मित्रगोत्री, समीर : ( २८ मे १९७१ )

सध्या औषधे शरीरामध्ये योग्य त्या ठिकाणी व्यवस्थित पोहोचवण्याच्या संशोधनामधील आंतरराष्ट्रीय पातळीवरील काम करणारे समीर मित्रगोत्री यांचा जन्म सोलापूर येथे झाला. त्यांचे शालेय व हायस्कूल शिक्षण सोलापूरमधील हरिभाई देवकरण प्रशालेत झाले. बारावी परीक्षेत ते बोर्डाच्या गुणवत्ता यादीत होते. त्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमधून बी.टेक. पूर्ण केले.

बी.टेक.चे शिक्षण झाल्यानंतर मॅसेच्युटेस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एम.आय.टी ) येथून त्यांनी पीएच्.डी. पूर्ण केली. सध्या ते हावर्ड युनिव्हर्सिटीत इंडियन अमेरिकन प्रोफेसर या पदावर कार्यरत आहेत. हावर्ड जॉन ए. पॉलसन स्कूल ऑफ इंजिनियरिंग व अप्लाइड सायन्स व वास्स (Yass) इन्स्टिट्यूट ऑफ बायॉलॉजिकल इन्स्पायर्ड इंजिनियरिंग अशा दोन्हीकडे काम पहात आहेत. २०१७ पूर्वी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया सॅन्टा बार्बारा येथे सुझान मेल्लिचॅम्प अध्यासनाचे प्राध्यापक म्हणून त्यांची निवड झाली होती.

त्यांनी एखादे औषध शरीरात कसे सुलभ रीतीने योग्य त्याठिकाणी पोहोचवायचे आहे, या क्षेत्रात काम केले आहे. जैवतंत्रज्ञानाच्या भाषेत याला ड्रग डिलिव्हरी सिस्टीम (Drug delivery system) असे म्हणतात. प्रारंभीच्या काळात कमी कंप्रतेच्या स्वनातीत ध्वनीलहरीच्या दाबामुळे (low frequency ultrasound assisted) सूक्ष्मछिद्रातून फवाऱ्याच्या सहाय्याने पेप्टायडे व आयनद्रव त्वचेच्या माध्यमातून परंतु त्वचेला छेदन देता शरीरात सोडता येतील असे उपकरण विकसित केले. अशा उपकरणाची कल्पना ‘स्टारवॉर्स’ या जगप्रसिद्ध टीव्ही मालिकेत केली होती. शून्य गुरुत्वाकर्षण असताना एखादे इंजेक्शन व्यक्तीला देण्याची पाळी आली तर शरीरातून बाहेर येणारे रक्त थांबवता येणार नाही. त्यामुळे त्वचेवर छिद्र न पाडता औषध शरीरात जाण्यासाठीचे उपकरण या मालिकेत दाखवले होते. ते त्यावेळी अस्तित्वात नव्हते. परंतु अशा उपकरणाचे एकस्व (Patent) समीर मित्रगोत्री यांच्या नावे आहे. त्याचे व्यापारी उत्पादनही आता सुरू झाले आहे.

तोंडाने घेण्याच्या इन्सुलीन कॅप्सूलवर त्यांनी संशोधन केले आहे. इन्सुलिन हे द्विपेप्टाइड असल्याने पचनसंस्थेत त्याचे विघटन होते. जठरातील आम्ल व विकर दोन्हीमुळे इन्सुलिन निष्प्रभ होते. पण त्यांनी शोधून काढलेल्या कॅप्सूलवरील आवरण लहान आतड्यात पोहोचल्यावर विरघळते. त्यातील इन्शुलिन रेणू बाहेर पडतात. ते लहान आतड्याच्या अंत:स्तर पेशीतून रक्तात शोषले जाते. या पद्धतीचे उंदरावरील प्रयोग यशस्वी झाले आहेत.

अब्जांश तंत्रज्ञानाने (Nanotechnology) रक्तातील प्लेटलेट व तांबड्या रक्तपेशीबरोबर औषधांचे रेणू योग्य त्याठिकाणी कसे पाठवायचे याचे संशोधन त्यांच्या स्वतंत्र प्रयोगशाळेत चालले आहे. सोळा विद्यार्थ्यानी आतापर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच्.डी. पूर्ण केले आहे.

त्यांची ओळख औषध रेणूवाहक पद्धतीमधील (Drug delivery system) एक नामवंत वैज्ञानिक म्हणून आहे. यासंबंधी त्यांच्याकडे एकशेसाठ एकस्व (patent) व २५० प्रसिद्ध संशोधन लेख आहेत.

त्यांच्या संशोधनाबद्दल त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. नॅशनल अ‍ॅकॅडेमी ऑफ मेडिसिनवर झालेली त्यांची निवड त्यांच्या कारकिर्दीचे द्योतक आहे. बायोइंजिनियरिंग अ‍ॅन्ड ट्रांसलेशनल मेडिसिन (AIChE, SBE and Wiley, Bio-engineering and Translational Medicine) नावाचे संशोधन नियतकालिक त्यांनी सुरू केले आहे. त्यांचा सायटेशन एच इंडेक्स ८८ आहे. मित्रगोत्री लॅबोरेटरी या त्यांच्या संकेतस्थळावरील त्यांचा परिचय साठ पानांचा आहे त्यात त्यांची एकस्वे, आजपर्यंत मिळालेले सन्मान व व्यावसायिक संस्था, संशोधन नियतकालिकांच्या संपादक मंडळावरील स्थान यांची माहिती मिळते.

संदर्भ :

समीक्षक : राजेंद्र आगरकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.