बॅबिलोनियन पुराणकथांमध्ये वर्णिलेला एक प्रसिद्ध सुमेरियन राजा. त्याचे राज्य ऊरुक नावाच्या नगरात होते. हे नगर इ.स.पू. ३००० च्या सुमारास अस्तित्वात होते, असे मानले जाते. सुमेरियन संस्कृतीचा शतकानुशतकांचा इतिहास सांगणार्‍या महाकाव्याचा गिलगामेश हा नायक होय. याचे वर्णन ‘दोन तृतीयांश देव आणि एक तृतीयांश मर्त्य मानव’ असे केलेले आढळते. एपिक ऑफ गिलगामेश  या नावाने प्रसिद्ध असलेले हे महाकाव्य विविध आख्यानांवर बेतलेले आहे. अकेडियन भाषेत, क्यूनिफॉर्म लिपीत साधारण इ.स.पू. दुसर्‍या शतकाच्या सुमारास ते  इष्टिकांवर कोरलेले असल्याचे मानले जाते. हे महाकाव्य एकूण १२ इष्टिकांवर सलग कोरलेले असून याचा बराचसा भाग हा मेसोपोटेमिया, तुर्कस्तान आणि पॅलेस्टाईन येथे सापडल्याचे सांगितले जाते.

गिलगामेश  हे महाकाव्य अत्यंत विस्तृत आणि पुराणकथांनी समृद्ध असून राजा गिलगामेश याच्या संदर्भातली कथा अशी : गिलगामेश हा देवांचा पुत्र आणि अतिशय दक्ष, पराक्रमी आणि उत्साही राजा होता. पण त्याने आपल्या पराक्रमाने आणि उत्साहाने आसपासच्या सगळ्या लोकांना त्रस्त केले होते. या लोकांनी मग आपले गार्‍हाणे देवाकडे मांडले. देवाने त्याच्यासाठी एक एन्किडू नावाचा महाकाय मानवी सोबती तयार केला. हा एन्किडू जरी अतिशय सामर्थ्यशाली असला, तरी त्याचे बाह्य रूप घृणा उत्पन्न करणारे होते. खूप केसाळ असा तो कायम नग्नावतारी असे आणि सदैव जंगली प्राण्यांसोबत राहात असे. तो त्या प्राण्यांसोबत गवत खाई आणि त्यांच्याच तळ्यातून पाणी पीत असे. त्याने बर्‍याचदा गिलगामेशच्या शिकार्‍यांनी प्राण्यांसाठी लावलेले सापळेही उद्ध्वस्त केलेले होते. यामुळेच तो गिलगामेशच्या नजरेत आला. यावर तोडगा म्हणून गिलगामेशने एका गणिकेला एन्किडूकडे पाठवले. त्या गणिकेकडे आकर्षित झालेला एन्किडू तिच्या सहवासात सहा दिवस आणि सात रात्री राहिला. त्यानंतर जेव्हा तो पूर्वीसारखा जंगलातल्या प्राण्यांमध्ये मिसळण्याकरिता गेला, तेव्हा ते प्राणी त्याच्यापासून लांब पळून गेले; कारण त्याच्यातला निरागसपणा संपून तो एक प्रौढ मानव बनला होता. यानंतर त्या गणिकेने एन्किडूने तिच्यासोबत ऊरुक शहरी यावे म्हणून त्याची बरीच मनधरणी केली. शेवटी तो तयार झाला. त्या प्रवासातच त्याने नागर जीवनासाठी आवश्यक असणार्‍या बर्‍याचशा गोष्टी शिकून घेतल्या. गणिकेने त्याला गिलगामेशच्या सामर्थ्याबद्दलही बरेच काही संगितले होते. एन्किडूला गिलगामेश हे एक आव्हानच वाटले. ते ज्या दिवशी ऊरुक या नगरात पोहोचले तो दिवस गिलगामेशच्या विवाहाचा दिवस होता. एन्किडूने गिलगामेशचा रस्ता अडवून त्याला लढाईचे आव्हान दिले. या हाणामारीत त्याने गिलगामेशला चांगलेच लोळवले. यामुळे तेथे जमलेले सगळेच लोक खूप आश्चर्यचकित झाले. पण यानंतर एन्किडूने गिलगामेशप्रती दाखवलेला आदर हा लोकांना यापेक्षाही जास्त अचंबित करणारा होता. त्या वेळी एन्किडूने असे भाकित केले की, गिलगामेशवर दैवी कृपा असणार आहे. म्हणूनच आपण त्याला असे सन्मानपूर्वक वागवले. त्या दिवसापासून एन्किडू आणि गिलगामेश हे एकमेकांचे जीवलग मित्र बनले.

