दामोदर अच्युत कारे : ( ४ मार्च १९०९ – २३ सप्टेंबर १९८५ ). गोमंतकीय मराठी कवी. हे बा. भ. बोरकरांचे समकालीन होते. या दोघांचे सौहार्द होते. समांतरपणे त्यांची काव्यनिर्मिती चाललेली होती. दोघांची काव्यमैफल सजायची. दा. अ. कारे यांचे वडील अच्युत कारेही कविता करायचे. ज्योत्स्ना, वागीश्वरी, प्रतिभा, पारिजात, यशवंत, साहित्य, विहंगम, रत्नाकर आणि लोकशिक्षण या वाङ्ममयीन नियतकालिकांनी वाङ्मयोपासकांचे लक्ष वेधून घेतले होते. काव्यक्षितिजावर अनिल, कुसुमाग्रज, पु. शि. रेगे, अनंत काणेकर, वा. रा. कांत, श्रीकृष्ण पोवळे, कृ. ब. निकुंब, इंदिरा संत आणि संजीवनी मराठे इत्यादी कवी-कवयित्रींनी आपले स्थान निर्माण केले होते. तत्कालीन नियतकालिकांनी त्यांच्या वाङ्मयीन अभिरुचीचे भरण-पोषण केले होते. या आल्हाददायी वातावरणात वयाने तरुण असलेल्या आणि मनाने उभारी घेतलेल्या बा. भ. बोरकर आणि दा. अ. कारे या कविद्वयांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली. गोवा त्या काळात पोर्तुगीज राजवटीखाली होता. परिस्थिती सर्वतोपरी प्रतिकूल होती. मराठी भाषेवर अनेक बंधने होती. अशाही काळात दा. अ. कारे यांनी काव्यनिर्मिती केली हे विशेष.
दा. अ. कारे यांचा जन्म काकोडे येथे झाला. ते अवघ्या तीन वर्षांचे असतानाच त्यांच्या आईंचे निधन झाले. चौदाव्या वर्षी त्यांना पितृवियोग सहन करावा लागला. मराठी प्राथमिक शिक्षणानंतर त्यांचे पोर्तुगीजमधून लिसेवच्या तिसऱ्या वर्षापर्यंत शिक्षण झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांना शिक्षण घ्यावे लागले. ते अतिशय हुशार विद्यार्थी होते. पोर्तुगीजमधील उत्कृष्ट ग्रंथांचे त्यांनी परिशीलन केले होते. संवेदनक्षम वयात त्यांच्यावर तत्कालीन जनमानसातील स्पंदनाचा सखोल संस्कार झाला होता. मडगाव हे त्या काळात गोमंतकातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळींचे केंद्र होते. तरुणांची मने विविध भाषांमधील वाङ्मयाच्या वाचनाने आणि मनन-चिंतनाने घडत होती. मराठी बरोबरच बंगाली आणि गुजराथी साहित्य त्या काळात वाचले जात असे. रवींद्रनाथ टागोरांचे साहित्य अभ्यासता यावे म्हणून त्यांनी बंगाली भाषा शिकून घेतली होती. गोमंत विद्या निकेतन या संस्थेचे ग्रंथालय समृद्ध होते. शिवाय घरात वाचनाला अनुकूल वातावरण होते. वडीलधाऱ्या माणसांना वाचनाची प्रचंड आवड होती. वाचनानंतर चिकित्सकपणे चर्चा करणे सर्वांना आवडायचे. चित्रमय जगत् या मासिकाचे आणि केसरी चे प्रकट वाचन घरात चालायचे.
एकीकडे प्रचलित राजकीय आणि सामाजिक विचारप्रवाहांशी त्यांचा परिचय होत होता, तर दुसरीकडे नियतकालिकांतून प्रसिद्ध होणाऱ्या त्या काळातील नामवंत कवींच्या कविता त्यांच्या वाचनात येत होत्या. त्यांनी आणि बोरकरांनी मिळून केशवसुत, बालकवी, गोविंदाग्रज आणि ना. वा. टिळक इत्यादींची कविता आस्थापूर्वक वाचली होती. विशेषतः केशवसुतांच्या कवितेतील क्रांतिप्रवणता, समतावाद आणि मानवतावाद यांमुळे कारे प्रभावित झाले होते. बालकवींची भावकोमल कविता त्यांना विशेष भावली. गोविंदाग्रजांच्या कवितेतील भावनांचे नाट्य आणि ना. वा. टिळकांच्या कवितेतील ऋजुता त्यांच्या मनात रुजली. कविवर्य भा. रा. तांबे यांची कविता वाचत असताना बोरकर आणि कारे मंत्रमुग्ध होत असत. रविकिरणमंडळातील माधव ज्युलियन, यशवंत आणि गिरीश यांच्या कवितेचाही परिणाम त्यांच्यावर झाला. आपल्या साहित्यसाधनेच्या काळात कारे यांनी कथा, कादंबऱ्या, नाटके आणि वैचारिक वाङ्ममयाचे सखोल वाचन केले. चरित्रार्थाचे साधन म्हणून गोमंत छापखाना हे स्वतःचे मुद्रणालय त्यांनी चालविले.
