कोर्बेटो, फर्नांडो जोस : (१ जुलै १९२६ ते १२ जुलै २०१९) फर्नांडो जोस कोर्बेटो यांचा जन्म अमेरिकेतील कॅर्लिफोर्निया राज्यातील ओकलंड येथे झाला. त्यांनी कॅर्लिफोर्निया विद्यापीठात महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेतला. परंतु त्या दरम्यान दुसरे महायुध्द सुरू झाल्याने तेथील प्रथम वर्षातच ते नौदलात इलेक्ट्रॉनिक टेक्निशियन म्हणून दाखल झाले. तेथे त्यांनी काही साधनांचे विलक्षण तल्लखतेने दोषनिवारण केले. ही गोष्ट त्यांच्या भविष्यातील कारकिर्दीस प्रेरणादायी ठरली. ते नौदलातून परतल्यावर त्यांनी कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतला आणि तेथून भौतिकशास्त्रातील पदवी प्राप्त केली. त्यानंतर कोर्बेटो यांनी मॅसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून भौतिकशास्त्रात पीएच.डी मिळविली आणि तेथील संगणक-गणन (computation) केंद्रात नोकरी सुरु केली. कोर्बेटो त्या संस्थेत प्राध्यापक झाले आणि निवृत्त होईपर्यंत तेथेच कार्यरत राहिले.
पूर्वीच्या मेनफ्रेम्स आणि अन्य संगणक प्रणालीमध्ये एका वेळी केवळ एकाच प्रक्रियेवर रेषीय (linear) पद्धतीने कार्य केले जात असे. १९६०च्या दशकात वेळ वाटून घेणे (Time Sharing) ही संकल्पना म्हणजे बहुविध वापरकर्त्यांमध्ये एकाच वेळी एकापेक्षा अधिक प्रोग्रामिंग आणि अनेकविध कार्यांसाठी (multi-tasking) संगणकीय संसाधनाचे एकाच वेळी वाटप ही उदयास आली. ती संकल्पना विकसित होत असताना एमआयटीमधील अनुरूप अनेकावधानी परिचालन प्रणालीच्या (Compatible Time-Sharing System (CTSS)) विकासात कोर्बेटो सहयोगी होते. सीटीएसएस ही एक अतिशय प्रभावी प्रणाली होती आणि तिच्यामुळे संगणक वापर अतिशय गतिशील झाला. आधुनिक प्रणाली लायनॅक्स व इतर यांच्या विकासात ती पथदर्शक ठरली.
कोर्बेटो यांचे संगणक क्षेत्रातील दुसरे महत्त्वाचे योगदान म्हणजे संगणक वापराला सुरक्षिततेचे कवच प्रदान करणारा परवलीचा शब्द म्हणजे पासवर्ड प्रत्यक्षात आणणे. १९६१ मध्ये एमआयटीमध्ये प्रस्तुत केलेली अनेकावधानी परिचालन प्रणाली, संगणक पासवर्ड ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारी पहिली परिचालन प्रणाली होती. या प्रणालीमध्ये एकापेक्षा अधिक वापरकर्ते एकाच संगणकावर काम करू शकत. यानुसार एका वापरकर्त्याला तो काम करत असलेल्या माहितीबाबत इतर वापरकर्त्यांपासून गोपनीयता राखण्याच्या दृष्टीने समुचित व्यवस्थेची गरज अनिवार्य ठरू लागली आणि यातूनच पासवर्डच्या संकल्पनेस मूर्त स्वरूप देण्यास कोर्बेटो उद्युक्त झाले. त्यांच्या प्रणालीमध्ये प्रवेश करण्यासाठी एक ओळ होती, ती वापरकर्त्याला त्याच्या पासवर्डची विचारणा करत असे. वापरकर्त्याने पासवर्ड टाइप केल्यावर, त्या पासवर्डमधील वर्ण (अक्षरे/अंक) जसेच्या तसे न उमटता तेथे पासवर्डमधील वर्णाच्या संख्येइतकी समान चिन्हे उमटत असत. उदा., गोळे किंवा तारका, जेणेकरून वापरकर्त्याच्या पासवर्डची गोपनीयता पाळली जात असे. त्यानंतर पासवर्ड हा सामान्य व्यक्तीच्या उपयोगातील कितीतरी साधंनांमध्ये अनिवार्य झाला. आपले जीवन अधिकाधिक अंकीय तंत्रज्ञानाने व्यापले जात असताना सुरक्षितता हा मुद्दा महत्त्वाचा होत आहे आणि त्यासाठी जवळपास सर्व अंकीय प्रणाली आधारित व्यवहारांमध्ये पासवर्ड पध्दत अनुसरली जाते.
