जापनीज ऑटोमोटीव्ह स्टँडर्डस  ऑर्गेनायझेशन  (जे.ए.एस.ओ. ) :

जासो या नावाने जगभर ख्यात असलेली ही जपानची संघटना स्वयंचलीत वाहनांशी निगडीत प्रमाणे (Standards) तयार करते. ती अमेरिकेच्या सोसायटी ऑफ ऑटोमोटीव्ह इंजिनीअर्स’ (एस.ए.ई*) या संघटनेच्या धर्तीवर कार्य करते. ही संघटना सोसायटी ऑफ ऑटोमोटीव्ह इंजिनिअर्स ऑफ जपान (जे. ए. ई. एस.) या संस्थेचा एक भाग आहे. जे. ए. ई. एस. ही संस्था स्वयंचलित वाहनाशी निगडीत संशोधनात कार्यरत आहे व ती अभियात्रिकी क्षेत्रात जीवनातील प्रत्येक गरजांसाठी प्रमाणे निर्माण करण्यास कटिबध्द असते. जगभरातील ५०,००० वैयक्तिक तर ५०० कॉर्पोरेट सदस्य या संस्थेचे सभासद आहेत.

दुचाकी व चारचाकी गाड्यांसाठी वापरल्या जाणार्‍या विविध वंगण तेलांची वर्गवारी  करण्याचे कामसुध्दा जासो ही संघटना करते. १९९८ मध्ये, जासो या संघटनेने मोटर सायकल गाड्यांसाठी खास वंगण तेले प्रमाणित केली आणि ही तेले क्लचचे घर्षण व गियर बॉक्समध्ये होणारे यंत्रभागाच्या पृष्ठभागावर पडणारे चरे व इतर नासधूस यापासून रक्षण करण्याच्या क्षमतेची ठरली.

* एस.ए.ई.: सोसायटी ऑफ ऑटोमोटीव्ह इंजिनीअर्स’ ही अमेरिका स्थित संघटना उद्योगक्षेत्रातील विविध व्यवसायासाठी प्रमाणे तयार करते. तरीही, तिचा मुख्य भर वाहतूक उद्योगासाठी म्हणजेच स्वयंचलित वाहने, हवाई वाहने आणि व्यापारी वाहने यांच्या वेगवेगळ्या भागासाठी प्रमाणे तयार करण्यावर होता. कालांतराने, एस.ए.ई इंटरनॅशनल असे तिचे नामांतर झाले. या संघटनेचे जागतिक पातळीवर १३८०० सदस्य आहेत. विविध व्यवसायातील अभियंत्यांना प्रमाणबध्द कसोट्यासंबधी मार्गदर्शन करत असतानाच ही संघटना शालेय विद्यार्थ्यासाठी STEM (Science,Technology,Engineering आणि Maths) एज्युकेशन हा प्रकल्प राबविते,तसेच कॉलेजमध्ये शिकणार्‍या तरुणांसाठी अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध विषयांवरील कार्यशाळा आयोजित करते. ही संघटना सरकारी व खाजगी कंपन्या, संशोधन संस्था आणि तांत्रिक सल्लागार यांना तंत्रज्ञानातील साधने प्रमाणित करण्यासाठी व नवनिर्मिती करण्यासाठी व्यासपीठ पुरवते.

समीक्षक : हेमचंद्र प्रधान