हठयोगाच्या परिभाषेनुसार ‘सूर्य’ म्हणजे ‘सूर्यनाडी’ अर्थात ‘उजवी’ नाडी व ‘चंद्र’ म्हणजे ‘चंद्रनाडी’ अर्थात ‘डावी’ नाडी. हठयोगात शरीराच्या उजव्या भागाचा निर्देश ‘सूर्यांग’ व डाव्या भागाचा निर्देश ‘चंद्रांग’ असा करतात. सूर्य उष्णतेचे तर, चंद्र शीतलतेचे द्योतक होय. त्यामुळे उजव्या नाकपुडीने श्वास घेतल्यास शरीरात उष्णता निर्माण होते व डाव्या नाकपुडीने श्वास घेतल्यास शीतलता निर्माण होते अशी हठयोगात कल्पना आहे.
सूर्यभेदन प्राणायामाचा विशेष हा की यामध्ये पूरक उजव्या नाकपुडीने व रेचक डाव्या नाकपुडीने करतात. भस्त्रिका प्राणायामाचे काही प्रकार सोडले तर हठयोगातील आठ प्राणायामांमध्ये उजव्या नाकपुडीने पूरक असणारा सूर्यभेदन हाच एकमेव प्राणायाम होय. भेदन शब्दाचा अर्थ ‘उघडणे’ किंवा ‘विकसित करणे’ असा आहे. हठयोगाचे उद्दिष्ट षट्चक्र भेदन करून सुषुम्नामार्गे कुंडलिनीचे उत्थापन करणे असे असल्यामुळे सूर्यभेदन प्राणायामाचेही अंतिम साध्य कुंडलिनी जागृती हे होय. घेरण्डसंहितेत असे म्हटले आहे की, सूर्यभेदन प्राणायामाद्वारे देहाग्नी प्रदीप्त करावा आणि कुंडलिनी शक्ती जागृत करावी (बोधयेत् कुण्डलीं शक्तिं देहानलविवर्धनम्| घेरण्डसंहिता ५.६७).
सूर्यभेदन प्राणायाम करताना साधकाने शक्यतो पद्मासनात बसावे. मूलबंध लावावा. डावी नाकपुडी उजव्या हाताच्या चार बोटांनी बंद करावी. क्षमतेप्रमाणे सावकाश पूरक करावा. पूरक करताना क्रमाने खांदे वर न्यावेत, छाती फुगवून खालच्या फासळ्या विस्तारित कराव्यात. या सर्व क्रिया विशेष प्रयासाविना कराव्यात. अशा रीतीने पूरक पूर्ण झाल्यावर कुंभकाला प्रारंभ करताना जालंधर बंध लावावा. अर्थात मस्तक खाली घ्यावे व हनुवटी छातीला लावावी. उड्डियान बंध लावावा अर्थात नाभीप्रदेश आत खेचावा. केसांच्या मुळांपासून ते नखाग्रांपर्यंत सर्व शरीरभर कुंभकाची जाणीव होईपर्यंत प्रयत्नपूर्वक कुंभक ठेवावा (आकेशादानखाग्राच्च निरोधावधि कुम्भयेत्| हठप्रदीपिका २.४९).
यानंतर रेचक करताना जालंधरबंध सोडावा. उजवी नाकपुडी उजव्या अंगठ्याने बंद करावी. डाव्या नाकपुडीने पूरकाच्या दुप्पट काळ मंदगतीने परंतु, न थांबता रेचक करावा. अशारीतीने सूर्यभेदन प्राणायामाचे एक आवर्तन पूर्ण होते.
दुसरे आवर्तन करताना रेचक पूर्ण झाल्यावर क्षणभरात डावी नाकपुडी चार बोटांनी बंद करावी. उजवी नाकपुडी मोकळी करावी व उजवीने पूरक करावयास प्रारंभ करावा. अशा रीतीने अखंडितपणे ठरविलेली आवर्तने दिवसातील निर्धारित वेळी पूर्ण करावीत. या आवर्तनांमध्ये मूलबंध निरंतर ठेवावा. रेचक पूरकापेक्षा दुप्पट असावा ही आदर्श स्थिती आहे. परंतु, तशी क्षमता नसली तर पूरकाच्या दीडपट रेचक ठेवावा. अपवादात्मक परिस्थितीत पूरकापेक्षा निदान थोडा तरी अधिक काळ रेचकाला द्यावा.
दृष्टी अर्धोन्मीलित असावी. सूर्यभेदन प्राणायाम करताना मनोधारणा पूरक-रेचकात श्वसनावर आणि कुंभकात ओटीपोटावर असावी अथवा पूरक-रेचक आणि कुंभकात सातत्याने मूलधार चक्रावर असावी. सूर्यभेदन प्राणायाम हिवाळ्यात अधिक प्रमाणात व उन्हाळ्यात कमी करावा. प्रारंभिक अवस्थेतील साधकाने कुंभक यथाशक्ती करावा. नाक चोंदले असता हा प्राणायाम वर्ज्य करावा. उच्च रक्तदाब (High blood pressure) असलेल्या रुग्णांनी सदर प्राणायाम टाळावा.
घेरण्डसंहितेनुसार सूर्याशी म्हणजे उजव्या नाकपुडीशी निगडीत असलेल्या प्राण, अपान, समान, उदान व व्यान ह्या शरीरातील पाच प्रमुख वायूंचे नाभिमूलापासून उत्थापन करावे. उजव्या नाकपुडीने पूरक करून आणि नंतर काळजीपूर्वक व अखंडपणे डाव्या नाकपुडीने त्यांचे रेचन करावे. (प्राणोऽपान: समानश्चोदानव्यानौ तथैव च| सर्वे ते सूर्यसम्भिन्ना नाभिमूलात्समुद्धरेत्|| इडयारेचयेत्पश्चाद्धैर्येणाखण्डवेगत:|, घेरण्डसंहिता ५.५९, ६५)
सूर्यभेदन प्राणायामामुळे पुढील लाभ होतात — मस्तकातील दोष दूर होतात. शरीरातील कृमी व अनिष्ट जीवाणू नाहीसे होतात. पचनक्रिया सुधारते. वातदोष नाहीसे होतात (कपालशोधनं वातदोषघ्नं कृमिदोषहृत्| पुन: पुनरिदं कार्यं सूर्यभेदनमुत्तमम्|| हठप्रदीपिका २.५०). या प्राणायामाच्या साधनेने परानुकंपित स्वयंचलित चेतासंस्थेच्या विकृत प्रभावामुळे होणारे दमा, सायनसायटीस, हायपोथायरॉडीझम, निम्न रक्तदाब (Low blood pressure), स्थूलता असे विकार व आजार दूर होण्यास मदत होते. शरीर व मन तरुण बनते. त्यामुळे हा प्राणायाम ‘जरामृत्युविनाशक’ आहे असे हठप्रदीपिका व घेरण्डसंहिता या ग्रंथांमध्ये म्हटले आहे (कुम्भक: सूर्यभेदस्तुजरामृत्युविनाशक:| हठप्रदीपिका २.५०, घेरण्डसंहिता ५.६७). शरीरात अधिक उष्णता निर्माण होते. सूर्यनाडी व सूर्यांगाचा पूर्ण विकास होतो. साधक कृतीशील बनतो. शरीरातील उष्णता वाढल्यामुळे कुंडलिनी उत्थापनाला मदत होते.
पहा : केवली प्राणायाम, प्राणायाम, सहित प्राणायाम.
समीक्षक : दुर्गादास सावंत