चित्रे, शशिकुमार मधुसूदन : ( ७ मे १९३६ )

शशिकुमार मधुसूदन चित्रे हे भारतात जन्मलेले गणिती आणि खगोलशास्त्रज्ञ आहेत. चित्रे यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून गणित या विषयात बीएस्सी केले. त्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी ड्यूक ऑफ एडिंबरो ही शिष्यवृत्ती प्राप्त झाली. चित्रे यांनी नंतर केंब्रिज विद्यापीठातील पीटर हाऊस महाविद्यालयातून दुसरी पदवी संपादन केली. पुढच्याच वर्षी त्यांची पीटर हाऊस स्कॉलर म्हणून निवड झाली आणि त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. पुढच्या काळात त्यांनी केंब्रिज विद्यापीठाच्या उपयोजित गणित आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्र विभागातून पीएच्. डी. मिळवली.

चित्रे यांच्या कारकीर्दीची सुरुवात लीड्स विद्यापीठात व्याख्याते म्हणून झाली. तेथे ते ३ वर्षे होते. नंतर त्यांना कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी या संस्थेमध्ये काम करण्यासाठी विशेष अभ्यासवृत्ती मिळाली. ते १९६७ मध्ये भारतात परतले आणि मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये रुजू झाले. २००१ मध्ये निवृत्त होईपर्यंत ते याच संस्थेत कार्यरत राहिले. सध्या ते मुंबईच्या सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस या संस्थेत प्राध्यापक म्हणून काम पाहत आहेत. हे केंद्र अणु ऊर्जा आयोग आणि मुंबई विद्यापीठ यांनी स्थापन केले आहे. या शिवाय चित्रे जे. एन. टाटा न्यासाचे विश्वस्त, नेहरू तारांगणाचे सल्लागार आणि होमी भाभा अभ्यासवृत्ती मंडळाचे मानद कार्यकारी संचालक आहेत.

चित्रे यांचे संशोधन मुख्यत: सौर भौतिकशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र या विषयांशी संबंधित आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचे दुर्बिणीतून निरीक्षण केले असता त्यावर काळ्या रंगाचे सूक्ष्म ठिपके आढळून येतात. त्यांना सौर डाग असे म्हटले जाते. या डागांची संख्या तसेच त्यांचे स्थान यात बदल होत असतो. याशिवाय सूर्यामध्ये अनेक घडामोडी घडत असतात. सौर डाग आणि या घडामोडी यांचा एक आवृत्ति-काल असतो. या सगळ्या घटना सूर्याच्या बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे घडतात. हे क्षेत्र आणि त्यात होणारे बदल अतिशय गुंतागुंतीचे असतात. चित्रे यांचे संशोधन या बदलांशी संबंधित आहे. सूर्यामध्ये घडणाऱ्या घडामोडींचा परिणाम प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष रीतीने पृथ्वीवर होत असतो. त्यामुळे या संशोधनाचे महत्त्व मोठे आहे. बहिर्गोल भिंगामुळे प्रकाशकिरण वाकतात हे आपल्याला माहीत आहे. अंतराळातील एखाद्या वस्तूचे वस्तुमान प्रचंड असेल तर त्या वस्तुच्या जवळून जाणारे प्रकाश किरणही वाकतात असे आढळून आले आहे. त्या वस्तुचे गुरुत्वाकर्षण प्रचंड असल्याने असे घडते. या परिणामाला गुरूत्वीय भिंग परिणाम असे म्हणतात. चित्रे यांनी याही विषयात मोठे काम केले आहे. शशिकुमार चित्रे खालील संस्थांचे सन्माननीय सदस्य आहेत:

१. मॅक्स प्लांक इन्स्टिट्यूट फॉर एक्स्ट्रा टेरेस्ट्रीयल फिजिक्स

२.थर्ड वर्ड अकॅडेमी ऑफ सायन्सेस

३.रॉयल ॲस्ट्रोनॉमिकल सोसायटी

४.इंटरनॅशनल ॲस्ट्रोनॉमिकल युनियन

५. इंडियन अकॅडेमी ऑफ सायन्सेस

६. इंडियन नॅशनल सायन्स

७. नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सेस इन इंडिया

चित्रे यांनी केंब्रिज, प्रिन्स्टन, ससेक्स, कोलंबिया, व्हर्जिनिया अशा अनेक विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केले आहे. चित्रे यांच्या कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २०१२ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा नागरी सन्मान प्रदान केला. याशिवाय वेणू बापू स्मृती पदक आणि एम. पी. बिर्ला पुरस्कारसुद्धा त्यांना प्राप्त झाले आहेत.

संदर्भ :

लेखक : गिरीश पिंपळे / समीक्षक : हेमंत लागवणकर