दा. अ. कारे यांचा नंदादीप हा कवितासंग्रह १९३४ साली प्रसिद्ध झाला. प्रख्यात समीक्षक वा. म. जोशी यांनी या संग्रहाला विवेचक प्रस्तावना लिहिली आहे. नंदादीप मधील कवितेतील सात्त्विक भावना, कल्पनाविलास, अकृत्रिम निसर्गभक्ती आणि अंत:करण पुर्वकता या गुणांचा त्यांनी गौरव केलेला आहे. वि. स. खांडेकर आणि वा. रा. ढवळे यांच्यासारख्या विचक्षण वाङ्मयोपासकांनी या काव्यसंग्रहाचा सहृदयतेने परामर्श घेतला आहे. या संग्रहातील ‘नंदादीप’ या कवितेत कविमनाची ऋजुता आणि उत्कटता नेमकेपणाने आणि नीटसपणे व्यक्त झाली आहे. यातील बहुतांश कविता निसर्गवर्णनपर आहेत. यासंदर्भात ‘उष:काल’, ‘सागरास’, ‘पावसाळ्यातील दृश्य’, ‘शिखरावरून’, ‘चांदणे’, ‘हिमालय’, ‘प्रभात-पूजा’, ‘सृष्टीच्या अंगणात’, ‘बिजेची कोर’, ‘दुपार’ आणि ‘चंद्रकिरण’ या कविता उल्लेखनीय आहेत. ‘गोमन्त देवी’ या कवितेत गोमंतकाचे निसर्गवैभव तन्मयतेने वर्णिलेले आहे. ‘उष:काल’ या कवितेत निसर्गलय आणि मानवी भावभावनांची लय यांची समतानता साधली आहे. ‘सागरास’ या कवितेत कवीला असीम, अथांग सागर पाहून मानवी हृदयाची क्षुद्रता जाणवते. ‘चांदणे’ या कवितेत इंदू उदयाला येताना चारुता घेऊन आलेला आहे असे कवी म्हणतो. या कवितेतील भावनाशय अत्यंत आल्हाददायी आहे. ‘हिमालयास’ या कवितेत केवळ निसर्गवर्णन नाही. त्याच्या बाह्यसौंदर्याबरोबर तो भारतीय संस्कृतिसंचिताचा मानदंड आहे असे त्याला वाटते. कवीने प्रेमभावना व्यक्त करणाऱ्या मोजक्याच कविता लिहिल्या आहेत. ‘अलक्षित प्रेम’, ‘मधुर तृप्ति’, ‘लाजरी’, ‘संगीत परिणती’, ‘यौवनजागृती’ आणि ‘सख्या रे, ये आता धावून’ या कवितांत प्रीतिविश्वातील मुग्ध भावनांचा संयत स्वरात कवीने आविष्कार केलेला आहे. ‘आत्मयज्ञ’ या कवितेत स्वातंत्र्याविषयीची आकांक्षा कवी उत्कटतेने व्यक्त करतो. ‘महात्म्यास’ या कवितेत गांधीजींच्या जीवितकार्याचा मुक्तपणे गौरव केला आहे.
दा. अ. कारे यांच्या कविता लोकशिक्षण, प्रतिभा, ज्योत्स्ना, वागीश्वरी, पारिजात आणि रत्नाकर या नावाजलेल्या नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या. कवितेशीवाय काही लघुनिबंध त्यांनी लिहिले. थोडेफार समीक्षात्मक आणि संशोधनात्मक लेखनही त्यांनी केले. ‘घन:श्याम सुंदरा’ ही भूपाळी होनाजी बाळा यांची नसून गोमंतकीय कवी विठ्ठल केरीकर यांची आहे हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. दा. अ. कारे जुन्या पिढीतील कवी असले तरी कवितेतील नव्या प्रवाहांकडे स्वागतशील दृष्टिकोनातून ते पाहत होते. दा. अ. कारे यांच्या सदभिरुचीसंपन्न व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पैलू म्हणजे त्यांची सामाजिक बांधिलकी आणि शिक्षणविषयक आस्था होय. त्यामुळेच गोव्यातील मडगावच्या समाज सेवा संघाच्या महिला आणि नूतन मराठी विद्यालयाच्या व्यवस्थापनाशी अनेक वर्षे ते निगडीत होते. गोमंत विद्या निकेतन या नामवंत संस्थेशी त्यांचा अत्यंत निकटचा संबंध होता. गोवामुक्तीनंतर १९६२ साली पणजी येथे भरलेल्या ११ व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद त्यांनी भूषविले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी या संमेलनाचे अध्यक्ष होते.
गोव्यातील मडगावला त्यांचे निधन झाले.
संदर्भ : कामत, श्रीराम, पांडुरंग (संपा.), मराठी विश्वचरित्र कोश, विश्वचरित्र संशोधन केंद्र, पणजी (गोवा), २०००.