अनेकावधानी परिचालन प्रणालीच्या यशस्वी विकासानंतर कोर्बेटो यांनी मल्टिक्स (Multix-Multiplexed Information and Computing Service) या परिचालन प्रणालीच्या विकासात योगदान दिले. मल्टिक्स ही प्रणाली अनेकावधानी परिचालन प्रणालीची अनुवर्ती होती. मल्टिक्स विकसित करण्याचे उद्देश म्हणजे ती प्रणाली दूरध्वनी आणि वीज यासारख्या सेवा वापराची गणना करणे व अनेकावधानी परिचालन प्रणालीची क्षमता विकसित करणे हा होता. या प्रणालीमध्ये योग्य त्या प्रमाणात संगणन पात्रता (computing power), मेन मेमरी किंवा डिस्क स्टोरेज यासारखी संसाधने वापरून या प्रणालीची पात्रता वाढवता येते. या प्रणालीमध्ये प्रत्येक फाइलसाठी स्वतंत्र प्रवेश नियंत्रण असल्यामुळे माहिती सामायिकरण संदर्भात लवचिकता व त्याचवेळी आवश्यकतेनुसार पूर्ण गोपनीयता शक्य असते. तरी आधुनिक परिचालन प्रणालींमध्ये वापरात असलेल्या अनेक संकल्पनांची, मल्टिक्स ही आद्य प्रणेती मानली जाते.
संगणक क्षेत्रातील त्यांची आणखी एक ओळख म्हणजे कोर्बेटोज लॉ. त्या नियमाप्रमाणे संगणक प्रोग्रॅमर ठराविक काळात लिहू शकत असलेल्या आज्ञावलींच्या ओळींची संख्या तितकीच असते आणि ही संख्या संगणकाच्या कुठल्या भाषेत आज्ञावली लिहिली गेली यावर अवलबून नसते. हा नियम त्यांनी अनेक वर्षांच्या निरीक्षणातून मांडला. पूर्वी असा समज होता की संगणकासाठी त्याला लगेच कळेल अशा किचकट यांत्रिक भाषेत आज्ञावली लिहिणे हे जास्त उपयोगी असते. मात्र कोर्बेटो यांच्या नियमामुळे संगणकाला आज्ञा आपल्या उच्च-स्तरीय भाषांतून (higher-level languages) देणे हे तितकेच प्रभावी आहे हे सिद्ध झाले आणि त्यामुळे उच्च-स्तरीय संगणक भाषांच्या विकासाला गती मिळाली.
कोर्बेटो यांना मिळालेले काही महत्त्वाचे पुरस्कार असे आहेत. डब्ल्यू.डब्ल्यू.मॅकडोवेल पुरस्कार, आयईईई, आयईईई कॉम्प्यूटर सोसायटी पायोनियर पुरस्कार आणि संगणक विज्ञान क्षेत्रात नोबेल पारितोषिकासम मानला जाणारा एसीएम टयूरिंग पुरस्कार त्यांना मिळाला. तसेच संगणक क्षेत्रातील वेळ सामायिकरण व मल्टिक्स परिचालन प्रणाली यात भरीव योगदान देण्याबद्दल कॉम्प्यूटर हिस्ट्री म्युझियम फेलो म्हणून त्यांची निवड झाली.
वेळ सामायिकरण व मल्टिक्स परिचालन प्रणाली या विषयांवर त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. तसेच कोर्बेटो यांच्या नावावर बरेच महत्त्वाचे शोधलेख आहेत.
संदर्भ :
- https://www.wikiwand.com/en/Fernando_J._Corbat%C3%B3
- https://history.computer.org/pioneers/corbato.html
- https://www.techopedia.com/definition/11282/compatible-time-sharing-system-ctss·
समीक्षक : विवेक पाटकर