अँकी/इआ : सुमेरियन जलदेवता. मेसोपोटेमियन देवतांमधील एक प्रमुख देव. तो अनु आणि नामू यांचा पुत्र मानला जातो. ह्या देवतामंडळातील अत्यंत चतुर देव मानला गेला आहे. त्याच्या चातुर्याच्या कथा सुमेरमध्ये सर्वश्रुत आहेत. त्याची पत्नी म्हणून काही ठिकाणी डॅमकिना हिचा उल्लेख येतो; तर काही ठिकाणी त्याची सहचारिणी निनहूरसॅग असून ती भूदेवीचे प्रतीक मानली गेली आहे. तिचा संबंध सृजनाशी आहे. हा देव ज्ञानाचे, सृजनाचे व उत्पत्तीचे प्रतीक आहे. तो गोड्या पाण्याचा देव आहे. त्याने भूगर्भातील गोड्या पाण्याला मोकळे करून त्यापासून संपूर्ण सुमेरमधील जलप्रवाहांना पाणी पुरवले, ज्यावर समाजजीवन चालत असे. तो प्रामुख्याने पाण्याचे पावित्र्य राखण्याचे कार्य करत असे. तो टायग्रिस आणि युफ्रेटीस ह्या नद्यांचा मार्गक आहे.
एन्की हा ‘मॅ’नामक वैश्विक शक्तीचा रक्षणकर्ता आहे. तो जलाप्रमाणे वीर्याचासुद्धा स्वामी आहे. ‘एन्युमा एलिश’ (Enuma Elish) या बॅबिलोनियन महाकाव्यानुसार ॲबझू (Abzu) हा निष्क्रिय व झोपलेला असताना प्रमुख देवांच्या मुलांच्या खेळण्याने त्रासून तो त्यांना मारायला निघतो. मात्र एन्की त्याच्यावर मंत्रजाल टाकून त्याला पूर्णपणे झोपवून भूगर्भामध्ये सोडून देतो. तेव्हापासून एन्की हा ॲबझूचे स्थान मिळवतो.
एन्की आणि प्रजनन कथा : निनहूरसॅग आणि एन्की यांच्या संबंधातून निनहूरसॅग निनमु या देवताला नऊ दिवसांनी जन्म देते. निनहूरसॅग निनमुला नदी किनाऱ्यापासून दूर राहायला सांगते; मात्र एकदा खुद्द एन्कीची नजर निनमुवर पडते आणि त्या संबंधातून निंकुर्र ह्या देवतेचा जन्म होतो. निंकुर्रला एन्कीपासून उत्तु ही देवता होते. या सर्व प्रकारामुळे निनहूरसॅग चिडते, त्यातच एन्की पुन्हा उत्तुच्या मागे येतो. म्हणून निनहूरसॅग उत्तुला एन्कीला असे सांगायला लावते की, वाळवंटामध्ये काकडी, द्राक्ष आणि काही वाळवंटी फळे लावली तरच एन्की उत्तुशी संबंध प्रस्थापित करू शकतो. एन्की सांगितल्याप्रमाणे करतो आणि उत्तुशी संबंध प्रस्थापित करतो. उत्तुच्या गर्भातील अँकीचे बीज निनहूरसॅग काढून घेते आणि स्वतःच्या गर्भात ठेवते, ज्यातून आठ वेगवेगळ्या प्रकारची झाडे उगवतात. ती आठ झाडे एन्की खाऊन टाकतो. त्यामुळे चिडलेली निनहूरसॅग त्याला शाप देते, आणि तो शरीराच्या आठ भागात रोगग्रस्त होतो. निनहूरसॅगचा राग सर्वत्र दुष्काळ पसरायला कारणीभूत होतो. एन्कीला मदत करायला इतर देवसुद्धा असमर्थ ठरतात. शेवटी एक कोल्हा निनहूरसॅगला विनंती करून एन्कीला रोगातून मुक्त करायची मागणी करतो. शेवटी ती एन्कीला आपल्या गर्भात स्थान देते आणि त्यातून आठ वेगवेगळे देव जन्माला येतात. कथेच्या अन्य संस्करणामध्ये एन्की स्वतःच आठ मुलांना जन्म देऊन आपल्या त्रासातून सुटका करून घेतो. ही पूर्ण कथा प्राचीन सुमेरमधील कृषी पद्धतीचे प्रतीक आहे, असे काही अभ्यासकांचे मत आहे.
