इनाना ही प्राचीन सुमेरियन संस्कृतीमध्ये प्रेम, सौंदर्य, लैंगिक भावना, प्रजनन, युद्ध आणि नैतिकतेचे प्रतीक असलेली देवता आहे. तिला स्वर्गाची आणि पृथ्वीची राणी म्हटले आहे. काहींच्या मते ती बुद्धीची देवता असलेल्या एन्कीची मुलगी आहे; तर काहींच्या मते चंद्र व बुद्धीची देवता असलेल्या नानाची मुलगी आहे. नानाची मुलगी असल्याने ती सूर्यदेवता उत्तु ह्याची जुळी बहीण आहे. एरेश्किगल ही सुद्धा तिची बहीण आहे. दुमुझी हा तिचा पती आहे. असे असले तरी तिला अनेक प्रियकर आहेत. इनाना ह्या देवतेला निनाना व निन्सिनाना ह्या नावाने ओळखले जाते. बेबिलोनियामधील लोक तिला इश्तार ह्या नावाने ओळखतात. काही पुराव्यानुसार समुद्रदेवता नम्मू ही तिची आजी होती. नम्मू देवतेने स्वर्ग व पृथ्वीची निर्मिती केली आणि चंद्रदेवता निंगल हिला जन्म दिला. तिने शुक्रताऱ्याच्या रूपात इनानाला जन्म दिला. ती प्राचीन उरुक शहराची रक्षक देवता असून हे शहर तिचे मूळ स्थान मानले गेले आहे.
इनाना ही कधी कधी अतिशय सुबक पेहेरावामध्ये दाखवली जाते, तर कधी कधी नग्न दाखवली जाते. तिच्या हातातील आकड्याच्या आकाराचा वेताचा चाबूक व धनुष्य प्रजनन व समृद्धी दर्शवतात. अष्टकोनी तारा हे तिचे प्रतीक आहे. सिंह तिच्या सामर्थ्याचे प्रतीक असून तिच्या मागे नेहमी दोन सिंहीणी दाखवल्या जातात. गुलाबाप्रमाणे असलेला शुक्रतारा हे सुद्धा तिचे प्रतीक आहे. तिचा मुकूट त्रिकोणी असून तो शिंगांनी बनलेला आहे; जो दैवी पर्वताचे प्रतीक आहे. बहुतेक चित्रात इनानाला पंख आहेत. तसेच ती सर्पांनी वेढलेली आहे. यावरून ही देवता मूलत: प्रजननाचे प्रतीक मानल्या गेलेल्या पक्षी व सर्प यांच्याशी संबंधित असावी, असे मानले जाते.
सुमेरियन लोक आकाश म्हणजे इनाना देवतेचे प्रकटीकरण आहे, असे समजतात. आकाशातील ढग हे तिचे स्तन आहेत, तर पाऊस म्हणजे तिचे दूध आहे. तिच्या गळ्यातील हार म्हणजे इंद्रधनुष्य आहे, तर कमरेवरील मेखला हे राशिमंडळ आहे. इनाना गोठा व मेंढवाडा ह्यांच्या द्वाराशी संबधित आहे. द्वार हे देवतेच्या योनीचे प्रतीक, तर गोठा किंवा मेंढवाडा देवतेच्या गर्भाशयाचे प्रतीक होय.
इनाना देवतेची विविध वैशिष्ट्ये कथन करणाऱ्या अनेक पुराणकथा आहेत. त्या खालीलप्रमाणे :
इनाना व दुमुझीचे लग्न : इनाना व उत्तु यांमधील खेळकर संवादाने या कथेची सुरुवात होते. उत्तुच्या मते इनाना विवाहयोग्य झाली आहे आणि तिने शेतकरी एंकिमदु किंवा मेंढपाळ दुमुझी यांच्यापैकी एकाची निवड करावी. इनानाने एंकिमदुची निवड केली; पण उत्तुला हे मान्य नव्हते. त्याने व दुमुझीने इनानाला समजावले की, जे एंकिमदु तुला देऊ शकतो, त्याच्यापेक्षा जास्त दुमुझी तुला देईल. अशाप्रकारे इनानाचे मतपरिवर्तन होते व ती दुमुझीशी विवाह करते.
