सेंट्रल  सॉईल सॅलिनीटी रिसर्च इन्स्टिट्यूट : ( स्थापना – मे, १९६९ )

       सेंट्रल  सॉईल सॅलिनीटी रिसर्च इन्स्टिट्यूटची इमारत

सी.एस.एस.आर.आय. म्हणजेच हरियाणातील कर्नाळस्थित असलेली सेंट्रल सॉईल सॅलिनीटी रिसर्च इन्स्टिट्यूट ही संशोधन संस्था होय. प्रारंभी तिची स्थापना हिस्सार येथे झाली होती, परंतु ऑक्टोबर १९६९ मध्ये ती या नव्या जागी हलविण्यात आली. तत्कालीन इंडो-अमेरिकन  टीमच्या शिफारशीनुसार  इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रीकचरल रिसर्चच्या छत्राखाली स्थापन झालेल्या या उपक्रमाचा मुख्य हेतू पाणी व्यवस्थापन हा होता. १९७० साली बंगालमधील राईस रिसर्च सेन्टर या संस्थेचे सी.एस.एस.आर.आय.मध्ये विलगीकरण करण्यात आले.

या संस्थेने २००३ पासून भडोच येथे उपग्रह युनिट सुरू केले आहे आणि आग्रा, बिकानेर, इंदोर, गंगावती, बापताला, कानपुर, तिरुचीरपल्ली अशा देशातील आठ शेतकी विभागात असलेल्या संशोधन केंद्रांशी समन्वय करून क्षारयुक्त पाण्याचा शेतीसाठी प्रभावी वापर कसा करता येईल यावर संशोधन केले.

क्षारयुक्त जमिनीत आणि खराब दर्जा असलेल्या पाण्याचा वापर करून उपयुक्त पीक काढायचे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. तसेच क्षारयुक्त जमीन व पाणी यांच्यात तंत्रज्ञानाच्या साह्याने बदल घडवून त्यांची उपयुक्तता वाढवायची हे मिशन आहे. त्यासाठी अल्कधर्मी मातीत रासायनिक प्रक्रिया करणे, अल्कधर्मी जमिनीचा पृष्ठीय निचरा करणे, मिठागरे असलेल्या जमिनीत तांदूळ, गहू, मोहरी या पिकाच्या निपजणाऱ्या जातीचा शोध घेणे, क्षारयुक्त जमिनीत क्षार शोषून घेणाऱ्या वृक्षांची लागवड करणे, सागर किनारी असलेल्या जमिनी लागवडीसाठी विकसित करणे, जमिनीखालील रिकाम्या होणाऱ्या जागेत तंत्रज्ञानाच्या आधारे पाणी भरून घेणे (वॉटर टेबल) अशा विविध कामात ही संस्था लक्ष घालत असते. संस्थेने आजवर १५ लाख हेक्टर क्षारयुक्त जमीन लागवडीखाली आणली असून त्यातून १.५ कोटी तन धान्यपिकांची निपज केली आहे. याशिवाय, हरयाणा, राजस्थान, गुजरात, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील ५०,००० हेक्टर पाणथळ जमीन मुक्त केली.

शिवाय, भातशेतीच्या विकासासाठी इंटरनॅशनल राईस इन्स्टिटय़ूट, ऑस्ट्रेलियन सेंटर फॉर  इंटरनॅशनल ॲग्रीकल्चर रिसर्च (गहू), मेक्सिको तसेच फिलिपिन्स (डाळी) येथील संशोधन संस्थासोबत विविध प्रकल्पात सी.एस.एस.आर.आय. व्यस्त असते.

याशिवाय, संस्थेच्या चार विभागांतर्फे संशोधन प्रकल्प राबवले जातात. त्यात कमीत कमी खर्चात पिकाचे उत्पादन कसे घ्यायचे, भारतातल्या जागोजागच्या क्षारपडी जमिनीची नोंद संगणकाद्वारे ठेवणे, क्षारपडी जमिनीवर जंगले तयार करणे, पाणी-व्यवस्थापन व सांडपाण्याची अभियांत्रिकी, पीक-सुधारणा आणि तंत्रज्ञाननिर्मिती व ती लोकांपर्यंत पोहोचवणे अशा गोष्टी केल्या जातात.

संस्थेचे इंडो-डच प्रशिक्षण केंद्र नामांकित आहे व तेथे राज्याराज्यातील शेतकी विद्यापीठे, आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉंलॉजी यांच्याबरोबर पदव्युत्तर अभ्यासक्रम घेतले जात आहेत.

समीक्षक : अ. पां. देशपांडे