प्रस्तावना : भारतातील “ग्रामीण आरोग्य मिशन” या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण आरोग्य परिचर्या देण्यासाठी आरोग्य सेवेमध्ये पर्यवेक्षकांची नेमणूक केली जाते. यात स्त्री पर्यवेक्षक (Female health supervisor / Female Health Assistant) आणि पुरुष पर्यवेक्षक (Male health supervisor/ Male Health Assistant) हे आरोग्य सेवा साहाय्यक म्हणून कार्यरत असतात. बहूद्देशीय कार्यकर्त्यांवर देखरेख ठेवणे व कामात मदत करणे ही पर्यवेक्षकाची प्रमुख जबाबदारी असते.

व्याप्ती : पर्यवेक्षणासाठी स्त्री पर्यवेक्षकांना ४०,००० इतकी ग्रामीण लोकसंख्या दिलेली असते व त्यांनी साधारणपणे ४ बहूद्देशीय स्त्री कार्यकर्त्यांनी (Auxiliary Nurse Midwife) दिलेल्या आरोग्य सेवेचे पर्यवेक्षण करणे अपेक्षित असते. तर पुरुष पर्यवेक्षकांना २५,००० ते ३०,००० इतकी ग्रामीण लोकसंख्या दिलेली असते आणि त्यांनी साधारणपणे ४ बहूद्देशीय पुरुष कार्यकर्त्यांनी दिलेल्या आरोग्य सेवेचे पर्यवेक्षण करणे अपेक्षित असते.

उद्दिष्ट : ग्रामीण आरोग्य परिचर्या देण्यासाठी प्रशासकीय नियोजन करणे, जनतेतील मानवी संबंध जपणे तसेच परिचारिकांच्या आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाचे पर्यवेक्षण करून त्याचे मूल्यमापन करणे हे परिचर्या पर्यवेक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे.   

स्त्री व पुरुष पर्यवेक्षकांच्या ग्रामीण आरोग्य सेवा देताना सामुहिक जबाबदाऱ्या :

  • बहूद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन कार्यात सहकार्य करून त्यांची परिचर्येतील कौशल्ये वृद्धींगत होण्यास सहकार्य करणे.
  • जनतेतील सहकार्य वाढविण्यासाठी प्रयत्न करणे.
  • इतर आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबर परिचर्या सेवेचे संयोजन करून समुह कार्य (Team Work) सांभाळणे.
  • पर्यवेक्षण भेटीसाठी बहूद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत गृहभेटी करणे, विविध आरोग्यविषयक कार्यक्रम राबविण्यासाठी सभा घेणे, ग्रामीण सेवा व शुश्रूषा याबाबत प्रगती अहवाल तयार करणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्याला पाठविणे.
  • प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा परिषद (मुख्यालय) येथील बैठकींना हजार राहणे.
  • वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र यांना आरोग्य सेवा नियोजनात मदत करणे आणि पाठपुरावा आकृतिबंध तयार करणे इ.
  • सामुदायिक आरोग्य शिबिरांच्या आयोजनात मदत करणे, आरोग्य सेवा देण्यासाठी लागणारी साधन सामुग्री मागवून तिचा पुरवठा करणे तसेच संदर्भ सेवा, पुनर्लेखन इ. अहवाल नोंदी तयार ठेवणे इ.
  • आरोग्य सेवेच्या नोंदी ठेवणे आणि जतन करणे.

स्त्री पर्यवेक्षकांच्या जबाबदाऱ्या :

  • स्त्री बहूद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत ( ANM) गृहभेटी देऊन, त्यांना कुटुंब नियोजन कार्यक्रमात मदत करणे व ग्रामीण भागात कुटुंब नियोजन साधनांचे वाटप करणे, माताबाल संगोपन आणि कुटुंब कल्याण क्लिनिक राबविण्यात सहकार्य करणे.
  • ग्रामीण भागातील सुईणी आणि स्त्रियांमधील नेत्यांसाठी आरोग्य प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे.
  • प्रत्येक उपकेंद्राला आठवड्यातून एकदा भेट देऊन स्त्री बहूद्देशीय कार्यकर्त्यांच्या कामाची पाहणी करणे.
  • तात्काळ सेवा देण्यास मदत करणे.
  • कुटुंब नियोजन कार्यक्रमात महिला मंडळ अध्यक्ष /सभासद, स्त्री सरपंच किंवा शिक्षिका यांचा समावेश करणे.
  • कायदेशीर गर्भपाताविषयी आवश्यकतेनुसार माहिती पुरविणे.

पुरुष पर्यवेक्षकांच्या जबाबदाऱ्या :

  • पुरुष बहूद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबर गृहभेटी देणे.
  • शालेय वयोगटातील मुलांकरिता लसीकरण कार्यक्रम राबिण्यास मदत करणे.
  • पुरुषांकरिता आयोजित कुटुंब नियोजन कार्यक्रमात सहकार्य करणे.
  • साथीच्या रोगांचा प्रादूर्भाव झाल्यास उपचार व प्रतिबंधात्मक सेवांचे आयोजन करणे.
  • सार्वजनिक स्वच्छता आणि शुद्ध पाणीपुरवठा यासाठी ग्रामपंचायत व पंचायत समिती यांच्याकडून सहकार्य मिळविणे, शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी क्लोरिनेशन प्रक्रिया राबविण्यास मदत करणे.
  • रक्त तपासणीमध्ये हिवताप (मलेरिया) प्रादूर्भाव असणाऱ्या व्यक्तीस मलेरियाचे मूलगामी (Radical ) उपचार देण्यास मदत करणे.
  • ग्रामीण भागातील लोकांना स्वतःसाठी शौचालय आणि बायोगॅस प्रकल्प बांधण्यासाठी प्रेरणा देणे इत्यादी.

सारांश : स्त्री व पुरुष पर्यवेक्षकांची भूमिका ही मुख्यत्वे ग्रामीण भागात आरोग्य परिचर्या पुरविणाऱ्या स्त्री व पुरुष कर्मचाऱ्यांशी पूरक असते. जेणेकरून त्या भागातील सर्व लोकांना प्राथमिक स्तरावरील आरोग्य सेवा (Primary Health Care) पुरविणे सोपे होऊन, सर्वांना आरोग्य ही संकल्पना पूर्णत्वास नेण्यास मदत होते.

संदर्भ :

  • Dept. of Family Planning , Govt. Of India, New Delhi.
  • K. Park, Preventive and Social Medicine, 2017.