इनाना व मृत्यूलोक : इनानाचा संबंध मृत्यूलोकाशी जोडला जातो; कारण एका पुराणकथेनुसार ती नरकात जाऊन परत आली. एरेश्किगल हिचा पती गुगालन्ना ह्याचा मृत्यू झाल्याने इनाना तिला नरकात भेटायला जाते; परंतु दोन बहिणींचे संबंध चांगले नसल्याने सावधगिरी म्हणून ती तिच्या निंशुबुर ह्या विश्वासू दासीला सांगते की, जर मी तीन दिवसांत परत आले नाही, तर माझ्या सुटकेसाठी मदत घे. इनाना जेव्हा अपल्या बहिणीला भेटायला जाते, तेव्हा ती नटलेली असते. पाताळाला सात द्वारे असतात, असे मानले जाते. जेव्हा ती पहिल्या द्वारापाशी येते, तेव्हा द्वारपाल तिचा निरोप घेऊन एरेश्किगलकडे जातो. इनानाला नटलेली पाहून ती तिला नग्नावस्थेत आणण्यास द्वारपालाला सांगते. द्वारपाल प्रत्येक द्वाराशी तिचा एकेक पोशाख उतरवतो. पहिल्या द्वाराशी ती स्वतःचा मुकूट काढते. नंतर गळ्यातील हार, हातातील पोची, बूट, बुरखा, झगा व शेवटच्या द्वाराशी वस्त्रे काढते. एरेक्शिगल इनानाला मारते व तिचे शव आकड्याला अडकवते. तीन दिवसांत इनाना परतली नाही, तरी निंशुबुरला एन्लिल व इनानाचे वडील नाना दोघेही मदतीसाठी नकार देतात. शेवटी जलदेवता व बुद्धीची देवता एन्की तिची विनवणी ऐकतो. एन्की तात्काळ आपल्या नखातील मळापासून बनलेल्या दोन दूतांना गलतुरा व कुरजरा यांना तिला परत आणायला पाठवतो. मात्र बाह्य व आंतरजगाचा तोल राखण्यासाठी तिच्या जागी अन्य व्यक्ती मागितली जाते. जेव्हा ती रक्षकांसह घरी येते, तेव्हा प्रसाधनकाराला घेऊन जायचे ठरवते. पण स्वत: संकटात असताना दुमुझी मात्र नवीन कपडे घालून मजा करत असल्याचे पाहून ती रागावते आणि त्याला घेऊन जाण्यास सांगते. इनानाच्या मनात जरी सूडाची भावना असली, तरी पती गमावल्याने तिला दुःख होत होते. दुमुझीच्या बहिणीचेही दुःख ती पाहत असल्याने इनाना त्याला सहा महिने नरकात व सहा महिने पृथ्वीवर राहण्यास परवानगी देते.
इनानाच्या विजयगाथा : १) इनानाने एन्की या देवावर विजय मिळवल्याची कथा प्रसिद्ध आहे. ती आपले वडील एन्की ह्यांना भेटायचे ठरवते. त्यासाठी ती तिच्या उरुक शहरातून एन्कीच्या एरिडू ह्या शहरात दासी निंशुबुरसोबत बोटीने जाते. आपली मुलगी भेटीस येत आहे हे पाहताच आनंदाने एन्की तिचे स्वागत करतो. एन्की व इनाना नशापान करत असताना एन्की शुद्धीवर राहत नाही व तो इनानाला सांस्कृतिक भेटी देतो. त्यामध्ये पुरोहितपद, महत्त्वाची कागदपत्रे, राजेशाही, मुकूट, सिंहासन यांचा समावेश असतो. शेवटी एन्की झोपतो व इनाना सर्व भेटवस्तू घेऊन आपल्या शहरात परत येते. जेव्हा एन्कीला जाग येते, तेव्हा तो त्याच्या सेवकांना सर्व वस्तू परत आणण्यास सांगतो. इनाना व निंशुबुर एन्कीच्या सेवकांचा सामना करतात. शेवटी एन्कीचे सेवक हार पत्करून माघारी घेतात. प्रस्तुत कथा सत्ता हस्तांतरणाचे रूपक आहे.
२) इनाना शुकलेतूद या देवतेवर विजय मिळवते. शुकलेतूद हा कामात अतिशय आळशी व कामचुकार असा माळी होता. तो झाडांची काळजी घेत नसल्यामुळे त्याच्या बागेतील कोणतेही झाड जगत नाही. तो सर्व झाडे उखडून टाकतो. केवळ त्याचे प्रिय एक उंच, दाट झाड जगते. बागकाम करण्यास असक्षम असलेल्या शुकलेतूद सांत्वनासाठी व मदतीसाठी आकाशाकडे पाहतो. त्या वेळी तो प्रवास करून थकलेल्या इनानाला पाहतो. इनाना त्या वृक्षाखाली विश्रांती घेण्याचे ठरवते. जेव्हा इनाना झोपते, तेव्हा शुकलेतूद तिची दैवी वस्त्रे काढतो व तिचा उपभोग घेतो व पळून जातो. इनाना जेव्हा उठते, तेव्हा तिला त्याची जाणीव होते. इनाना सूडाने पेटते; परंतु गुन्हेगार माहीत नसल्याने ती आकाश-पाताळ एक करते. त्याच वेळी शुकलेतूद त्याच्या वडिलांना सर्व हकिकत सांगतो. त्याचे वडील त्याला शहरात लपण्यास सांगतात. कितीही प्रयत्न केले, तरी इनानाच्या हाती शुकलेतूद लागत नाही. एन्की अप्सुच्या मदतीने शुकलेतूदला शोधतो. शुकलेतूद पर्वतावर लपतो. इनाना आकाशात इंद्रधनुष्याचे रूप घेते. जमिनीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत ती स्वतःचा विस्तार करते व शुकलेतूदला पकडते. तो इनानाला सर्व हकिकत सांगतो. तेव्हा तुला सर्वजण आठवणीत ठेवतील असा ती वर देते.