एके दिवशी गिलगामेश एन्किडूला रडताना पाहतो. त्याला कळते की, या नागरी जीवनात रुळल्यापासून एन्किडूच्या मूळच्या पराक्रमाला वावच राहिलेला नाही. त्यामुळे गिलगामेश एखादी आव्हानांनी भरलेली साहसी मोहिम हाती घेण्याचे ठरवितो. एन्किडू त्याच्या या योजनेचे स्वागत करतो; पण हुवावा (हुम्बाबा) या दानवावर हल्ला करून त्याला संपविण्याचा गिलगामेशचा विचार एन्किडूला फारसा पटत नाही. एन्किडूने सेडारच्या जंगलातील आग ओकणार्‍या त्या अक्राळविक्राळ आकृतीला लांबूनच पाहिलेले असल्याने त्याला संपविणे तितकेसे सोपे असणार नाही, याची त्याला जाणीव होती. पण गिलगामेश मागे हटायला तयार नसल्याने त्या दोघांनी मिळून हुवावाला सेडारच्या जंगलात जाऊन आव्हान देतात. शेवटी एन्किडू आपल्या भाल्याने हुवावाचा वध करतो. अतिशय विजयी मुद्रेने हे दोन्ही वीर ऊरुक नगरात परत येतात. गिलगामेशच्या पराक्रमावर मोहित होऊन इनाना (इश्तार) ही प्रेमदेवता त्याचे प्रणयाराधन करते; परंतु गिलगामेश तिचा अव्हेर करतो. शिवाय तम्मुझ इ. सारख्या तिच्या प्रेमात पडलेल्यांबाबत तिने केलेल्या क्रूर व्यवहाराची आठवण तिला करून देतो. प्रचंड संतप्त झालेली इश्तार चरफडतच तिचे वडील अनू या देवाकडे तक्रार करते आणि स्वर्गीय बैलाच्या माध्यमातून त्यांनी गिलगामेशला संपवावे, अशी मागणी करते. वडील याला विरोध दर्शविल्यानंतर ती त्यांना नरकाचे दरवाजे उघडण्याची धमकी देते. नाईलाजाने तिचे वडील तो स्वर्गीय बैल तिच्या हवाली करतात. पण एन्किडू आणि गिलगामेश हे अत्यंत चतुराईने त्या बैलाला ठार करतात. त्यामुळे इश्तारचा सूड अर्धवटच राहतो. हा जरी त्या दोघांचा विजय असला, तरी त्यांनी स्वर्गीय बैलाला ठार करून स्वर्गीय इच्छेचे खंडन केले असल्याने त्याचे प्रायश्चित्त त्यांना घ्यावे लागणार होते. त्यामुळे अनू, एन्लिल आणि अन्य काही देवता देवांच्या सभेत एन्किडूचा मृत्यू घडवून आणण्याचा निर्णय घेतात. त्यानुसार गिलगामेशला शिक्षा म्हणून त्याने त्याचा मित्र एन्किडू याला संपविण्याचे ठरते. आपल्या मृत्यूची सूचना एन्किडूला स्वप्नात मिळते आणि आजारी पडून त्याचा मृत्यू होतो.

