच्या नावावर तीन एकस्वे (पेटंट) आहेत. ते इंडियन अकॅडेमी ऑफ सायन्सेस आणि इंडियन नॅशनल सायन्स अकॅडेमी या संस्थांचे फेलो आहेत. २०१४ पासून चेतन चिटणीस  पॅरिस येथील मलेरिया पॅरासाइट बायॉलॉजी अ‍ॅन्ड व्हॅक्सीन युनिटमध्ये कार्यरत आहेत.

संदर्भ :

  • ‘Malaria Parasite Biology and Vaccines’ Unit, Institute Pasture Retrieved 31 March, 2017
  • Profile of Chetan Chitnis on the ICGEB homepage – International Centre for Genetic Engineering and Biotechnology, Retrieved 21 January, 2012

लेखक : मृणालिनी साठे

समीक्षक : मोहन मद्वाण्णा