३) इनानाने एबिह या पर्वतावर राहणाऱ्या बंडखोर लोकांवर मिळवलेल्या विजयाची गाथा ‘इनाना आणि एबिह’ या कवितेमध्ये सांगीतली आहे. ह्या कवितेत इनाना योद्ध्याच्या रूपात दिसते. एबिह ह्या पर्वताने इनानाचा अपमान केल्याने इनाना त्याच्यावर चाल करण्याच्या तयारीत असते. ती अन ह्या देवतेकडे मदत मागते; पण इनाना एबिह पर्वतावर मात करण्यास असक्षम आहे, असे समजून अन ही देवता मदतीस नकार देते. अपमानित झालेली ती रागाने पर्वतावर हल्ला करते व त्यावर विजय प्राप्त करते.
४) एना मंदिराचे हस्तांतरण उत्तु या देवतेकडून इनानाकडे कसे झाले, याची कथा इनाना व उत्तु या दोहोंच्या संवादामधून स्पष्ट होते. इनानाला एना मंदिरावर आधिपत्य हवे असते; परंतु उत्तु त्यास नकार देतो. नंतर ती तिच्या वडिलांकडे जाते. वडीलही तिच्या ह्या मागणीमुळे हैराण होतात. शेवटी एका कोळ्याच्या मदतीने तेथे जाण्याचा रस्ता शोधते व वर्चस्व प्राप्त करते. ही कथा एना पंथिय व इनाना पंथिय यांच्यातील हस्तांतरणाचे प्रतीक आहे.
५) गुडाम ह्याचे अत्यंत पराक्रमी योद्धा असे वर्णन आढळते. तो मद्य पिण्याऐवजी रक्त पितो व मांस भक्षण करतो. तो इनानाचे मंदिर बेचिराख करण्यासाठी उरुकवर चाल करून येतो. इनानाचा सेवक असलेला कोळी त्याचा सामना करतो. शेवटी गुडाम नम्रपणे इनानाची क्षमा मागतो व तिची स्तुती करण्याची ग्वाही देतो.
अनु देवतेचे वर्चस्व संपल्यावर इनाना देवतेचे महत्त्व वाढले. ‘द हाऊस ऑफ हेवन’ हे उरुक शहरामधील तिचे मंदिर मध्यवर्ती पंथीय केंद्र आहे. असे असूनही मेसोपोटेमियामधील तिच्या सर्व मंदिरात अनेक दैवी गणिकांची नेमणूक करण्यात येत असे. पृथ्वीची उत्पादकता सुनिश्चित करण्यासाठी व समाजाच्या समृद्धीसाठी असे करण्यात येत असे. इनानाचे व्यक्तिमत्त्व हे प्राचीन मातृदेवतेपेक्षा निराळे आहे. तिचा संबंध प्रजनन, प्रेम, युद्ध, मृत्यू, आकाश अशा विविध तत्त्वांशी जोडला गेल्याचे दिसते.
संदर्भ :
- http://www.goddess-guide.com/inanna.html
- https://goddessinspired.wordpress.com/2012/06/10/inanna-sumerian-mother-goddess-queen-of-heaven-and-earth/
- https://www.ancient.eu/Inanna/
- http://www.healingstars.com/goddess-astrology/inannas-descent-underworld/
- https://inanna.virtualave.net/tammuz.html
- http://www.academia.edu/23458476/_Inanna_and_the_Huluppu_Tree_One_Way_of_Demoting_a_Great_Goddess_1
- https://heartwellproductions.wordpress.com/2014/10/27/inanna-and-enki/
- https://study.com/academy/lesson/inanna-goddess-descent-myth-summary.html#lesson
- https://books.google.co.in/books?id=U4mFAgAAQBAJ&pg=PA13&lpg=PA13&dq=inanna+myth+shukaletuda&source=bl&ots=e2hoQdmN8D&sig=EZ_KA0wnj1ozWf6wUz-om8PJ9tU&hl=en&sa=X&ved=0ahUKEwi6vsqp1YfZAhUQSY8KHe-BAtM4ChDoAQg4MAQ#v=onepage&q=inanna%20myth%20shukaletuda&f=false
- https://digitalcommons.ciis.edu/cgi/viewcontent.cgi?article=1150&context=ijts-transpersonalstudies
- http://chimeramyth.blogspot.in/2015/08/inanna-and-ebih-report-of-ancient.html
- http://www.academia.edu/1908001/Inana_and_Ebih_and_the_Scribal_Tradition
- https://books.google.co.in/books?id=a1W2mTtGVV4C&pg=PA334&lpg=PA334&dq=inana+and+ebih&source=bl&ots=64fd-sAoWx&sig=AROfSz_exExWQQNvcp6xQwpVsH8&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjAoojTxZHZAhXJOY8KHUmoAMoQ6AEIVjAG#v=onepage&q=inana%20and%20ebih&f=false
- https://aminoapps.com/c/themagickcircle/page/item/goddess-inanna/JzDk_DPuMIlMap053N51NEWYwpQ6BmmqK0
समीक्षक : शकुंतला गावडे