महर्षि पतंजलींनी योगसूत्रांमध्ये अष्टांगयोगाचे विवेचन केलेले आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही योगाची आठ अंगे आहेत. यांपैकी पहिली पाच अंगे योगाचे बहिरंग, तर शेवटची तीन अंगे योगाचे अंतरंग आहेत.

पतंजलींनी योगाची व्याख्या ‘चित्ताच्या वृत्तींचा निरोध’ अशी केली आहे. चित्ताच्या वृत्ती संपूर्णपणे निरुद्ध होणे अर्थात् चित्त निर्विचार अवस्थेमध्ये राहणे, हेच योगाचे प्रमुख लक्ष्य आहे. परंतु, चित्तामध्ये प्रत्येक क्षणी एकामागून एक विचार येत राहतात, ते कधीही थांबत नाहीत. योगसाधनेद्वारे चित्ताच्या अनेक वृत्तींकडून एक वृत्तीपर्यंत जाणे व नंतर ती एक वृत्तीही नष्ट होणे, असा प्रवास होणे अपेक्षित आहे. या प्रवासात केल्या जाणाऱ्या ज्या साधनांमध्ये चित्ताव्यतिरिक्त शरीर, इंद्रिये, प्राण या अन्य घटकांचा समावेश आहे, त्यांना बहिरंग योग आणि ज्या साधना फक्त चित्ताशीच संबंधित आहेत, त्यांना अंतरंग योग असे म्हटले जाते. ‘बहि:’ म्हणजे बाहेर, अन्यत्र. चित्ताव्यतिरिक्त अन्यत्र, बाहेरही जो योगाभ्यास केला जातो, तो बहिरंग योग होय. केवळ चित्ताद्वारेच केला जाणारा योगाभ्यास म्हणजे अंतरंग योग होय.

अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे पाच यम आहेत. शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान हे पाच नियम आहेत. या यम-नियमांचे अनुष्ठान चित्ताबरोबरच शरीर, ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये यांसाठीही आहे. आसनांचा अभ्यास चित्त आणि शरीर यांसाठी तसेच प्राणायामाचा अभ्यास चित्त आणि प्राण यांसाठी तर प्रत्याहाराचा अभ्यास हा चित्त आणि इंद्रिये यांसाठी आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार या पाच अंगांचे अनुष्ठान चित्ताबरोबरच अन्य साधनांद्वारेही केले जात असल्यामुळे त्याला बहिरंग योग असे म्हणतात. धारणा, ध्यान आणि (संप्रज्ञात) समाधी हे केवळ चित्ताद्वारेच होत असल्यामुळे या तीन साधनांना अंतरंग योग असे म्हणतात. ध्यान करताना किंवा समाधीमध्ये डोळे उघडे ठेवून एखाद्या वस्तूकडे बघणे अनिवार्य नसून केवळ चित्ताचीच त्या वस्तूवर एकाग्रता असणे आवश्यक असते. डोळे न मिटता दिव्याची ज्योती इत्यादी वस्तूकडे सलग पाहत राहणे, या अभ्यासाला त्राटक असे म्हणतात. परंतु, त्राटकापेक्षा धारणा, ध्यान आणि समाधी वेगळे आहेत. त्राटक हा इंद्रियांद्वारे केला जाणारा अभ्यास आहे, परंतु धारणा, ध्यान आणि समाधी यांचा अभ्यास केवळ चित्ताद्वारे होतो.

जरी यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार या पाच अंगांच्या तुलेनेने धारणा, ध्यान आणि समाधी यांना अंतरंग योग म्हटले असले, तरीही निर्बीज समाधीच्या तुलनेत त्यांना बहिरंग म्हटले जाते. धारणा, ध्यान, समाधी यांना एकत्रितपणे संयम अशी संज्ञा आहे. धारणा, ध्यान, समाधी यांत चित्त एकाग्र अवस्थेत असल्यामुळे चित्तात एक वृत्ती असते, परंतु निर्बीज समाधीमध्ये चित्तामध्ये एकही वृत्ती नसते. त्यामुळे निरुद्ध चित्ताच्या तुलनेत एक वृत्ती असणारे एकाग्र चित्त हे बहिरंग समजले जाते.

योग्याने प्रथम यम इत्यादी बहिरंग योगाचा आणि नंतर धारणा इत्यादी अंतरंग योगाचा अभ्यास करावा, ज्यामुळे चित्तातील सर्व अशुद्धी नष्ट होऊन योग्याला विवेकख्याती प्राप्त होते व कालांतराने निर्बीज समाधीद्वारे कैवल्य प्राप्त होते.

पहा : नियम, यम.

                                                                                                                                                                                                                           समीक्षक : कला आचार्य