व्याख्या : व्यक्तीची कार्यात्मक क्षमता शक्य तितकी जास्त होण्यासाठी वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक घटकांचा एकत्रितपणे, समायोजकपणे वापर करून व्यक्तीला शिक्षण व पुनर्शिक्षण देणे म्हणजे पुनर्वसन होय.

उद्देश : उत्पादन क्षमता गमावलेल्या किंवा नसलेल्या लोकांमधून उत्पादन क्षमता असलेले लोक निर्माण करणे.

पुनर्वसनाचे प्रकार :

  • वैद्यकीय पुनर्वसन
  • व्यावसायिक पुनर्वसन
  • सामाजिक पुनर्वसन
  • मानसिक पुनर्वसन

परिचारिका पुनर्वसनाची उद्दिष्टे (Objectives of Rehabilitation Nursing) :

परिचारिका पुनर्वसनाची चार उद्दिष्टे आहेत.

  • व्यक्तीची प्रभावित झालेली कार्यक्षमता उच्च स्तरावर पुनर्संचित करणे.
  • भविष्यात येणारी अकार्यक्षमता टाळणे अथवा प्रतिबंध करणे.
  • व्यक्तीच्या कार्यक्षमतेचे रक्षण करणे.
  • एखाद्या व्यक्तीला तिच्या कार्यक्षमतेला पुरेपूर वापर करण्यासाठी मदत करणे.

परिचर्या पुनर्वसनाची तत्त्वे (Principal of Rehabilitation Nursing) :

पुनर्वसन हा परिचर्येचा अविभाज्य घटक आहे.

  • पुनर्वसनाची सुरुवात रुग्णाच्या प्राथमिक भेटी दरम्यान झाली पाहिजे.
  • रुग्णाला पूर्व आजारपणातील स्थितीत आणणे.
  • अपंगत्वाच्या तुलनेत रुग्णाला शारीरिक हालचाली करण्यास मोकळीक मिळाली पाहिजे.
  • वास्तववादी उद्दिष्टावर आधारित रुग्णाचे वैयक्तिक पुनर्वसन करण्यासाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करणे.
  • पुनर्वसन प्रक्रियेमध्ये रुग्णाचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे.
  • रुग्णाचे दैनंदिन कामकाज सुकर करण्यावर भर देण्यात यावा.
  • अपंगत्व आलेल्या रुग्णास स्वत:चे कपडे स्वत: परिधान करण्यास प्रोत्साहित करून रुग्णाचा स्वाभिमान व सन्मान वाढविण्यास मदत करणे.
  • रुग्णाला प्रोत्साहन देऊन सामाजिक स्वातंत्र्य मिळून देण्यास मदत करणे.
  • पुनर्वसन समूहातील लोकांच्या पुनर्वसन प्रक्रियेवर लक्ष केंद्रीत करणे.
  • प्रत्येक रुग्णास पुनर्वसन सेवा उपभोगण्याचा अधिकार / हक्क असतो.

पुनर्वसन प्रक्रियेत सामाजिक आरोग्य परिचारिकेची भूमिका :

  • रुग्णांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक आणि व्यावसायिक स्थितीचे मूल्यांकन करणे.
  • रुग्णांच्या उपचारात्मक, भौतिक, व्यावसायिक, शिक्षण, प्रशिक्षण आणि साहाय्यक गरजांचे निदान करून पूर्तता करणे.
  • रुग्णांची स्वीकार्य अशी उत्पादन पातळी सुधारणे.
  • पुनर्वसन प्रक्रियेसाठी कृती योजना तयार करणे.
  • तयार केलेल्या कृती आराखड्याची / योजनेची अंमलबाजावणी करणे.
  • पुनर्वसन प्रक्रियेसाठी केलेल्या उपाययोजनेचे मूल्यांकन करणे.
  • गरजेनुसार उपाययोजनांमध्ये बदल करणे व केलेल्या उपाययोजनेंची अंमलबजावणी करणे.
  • पुनर्वसन संघाला (Rehabilitation team) रुग्णाच्या स्थितीविषयी माहिती देण्याचे महत्त्वाचे काम सामाजिक आरोग्य परिचारिकेद्वारे पार पाडले जाते.
  • रुग्णांची वैयक्तिक स्तरावर काळजी करणे.
  • पुनर्वसनाबाबत सामाजिक दृष्टिकोन तयार करणे.
  • पुनर्वसनासाठी अपंग मेळावा आयोजित करून त्यांच्या स्पर्धा घेणे.
  • विशिष्ट संस्थामध्ये संदर्भ सेवा देणे.
  • अपंग किंवा रुग्णाच्या कुटुंबियांना मानसिक आधार देणे.
  • अपंग किंवा रुग्ण व्यक्तींसाठी शासन देत असलेल्या विविध सोयीसुविधांची, योजनांची माहिती करून घेणे व तिचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी मदत करणे.
  • कम्यूनिटी केअर सेंटर, कृत्रिम अवयव केंद्र इत्यादी अनेक संदर्भ संस्थांविषयी माहिती गोळा करावी व रुग्णांना ती माहिती पोहोचवावी.

पुनर्वसन प्रक्रियेमध्ये सामुदायिक आरोग्य परिचारिकेचे गुण (Qualities of Rehabilitation Nurse ) :

  • ऐकण्याचे उत्कृष्ट कौशल्ये असणे आवश्यक आहे.
  • पुनर्वसना बद्दल योग्य तो सल्ला देण्याची क्षमता असणे गरजेचे आहे.
  • प्रभावीपणे समस्या सोडविण्याचे कौशल्ये असणे आवश्यक आहे.
  • रुग्णाला पुनर्वसनाबद्दल समजविण्यास मदत करण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धती अवलंबण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.
  • कार्यक्षेत्रात नेतृत्व करण्याची क्षमता आवश्यक.

संदर्भ :

  • S. Kamalam, Essentials in Community Health Nursing practice, 2nd Edition.

समीक्षक : रेशमा देसाई