श्टोर्म, टेओडोर : (१४ सप्टेंबर १८१७ – ४ जुलै १८८८). जर्मन कवी आणि कथाकार. त्याचे पूर्ण नाव हान्ट्स टेओडोर वोल्डसेन श्टोर्म. जर्मनीतील ह्यूझम गावी जन्म. कील येथे त्याने कायद्याचे शिक्षण घेऊन काही काळ ह्यूझम येथे वकिली केली. पुढे हेलिजेनस्टाड येथे न्यायदंडाधिकारी म्हणून काम केले (१८५६-६४). १८६४ पासून तो ह्यूझम येथेच न्यायखात्यातील विविध पदांवर काम करीत राहिला (१८८०). श्टोर्मच्या आरंभीच्या कविता गेडिश्ट (१८५२) ह्या काव्यसंग्रहात आहेत.

त्यांवर जर्मन स्वच्छंदतावादी कवी मयोझेफ फोन आयकेनडोर्फ  ह्याचा प्रभाव दिसून येतो. तो ज्या प्रदेशात वाढला, त्या श्लेस्विग – होलश्टाइनबद्दलचे प्रेम त्याच्या कवितांतून जाणवते तथापि कथाकार म्हणून जर्मन साहित्यातील त्याचे स्थान विशेष आहे. त्याच्या इमेंझे  (१८५०, इं. भा. द ओल्ड मॅन्स रेव्हरी, १८६३) ह्या पहिल्या दीर्घ कथेवरही (novella) स्वच्छंदतावादाचा प्रभाव आहे. आठवणींच्या भावगेय निवेदनातून विकसित होत जाणाऱ्या ह्या कथेवर औदासिन्याची गडद छाया दिसून येते. हळूहळू श्टोर्म वास्तववादाकडे वळला, तरी नैराश्याची आणि उदासीनतेची भाववृत्ती त्याच्या लेखनाला व्यापून राहिल्याचे दिसते. उदा., आउफ डेम श्टाट्सहोफ (१८५१), आक्विस सुबमेर्सुस (१८७५). वास्तववादाकडे वळल्यानंतर श्टोर्मच्या लेखनातून सूक्ष्म मानसशास्त्रीय अंतर्दृष्टी व्यक्त होऊ लागली. त्याच्या कथांचे विषयक्षेत्रही व्यापक झाले. धर्मवेडातून तसेच समाजातील विविध वर्गांमधील आंतरिक ताणांतून निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्याही तो त्याच्या कथांतून मांडू लागला. माणसाचे एकाकीपण आणि नियतीबरोबर त्याचा चाललेला संघर्षही त्याच्या काही कथांतून त्याने प्रभावीपणे दाखविला आहे. डेअर शिमेलरायटर (१८८८, इं. भा. द रायडर ऑन द व्हाइट हॉर्स, १९१७) ही त्याची सर्वोत्कृष्ट कथा. पंचमहाभूते आणि लोकभ्रम ह्यांच्या विरूद्ध शौर्याने झगडणारा नायक त्याने तीत उभा केला आहे.

हदमार्शेन येथे त्याचे निधन झाले.

संदर्भ :

  • Wooley, Otto, Studies in Theodor Storm, 1943.
  • Wooley, Otto, Theodor Storm’s World in Pictures, 1954.