अतिशय दु:खाने आणि माणूस मर्त्य आहे या कल्पनेने व्यथित होऊन गिलगामेश रानोमाळ हिंडतो. एन्किडू राहात असलेले जंगल तो अक्षरश: पिंजून काढतो. त्याच्या मृत शरीरासोबतच तो दिवसरात्र बसून राहतो. शेवटी जेव्हा ते शरीर कुजते, तेव्हा गिलगामेश त्याचे अंत्यसंस्कार करण्याची परवानगी देतो. आपला मृत्यू कसा टाळता येईल, अमर कसे व्हावे, हा विचार त्याला स्वस्थ बसू देत नाही. खरेतर तो देवांचा पुत्र असला तरीही माणासाच्या पोटी जन्म घेतल्याने केव्हातरी हा नश्वर देह त्यागावा लागणार याची त्याला जाणीव होती. याच दरम्यान त्याला आपला एक पूर्वज उतनपिष्टिम याच्याबद्दल कळते. पूर्वी झालेल्या विश्व प्रलयादरम्यान पृथ्वीवरील सजीवसृष्टी वाचवून त्यात सातत्य राखण्याचे पवित्र कार्य केल्यामुळे उतनपिष्टिम आणि त्याची पत्नी यांना अमरत्व देण्यात आले होते. या उतनपिष्टिमला शोधत गिलगामेश जगाच्या शेवटापर्यंत पोहोचतो आणि त्याला भेटतो. गिलगामेशचा मनसुबा कळल्यानंतर उतनपिष्टिम त्याची एक परीक्षा घेण्याचे ठरवितो. ही परीक्षा म्हणून त्याला सहा दिवस आणि सात रात्री जागे राहायचे असते. तो निकराचा प्रयत्न करतो; पण दुर्दैवाने सहाव्या रात्री तो झोपतो. त्यामुळे अमरत्व प्राप्तीची त्याची आशा मावळते. उतनपिष्टिमच्या पत्नीला मात्र गिलगामेशची दया येते. तिच्या विनंतीवरून उतनपिष्टिम गिलगामेशला अमरत्व देणार्‍या वनस्पतीचे गुपित सांगतो. त्यानुसार गिलगामेश जमिनीखाली गोड्या पाण्यात उगवणारी ‘चिरतरुण’ (Never Grow Old) नावाची वनस्पती शोधून काढतो आणि तो परतीच्या प्रवासाला निघतो. प्रवासात उष्ण तापमानामुळे थकून जाऊन एका जलाशयात तो आंघोळीसाठी उतरतो. वनस्पतीच्या सुवासाने आकर्षित झालेला एक साप तेथे येतो आणि ती वनस्पती खातो. त्याचा परिणाम म्हणून तो बिळात परत जाताच त्याची पूर्वीची कातडी गळून पडते आणि तो कायाकल्प झाल्यासारखा तरुण होतो. निराश झालेला गिलगामेश अखेरीस एन्किडूच्या आत्म्याला आवाहन करतो. एन्किडू त्याच्या समोर प्रकट होऊन मृतांच्या दुनियेत चिरंतन कैद होऊन पडलेल्या जीवांचे दु:खे त्याला सांगतो. गिलगामेशच्या या कथेला ‘मर्त्याचे महाकाव्य’ (The Epic of Mortality) असेही संबोधले जाते.

क्यूनिफॉर्म लिपीत ‘गिलगामेश’ महाकाव्य कोरलेली इष्टिका, ब्रिटिश संग्रहालय, लंडन.

सुमेरियन परंपरेत गिलगामेशच्या या कथेच्या एकूण ५ आवृत्त्या दिसतात. त्या एकत्र करून, त्यांचा अन्वयार्थ लावून बॅबिलोनियन कोरक्यांनी एक सलग महाकाव्य तयार केले. यातील पहिल्या तीन इष्टिकांवरील भागात इश्तारची कथा येते. त्यानंतर चौथ्या इष्टिकेवरच्या भागात गिलगामेशने इश्तारला केलेली मदत दिसते. यात एका झाडाच्या लाकडापासून इश्तारला एक पलंग आणि खुर्ची तयार करायची असते. पण ते झाड वाईट शक्तिंनी रक्षिलेले असल्याने इश्तारला तोडता येत नाही. त्या शक्तिंचा नाश गिलगामेशच्या हस्ते होतो. शेवटच्या इष्टिकांना गिलगामेशच्या मृत्यूचा भाग, असे म्हणण्याची पद्धत आहे. यात एन्किडूचा मृत्यू दिसत असला, तरी मृत्यूची अटळता आणि अमरत्वासाठी केलेला गिलगामेशचा फोल प्रयत्न या दोन गोष्टी प्रकर्षाने अधोरेखित होतात आणि हेच गिलगामेश महाकाव्याचे सार मानले जाते. इ.स.पू. सहाव्या शतकाच्या सुमारास पर्शियन आक्रमणांमुळे हे महाकाव्य बरेचसे नष्ट झाले. १८५० मध्ये होर्मुझ्द रासम या इराकी पुरातत्त्वशास्त्रज्ञाने असुरबनिपाल या ॲसिरियन राजाच्या काळात अस्तित्वात असणार्‍या मोठ्या राजकीय ग्रंथालयाचे अवशेष शोधून काढले. या उत्खननात मिळालेल्या हजारो इष्टिका नंतर ब्रिटिश संग्रहालयात पाठविण्यात आल्या. यानंतर जवळपास २० वर्षांनी या संग्रहालयाचे प्रमुख जॉर्ज स्मिथ यांच्या प्रयत्नांनी गिलगामेशची कथा असणार्‍या या इष्टिका प्रकाशझोतात आल्या.

आताच्या या गिलगामेशच्या कथेच्या डेविड डॅमरोश, बेंजामिन फॉस्टर आणि अँड्र्यू जॉर्ज यांनी संपादित केलेल्या वेगवेगळ्या एकूण तीन आवृत्त्या आहेत.

 

संदर्भ :

                                                                                                                                                                                                                       समीक्षक : शकुंतला गावडे