कासाग्रेन – रिट्चे क्रेशियन परावर्ती दूरदर्शी :
कासाग्रेन दूरदर्शीमध्ये मुख्य आरसा (प्राथमिक आरसा) अन्वस्तीय (parabolic) असून, अपास्तिक (hyperbolic) दुय्यम आरसा मुख्य आरशाच्या समोर अशा प्रकारे स्थापित असतो, की अपास्तिक पृष्ठभागाच्या दोन नाभी – बिंदूंपैकी एक मुख्य आरशाच्या नाभी – बिंदूशी आणि दुसरा कासाग्रेन नाभी-बिंदूशी (नेत्रिकेच्या ठिकाणी) असतो. दुरून येणारे प्रकाशीय अक्षाशी समांतर असलेले प्रकाशकिरण या प्रकारच्या रचनेत एकसमान अंतर कापतात. परिणामत: पारंपरिक कासाग्रेन दूरदर्शी गोलीय विचलनापासून (spherical aberration) दोषमुक्त असते. त्याचप्रमाणे दूरदर्शीच्या समतुल्य नाभीय अंतराच्या तुलनेत नळीची लांबी देखील आखूड ठेवता येते. यात नेत्रिकेची जागा प्राथमिक आरशाच्या मागे असल्यामुळे मोठ्या आकाराच्या दूरदर्शी, न्यूटोनियन ऐवजी कासाग्रेन पद्धतीच्या असल्यास निरीक्षण करणे जास्त सोयीचे जाते. मुख्य आरशावर पडणारा प्रकाश दुय्यम आरशाद्वारे अडविला जात असल्यामुळे प्रतिमेची गुणवत्ता कमी होते. तेव्हा, दुय्यम आरशाचा आकार लहान ठेवणे आवश्यक असते. गोलीय विचलन नसल्यामुळे प्रकाशीय अक्षाशी समांतर (on-axis) किरण उत्तम प्रतीची प्रतिमा तयार करतात. परंतु प्रकाशीय अक्षापासून दूर, तिरक्या (off axis) किरणांमुळे, नाभीय प्रतलावर तयार होणाऱ्या प्रतिमांची गुणवत्ता तुलनेने कमी असते.
कासाग्रेनच्या रचनेतील अबिंदुकता (astigmatism) आणि कोमा (coma) ही प्रकाशीय विचलने काढून टाकण्यासाठी अमेरिकन खगोलशास्त्रज्ज्ञ जॉर्ज रिट्चे आणि फ्रेंच खगोलशास्त्रज्ज्ञ हेन्री क्रेशियन यांनी इ.स. १९१० च्या दरम्यान काही बदल सुचविले होते. प्रत्यक्षात इ.स. १९२७ मध्ये जॉर्ज रिट्चे यांनी एक २४ इंच व्यासाची या पद्धतीची परावर्ती दूरदर्शी तयार केली. यात मुख्य आणि दुय्यम आरसा – दोन्ही – अपास्तिक असल्यामुळे, तयार होणारी प्रतिमा कोमा-मुक्त असते. त्यामुळे प्रकाशीय अक्षाशी समांतर (on-axis) तसेच तिरक्या (off-axis) किरणांपासून तयार होणाऱ्या प्रतिमा रेखीव (sharp) असतात आणि पर्यायाने अधिक मोठे दृश्यक्षेत्र (field of view) निरीक्षणासाठी उपलब्ध होते. अबिंदुकता काढून टाकण्यासाठी आरशाचा अथवा जास्त नाभीय अंतर असलेल्या एक/अधिक भिंगांचा वापर केला जातो. कासाग्रेन दूरदर्शीमध्ये आरशांवरून परावर्तित झालेल्या प्रकाशाव्यतिरिक्त अनावश्यक आगंतुक प्रकाश (stray light) थेट नाभीय प्रतलावर पोहोचण्याची देखील शक्यता असते. परिणामत: प्रतिमेतील वैधर्म्य (contrast) कमी होते. या प्रकाशाला अडविण्यासाठी व्यारोध (baffle) वापरला जातो.
हबल अवकाशीय दूरदर्शी, केक दूरदर्शी आणि यूरोपियन स्पेस ऑर्गनायझेशनची व्हेरी लार्ज टेलिस्कोप ही याच रिट्चे-क्रेशियन प्रकारच्या दूरदर्शीची उदाहरणे आहेत. हिमालयीन पर्वतरांगांमध्ये हान्ले (लेह) येथील भारतीय खगोलशास्त्रीय वेधशाळेची (Indian Astronomical Observatory) ‘हिमालयन चंद्रा दूरदर्शी’ रिट्चे-कासाग्रेन पद्धतीची २ मीटर व्यासाची दूरदर्शी आहे.
संदर्भ :
- Rutten; Venrooij, Van, Telescope Optics: A Comprehensive Manual for Amateur Astronomers.
समीक्षक : आनंद घैसास