तामुझ हा मेसोपोटेमियन देव असून तो सुमेरियन दुम्यूझी (Dumuzi) म्हणून ओळखला जातो. हा प्रजननाचा देव मानला गेला आहे. त्याचप्रमाणे वसंत ऋतुमधील निसर्गातील नवनिर्मितीचा तो पालकदेव आहे. तो चिरतरुण मानला गेला आहे. तामुझचा पहिला उल्लेख तिसऱ्या राजवंशाच्या काळात येतो; पण त्याचा पंथ हा त्याहीपेक्षा प्राचीन असावा. हा पंथ प्राचीन सुमेरमधील सर्व प्रांतांत पसरलेला होता. त्याचे मुख्य ठिकाण एडिन हे नगर असून तो एडिनचा नागरदेव होता. तो दुम्यूझीप्रमाणेच पशुपालक देव होता. तामुझ ‘सिपॅड’ म्हणजेच मेंढपाळ या नावाने ओळखला जातो. त्याचा पिता अँकी; तर दुत्तर ही त्याची आई. तिचे वर्णन ईव्हच्या वर्णनाशी मिळतेजुळते आहे. तामुझ हा मेंढपाळांच्या इच्छा पूर्ण करणारा देव असल्याचे मानले जाते. अनेक मेंढ्या असण्याची तसेच मेंढ्याना भरपूर दूध असावे व वाळवंटातही गवत यावे अशा मेंढपाळांच्या इच्छांची पूर्ती हा देव करतो, अशी तत्कालीन समजूत होती. इ.स.पू. २ व १ च्या काळात जेव्हा असीरियामध्ये तामुझ पंथांचा उदय झाला, तेव्हा पशुपालकदेव अशी ओळख बदलून तो कृषिदेवता म्हणून ओळखला जाऊ लागला व तो धान्यातील शक्तीचे रूप मानला गेला.
तामुझ पंथीय लोक त्याचा आणि इनानाचा विवाह व त्याचा मृत्यूलोकातील राक्षसांनी केलेला वध असे उत्सव साजरे करतात.
संदर्भ :
- Jordan, Michael, Dictionary of gods and goddess, New York, 2005.
- http://oracc.museum.upenn.edu/amgg/listofdeities/damu/index.html
समीक्षक : शकुंतला गावडे