सातोस्कर, बाळकृष्ण दत्तात्रेय : (२६ मार्च १९०९ – २७ नोव्हेंबर २०००). संपादक, अनुवादक, सृजनशील साहित्यिक, संशोधक, ग्रंथालयशास्त्राचे तज्ज्ञ आणि प्रकाशक म्हणून मराठी साहित्यजगताला ज्ञात असलेले गोव्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक. साहित्यनिर्मितीबरोबरच गोमंतक ग्रंथसंस्कृती रुजावी म्हणून त्यांनी मौलिक स्वरूपाचे कार्य केले आहे. मुक्तिपूर्व काळात आणि मुक्तीनंतरच्या काळात गोमंतक मराठी साहित्य संमेलने भरविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. पारतंत्र्याच्या काळात स्वातंत्र्याची धुनी प्रज्ज्वलित करणारे ते विचारपीठ होते. याच कारणास्तव पोर्तुगीज सत्तेने त्यांच्यावर जाचक बंधने आणली. अशा वेळी त्यांनी साहित्य संमेलने गोव्याबाहेर भरविली.

हे व्यासपीठ निरंतर जागृत आणि वर्धिष्णू स्वरूपात कसे राहील याचा सातोस्करांनी प्रतिकूल परिस्थितीत ध्यास घेतला. गोवा मुक्ती नंतर चौगुले उद्योगसमूहाने सुरू केलेल्या गोमंतक  या पहिल्या मराठी दैनिकाचे संपादक होण्याचा मान त्यांना प्राप्त झाला. त्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान, कर्तृत्व आणि अनुभवसंपन्नता हे गुण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होते. राष्ट्रीय वृत्ती, प्रगल्भ जीवनदृष्टी, साहित्याबरोबरच चित्रकला, शिल्प, संगीत आणि नृत्यकला या कलांविषयी ममत्व बाळगणारे रसज्ञ अशी त्यांची ख्याती होती. स्थापत्य शास्त्राविषयीही त्यांना कुतूहल वाटायचे.

बा. द. सातोस्कर यांचा जन्म माशेल येथे झाला. प्रारंभीचे शिक्षण त्यांनी पोर्तुगीजमधून घेतले. नंतर ते इंग्रजी शिक्षणाकडे वळले. म्हापशाचे सारस्वत विद्यालय हे त्यांना लाभलेले वरदान होते. नाडकर्णी गुरुजींच्या मार्गदर्शनामुळे सातोस्करांच्या अष्ट्पैलू व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली. काका दणाईतांसारखे शिक्षणप्रेमी आणि प्रागतिक विचारांचे गृहस्थ या विद्यालयाचे चालक होते. ते विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहन देत असत.

साहित्यक्षेत्रात नावलौकिक मिळवलेले लक्ष्मणराव सरदेसाई, जयवंतराव सरदेसाई, व्यंकटेश पै. रायकर आणि शिक्षणक्षेत्रात मौलिक कार्य केलेले पणजीच्या पीपल्स हायस्कूलचे संस्थापक मंगेश फोंडू ऊर्फ लाला सुर्लकर हे सातोस्करांचे जीवश्चकंठश्च स्नेही होते. वेळोवेळी लाभलेल्या मित्रांमुळे सातोस्करांच्या वाङ्मयीन पिंडधर्माचे पोषण झाले. रघुवीर चिमुलकर, दीनानाथ दलाल आणि रघुवीर मुळगावकर या प्रख्यात चित्रकारांचा सहवास त्यांना लाभला.

लेखक म्हणून लौकिक प्राप्त होण्यापूर्वी मासिकांचे संपादन करण्याची जबाबदारी सातोस्करांनी स्वीकारली होती. गोमंतकाच्या सांस्कृतिक पुनरुत्थानाचे अध्वर्यू  पुरुषोत्तम वा. शिरगावकर यांनी १९११ मध्ये पणजीत प्रभात  हे साप्ताहिक सुरू केले. ते अकाली कालवश झाले. त्यांची स्मृती कायम राहावी म्हणून त्यांच्या शिष्यांनी प्रभात साप्ताहिकाचे मासिकात रूपांतर केले. सातोस्करांचे मामा जनार्दन नारायण पै अस्नोडकर प्रभातचे संपादक होते. त्यांनी सांगितल्यानुसार सातोस्करांनी संपादनाची जबाबदारी स्वत:कडे घेतली. त्यावेळी ते मुंबईच्या सेंट झेवियर कॉलेजमध्ये मराठी विषय घेऊन बी. ए. च्या वर्गात शिकत होते. तत्पूर्वी त्यांनी मुंबईत वास्तव्य करणाऱ्या आणि गोमंतक हिंदू विद्यार्थी मंडळ म्हणून कार्यरत असलेल्या गोमंतकीय तरुणांच्या ग़ोमंतक त्रैमासिक  या नियतकालिकाचे संपादन केले. १९४७ – १९४८ या वर्षात नॅशनल काँग्रेस, गोवाच्या आमचें गोंय  या मुखपत्राचेही त्यांनी संपादन केले. कथावाङ्मयाला वाहिलेल्या कथासागर, विसावा  व दुधसागर या मासिकांचे संपादन त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडले. महाराष्ट्र ग्रंथालय संघाच्या साहित्य सहकार  या मासिकाचे संपादनही त्यांनी केले.

बा. द. सातोस्कर गोव्यात आले त्याच सुमारास त्यांनी गोमंतकाच्या प्रादेशिक पार्श्वभूमीवरची जाई  ही कादंबरी लिहिली. बदलत्या समाजातील नातेसंबंधांचे चित्रण या कादंबरीत आढळते. प्रेमभावनेचा प्रगल्भ आविष्कार तिच्यात आहे. ललित कलांचा सातोस्करांनी जो अभ्यास केला होता, आस्वाद घेतला होता त्याचे फलित म्हणजे त्यांच्या मेनका  आणि अनुपा  या कादंबऱ्या. मेनका या कादंबरीत एका गानतपस्विनीचे आणि मनस्विनीचे चित्रण सातोस्करांनी तन्मयतेने केले आहे. तिच्या भावजीवनातील चढउतार आणि संगीतकलेत नैपुण्य मिळविण्यासाठी तिने केलेल्या खडतर साधनेचा आलेख येथे रेखाटला आहे. अनुपा  ही एक चित्रकाराच्या जीवनावर आधारलेली कादंबरी. आधुनिक जीवनप्रणालीत मूल्यऱ्हासाचे चित्रण या कादंबरीत आहे.

आज मुक्त चांदणे ही गोमंतकाच्या मुक्तिसंग्रामावर आधारलेली दोन भागांत प्रसिद्ध केलेली कादंबरी. १८ जून १९४६ रोजी राममनोहर लोहिया यांनी या लढ्याचे रणशिंग फुंकले. १९ डिसेंबर १९६१ रोजी गोमंतकाच्या मुक्तीची पहाट उजाडली. १९४६ ते १९६१ या कालखंडातील महत्त्वपूर्ण घटना, त्यात गुंतलेल्या माणसांच्या मनातील भावनांदोलनांचे प्रभावी चित्रण सातोस्करांनी केले आहे. या लढ्याशी असलेला साक्षीभाव त्यांनी जागविला आहे. निकटच्या भूतकाळातील अभूतपूर्व जनआंदोलनाचे वास्तव चित्रण केले आहे. या कादंबरीचा नायक विश्वनाथ हा संवेदनशील, काव्यात्म वृत्तीचा तरुण आहे; तितकाच तो कृतिशीलही आहे. या कालपटावरील व्यक्तिचित्रण करीत असताना अपरिहार्यपणे तत्कालीन राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ उलगडले जातात. स्वातंत्र्यसंग्रामाचे वस्तुनिष्ठ चित्र उभे करण्यात सातोस्कर यशस्वी झाले आहेत. रामायण आणि महाभारत हे त्यांच्या अखंड चिंतनाचे विषय. परिणत वयात रामायण-महाभारतातील व्यक्तिरेखांवर त्यांना नव्याने प्रकाश टाकावा असे वाटले. श्रीरामाच्या जीवनावर त्यांनी अभिराम  ही कादंबरी लिहिली आणि श्रीकृष्णाच्या जीवनावर वासुदेव  ही कादंबरी लिहिली. पर्ल बक यांच्या गुड अर्थचे धरित्री  या नावाने भाषांतर केले आणि त्यांच्या मदर या कादंबरीचा आई  या नावाने अनुवाद केला. चार्ल्स डिकन्सच्या ऑलिव्हर ट्विस्टचा दिग्या  या नावाने त्यांनी अनुवाद केला. या त्यांच्या सुरूवातीच्या अनुवादित कादंबऱ्या. मराठी कादंबरीचे अनुभवक्षेत्र वाढविण्यात सातोस्कर यांनी महत्त्वपूर्ण हातभार लावला आहे.

प्रीतीची रीत आणि अभुक्ता  हे त्यांचे दोन कथासंग्रह. द्राक्षांचे घोस  आणि पंचविशीतले पाप  हे त्यांचे अनुवादित कथासंग्रह. वि. स. सुखटणकर यांच्या सह्याद्रीच्या पायथ्याशी  या प्रादेशिक कथासंग्रहापासून प्रेरणा घेऊन कुळागर हा बारा कथाकारांच्या प्रादेशिक कथांचा संग्रह १९३७ मध्ये त्यांनी संपादित केला.

उदंड जाहले पाणी  हे सातोस्करांनी एकमेव नाटक लिहिले. मगध साम्राज्यात माजलेली बेबंदशाही, चाणक्याच्या मदतीने चंद्रगुप्त मौर्याने केलेली राजक्रांती हे आशयसूत्र घेऊन हे ऐतिहासिक नाटक त्यांनी लिहिले. शांग्रीला  हा त्यांचा एकमेव ललितनिबंधसंग्रह.  सातोस्करांच्या श्रद्धांजली आणि स्मरण या दोन पुस्तकांत व्यक्तिचित्रणपर लेख आहेत. त्या त्या व्यक्तींविषयीचा कृतज्ञताभाव, आत्मनिष्ठतेबरोबरच ही व्यक्तिसंस्मरणे हृद्य आहेत. येथे देवांची वसती  या त्यांच्या पुस्तकात गोमंतकातील प्रसिद्ध मंदिरांची आणि ऐतिहासिक स्थळांची माहिती व्युत्पन्नतेने करून दिली आहे. सातोस्कर यांचे बादसायन  हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.

बा. द. सातोस्करांनी यांनी संशोधनात्मक लेखनातही नाममुद्रा उमटविली. गोमंतकीय मराठी साहित्याचे शिल्पकार आणि गोमंतकीय मराठी साहित्याचे आधुनिक शिल्पकार  हे त्यांचे दोन महत्त्वाचे समीक्षात्मक ग्रंथ. गोमंतकीय मराठी वाङ्मयेतिहासाच्या पहिल्या पाऊलखुणा या लेखनात आहेत. मराठी मासिकांचे पहिले शतक  हा ग्रंथ माहितीपूर्ण आणि मौलिक दस्तऐवज आहे. एकोणिसाव्या शतकाच्या प्रबोधन युगातील महत्त्वाच्या नियतकालिकांच्या कार्याचा त्यांनी मागोवा घेतला. शि. रा. रंगनाथन् या ग्रंथालयशास्त्रमहर्षीने रूढ केलेले ‘द्विबिंदू वर्गीकरण’ सुलभ रीतीने कळावे म्हणून त्यांनी द्विबिंदू वर्गीकरणपद्धती व तिचा मराठी ग्रंथालयात उपयोग  हे पुस्तक लिहिले. याशिवाय ग्रंथ वर्गीकरण : तात्त्विक हे पुस्तक त्यांनी लिहिले.

बा. द. सातोस्कर यांनी लिहिलेला गोमंतक : प्रकृती आणि संस्कृती  हा त्रिखंडात्मक बृहद्ग्रंथ म्हणजे त्यांच्या संशोधनकार्याचा कलशाध्याय होय. इतिहास, संस्कृतिशोध, समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्र अशी आंतरज्ञानशाखीय मिती या ग्रंथाला लाभली आहे. अडीच हजार वर्षांतील गोमंतकाच्या इतिहासाचे पर्यालोचन त्यांनी केले आहे. प्रकाशक म्हणूनही दर्जेदार पुस्तके सातोस्करांनी प्रसिद्ध केली. अनंत काणेकरांचे आमची माती आमचे आकाश (१९५०) हे प्रवासवर्णन त्यांनी प्रसिद्ध केले.

बा. द. सातोस्कर यांनी मुक्त गोमंतकात पुन्हा आल्यावर येथील मराठी साहित्याच्या चळवळीला वाहून घेतले. ग्रंथालयशास्त्राच्या अभ्यासाला चालना देण्यात त्यांचे योगदान फार मोठे आहे. सागर  हे वार्षिक त्यांनी १९६७ ते १९८८ पर्यंत नियमितपणे संपादित केले. बा. द. सातोस्करांना त्यांच्या वाङ्मयसेवेसाठी अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. गोमंतक : प्रकृती आणि संस्कृती या ग्रंथाच्या दुसऱ्या खंडाला ‘केसरी-मराठा ट्रस्ट’चा न. चिं. केळकर पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. याशिवाय भारत कार हेगडे देसाई पुरस्कार व कृष्णदास शामा पुरस्कार हे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. गोवा कला अकादमीतर्फे सर्वोत्कृष्ट लेखनासाठी दिल्या जाणाऱ्या गोमंत शारदा पुरस्काराचे ते पहिले मानकरी ठरले. १९८२ साली मंगेशी येथे भरलेल्या १७ व्या अ. गो. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना प्राप्त झाला. बा. द. सातोस्कर हे साहित्य जगतात दादासाहेब सातोस्कर या नावाने ज्ञात आहेत.

वयाच्या ९१ व्या वर्षी माशेल येथे जन्मगावी त्यांचे निधन झाले.

संदर्भ : कामत, श्रीराम पांडुरंग (संपा), मराठी विश्वचरित्र कोश, खंड ५, गोवा,२००७.