एन्की आणि इनाना : एन्की आणि इनाना एकदा मद्य प्यायची स्पर्धा लावतात. त्या वेळी भानावर नसलेला एन्की ‘मॅ’चे वैश्विक नियमाचे सर्व अधिकार इनानाला देऊन टाकतो. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या दूताला पाठवून ते इनानाकडून मागवून घेतो; पण इनाना नावेतून स्वर्गात गेलेली असते. मात्र ती पुन्हा त्या वैश्विक नियमांसह परत उरुक ह्या तिच्या नगरात येते. एन्की आपली हार मान्य करून एरिदू आणि उरुकु यांमध्ये शांतता प्रस्थापित करतो. ही कथा सत्तांतरणाशी निगडित असावी, असे अभ्यासकांना वाटते.
एन्कीने निर्माण केलेल्या खजुराच्या झाडाचे रक्षण करण्यासाठी एन्की शुकलेतूदला कामाला ठेवतो. एकदा इनाना त्या झाडाखाली झोपलेली असताना तिच्या दैवी सौंदर्यावर भाळलेल्या त्याने तिच्यावर जबरदस्ती केली. जाग आल्यावर इनानाला आपण विटाळलो गेलो आहोत हे लक्षात येते, आणि ती हे कृत्य करणाऱ्याला शिक्षा द्यायचा प्रयत्न करते. मात्र आधीच शुकलेतूदाने एन्कीकडे आपले रक्षण करण्याची विनंती केलेली असते आणि मदत मागणाऱ्याला एन्की नेहमी मदत करत असे, त्यामुळे एन्की त्याला नगराच्या मध्यभागी लपायला सांगतो. इकडे इनाना प्रचंड रागावलेली असते. शेवटी ती आपली हकिकत देवसभेमध्ये मांडते, आणि एन्कीला सुद्धा समजून येते की, योग्य न्याय करायची गरज आहे, म्हणून तो आरोपीची लपण्याची जागा तिला सांगून टाकतो.
एन्की आणि प्रलयकथा : सुमेरियन विनाशाच्या पूर कथेनुसार सर्व देव मनुष्यांच्या गोंधळाला कंटाळतात. प्रमुख देव मिळून ठरवतात की, पृथ्वीवर मोठा पूर आणायचा आणि मानवजात नष्ट करायची. मात्र एन्कीचा ह्याला विरोध असतो. त्यामुळे तो सज्जन मनुष्य उतनापिष्टीमला (Utnapishtim) एक मोठी नाव तयार करायला लावून त्यावर त्याचे कुटुंब व अजून काही चांगली माणसे त्याचप्रमाणे काही पशुपक्षी व झाडेझुडुपे घेऊन त्यात सुरक्षित राहायला सांगतो.
बॅबिलोनियन कथेनुसार प्रमुख देवाच्या सांगण्यावरून एकएक देव पहिल्यांदा महामारी पसरवतात, मग दुष्काळ वावंध्यत्वसुद्धा पसरवतात, पण वेळोवेळी एन्कीच्या सांगण्यावरून माणसे त्या-त्या देवाला काही ना काही अर्पण करून त्याला प्रसन्न करून घेतात आणि त्यांच्यावरून संकट टाळतात; संकटांचे निवारण करतात. मग शेवटी मुख्य देव पूर आणायचे ठरवतो. तेव्हा एन्कीच्या सांगण्यावरून अन्थराहसीस (Athrahasis) एका नावेत काही माणसे पशुपक्षी, झाडेझुडुपे घेऊन स्वतःला वाचवतो. या दोन्ही कथांमध्ये एन्की मनुष्याच्या बाजूने उभा राहिलेला दिसून येतो.
एन्की हा वैश्विक शक्ती ‘मॅ’चा रक्षणकर्ता असल्यामुळे भित्तीचित्रांवर त्याच्या मुकुटावर शिंग असतात. त्याची टोपी त्रिकोणी थाटाची असते. त्याच्या दोन्ही बाजूला एकएक वृक्ष आहे, जे विश्वातील स्त्री-पुरुष तत्त्वाचे प्रतीक आहेत. त्याच्या उजव्या हातावरून एक गरुड उडण्याच्या तयारीत असलेला चित्रित केला जातो. एडका आणि मासा हे त्याची प्रतीके आहेत.
संदर्भ :
- Dalley, Stephanie, Myths from Mesopotamia, Oxford, 2008.
- Jordan, Michael, Dictionary of gods and goddess, New York, 2005.
- www.oracc.museum.upenn.edu/amgg/listofdeities/enki/
समीक्षक : शकुंतला गावडे