तलवार, गुरुसरन प्रसाद : ( १९२६ )

गुरुसरन प्रसाद तलवार यांचा जन्म पंजाब मधील हिस्सार येथे झाला. पंजाब विद्यापीठातून त्यांनी बी.एससी. ऑनर्स व एम.एससी. (टेक ) आणि पॅरिसच्या पाश्चर इन्स्टिट्यूटमधून डी.एससी. मिळवली. बुंदेलखंड विद्यापीठातून त्यांना आणखी एकदा डी. एससी. प्रदान करण्यात आली. ट्युबिंगेन स्टुटगार्ड अ‍ॅन्ड म्युंचेन येथील पोस्ट डॉक्टरल अल्क्झांडर वॉन हॅम्बोल्ट फेलोशिप त्यांनी मिळवली होती. नव्याने सुरू झालेल्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) मध्ये बायोकेमिस्ट्री विषयाचे असोसिएट प्रोफेसर या पदावर त्यांची नियुक्ती झाली. येथे काम करीत असतानाच जागतिक आरोग्य संघटना व इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR-WHO) यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन केलेल्या  ‘प्रतिक्षमता  संशोधन व प्रशिक्षण’ या दक्षिण-पूर्व  एशिया केंद्राचे  १९७२ पासून १९९१ पर्यंत विभागप्रमुख होते.

राष्ट्रीय प्रतिरक्षा विज्ञान संस्थेची (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी ) १९८२ साली स्थापना झाल्यानंतर संस्थेचे पहिले संचालक म्हणून त्यांची नेमणूक झाली. इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनियरिंग अँड बायोटेक्नोलॉजी नवी दिल्ली येथे ते प्रोफेसर होते. २००६ साली निवृत्तीनंतर त्यांनी वैयक्तिक व त्यांना मिळणार्‍या संशोधन अनुदानातून नवी दिल्ली येथे तलवार रिसर्च फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली. आजही ते या संस्थेच्या संचालक पदावर कार्यरत आहेत.

त्यांनी १९७० च्या दशकात गर्भधारणा प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने प्रतिरक्षा विज्ञानाचा वापर कसा करता येईल यावर संशोधन करण्याचे ठरवले. त्यांनी मानवी जरायु गोनॅडोट्रॉपिन संप्रेरकाविरुद्ध (ह्यूमन कोरिऑनिक  गोनॅडोट्रॉपिन hCG ) प्रतिक्षमता प्रथिन विकसित करण्याचा प्रयत्न केला. बीजांड फलनानंतर हे संप्रेरक स्त्रवते.  ह्यूमन  कोरिऑनिक गोनॅडोट्रॉपिन शिवाय गर्भाशयात भ्रूणरोपण होत नाही. ह्यूमन कोरिऑनिक गोनॅडोट्रॉपिन प्रतिबंधक लस शोधून काढली तर गर्भधारणा होणार नाही असे त्यांचे म्हणणे होते. या संबंधीचा पहिला शोधनिबंध त्यांनी १९७६साली कॉन्ट्रॅसेप्शन (‘Contraception’)  या शास्त्रीय नियतकालिकात प्रसिद्ध केला. प्रतिबंधक लस दिल्यानंतर उपचार केलेल्या चारपैकी तीन महिलांना अकरा महिने गर्भधारणा झाली नाही. लसीकरणानंतर सोळा महिन्यांनी लसीचा परिणाम संपला. त्यांच्या शरीरात पुन्हा ह्यूमन कोरिऑनिक गोनॅडोट्रॉपिन स्त्रवू लागले. याचा अर्थ पुन्हा त्यांना गर्भधारणा होण्याची शक्यता उत्पन्न झाली.

त्यांच्या गर्भप्रतिबंधक लसीवर वैद्यकीय क्षेत्रातून टीका झाली. एवढे दिवस आजारावर लस प्रचलित होती. गर्भधारणा हा आजार नाही. असे असले तरी १९८६ साली तलवार यांनी तीन शासकीय रुग्णालयातील गर्भ प्रतिबंधक लसीच्या सुरक्षितता व चिकित्सा (क्लिनिकल) चाचण्या घेतल्या. सहा आठवड्यांच्या अंतराने १४८ प्रजननक्षम महिलांना त्यांनी गर्भप्रतिबंधक लसींची अंत:क्षेपणे दिली. या सर्व महिलांना चाचणीपूर्वी दोन अपत्ये झालेली होती. त्यांची चाचणीसाठी लेखी परवानगी मिळाली अशाच महिलांची यासाठी निवड केली होती. १९९२ व १९९३ साली केलेल्या चाचण्या सुरक्षितता, अपेक्षित परिणाम व लसीचा कालखंड संपल्यावर पुन्हा गर्भधारणा होणे या सर्व कसोट्यावर उतरल्या होत्या.

तलवार यांच्या निवृत्तीनंतर १९९४ साली  राष्ट्रीय प्रतिक्षमता विज्ञान संस्थेने गर्भप्रतिबंधक लसीवरील संशोधन थांबवले.  तरी २००६ साली अमेरिकेतून गर्भप्रतिबंध क्षेत्रामध्ये कार्य करणार्‍या  इंडो-अमेरिकन समितीतील एका उच्च अधिकार्‍याने गर्भप्रतिबंधक लसीवरील त्यांचे संशोधन तुम्ही पुन्हा चालू करण्याचे व त्यासाठी आवश्यक रक्कम देण्यास समिती तयार असल्याचे सांगितले. तलवार यांनी हे मान्य करून  जनुकीय अभियंत्रिकीतील नव्या तंत्राच्या वापरातून सुरक्षित व स्वस्त औद्योगिक उत्पादन करता येण्यासारखी लस विकसित केली. एचसीजी संप्रेरकाविरुद्ध प्रतिक्षमता प्रथिन यीस्ट (किण्व) पेशीमध्ये उत्पादित करता येईल असा जनुकीय बदल  त्यांनी यीस्ट पेशीत केला. त्याचबरोबर हिपॅटायटिस-बी लसीचे उत्पादन आता यीस्ट पेशीद्वारा  होऊ लागले आहे.

जागतिक मान्यताप्राप्त शास्त्रीय नियतकालिकातून त्यांचे आजपर्यंत सहाशेहून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. कुष्ठरोग, गर्भप्रतिबंधक लस व स्त्रियांच्या जननमार्गातील जीवाणू प्रतिबंधक वनस्पतिजन्य औषधे हे त्यांच्या संशोधनाचे विषय आहेत. दहा पुस्तके व एक प्रबंध (मोनोग्राफ) अशी त्यांची ग्रंथसंपदा आहे. विज्ञानातील त्यांच्या सहभागाबद्दल त्यांना भारत शासनाने पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव केला आहे.  फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांतर्फे  त्यांचा लीजन डी ऑनर या पदवीने गौरव केला आहे.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे