सेंटॉर लघुग्रह

‘सेंटॉर’ म्हणजे वरचे अर्धे शरीर मानवी आणि खालचे अर्धे शरीर आणि पाय घोड्याचे असणारा ग्रीक पुराण कथांमधील एक काल्पनिक प्राणी. लघुग्रहांच्या एका गटातील वस्तूंना अशा प्राण्यांची नावे दिली जातात, कारण या वस्तू लघुग्रह आणि धूमकेतू या दोन्हींचे गुणधर्म एकाच वेळी दाखवतात.

सेंटॉर लघुग्रह

लघुग्रहांचा मुख्य पट्टा मंगळ ते गुरू ग्रहांच्या कक्षांच्या दरम्यान आहे. परंतु, गुरूच्या कक्षेपलीकडे कक्षेचे ‘माध्यांतर’ असणारा ‘९४४ हिडाल्गो’ हा जरी इ. स. १९२० ला सापडलेला लघुग्रह असला, तरी या माध्यांतराच्या कक्षा असणाऱ्या लघुग्रहांचा एक गट होईल, असे काही त्यावेळी कळून आलेले नव्हते. लघुग्रहांचा शोध घेताना इ.स. १९७७ मध्ये ‘२०६० चिरॉन’ जेव्हा सापडला, तेव्हा त्याच्याभोवती हिडाल्गोसारखेच, धूमकेतूला जसे वायूचे थोडे आवरण, ज्याला ‘कोमा’ म्हणतात, तसे आहे, असे दिसून आले. चिरॉनची कक्षा ८.४३ खगोलीय एकक येथे उपसूर्य बिंदू, म्हणजे शनीच्या कक्षेच्या अंतरापेक्षा कमी अंतरावर, तर अपसूर्य बिंदू १८.८ खगोलीय एकक, म्हणजे युरेनसच्या कक्षांतरापर्यंत, अशी लघुग्रहांच्या मुख्य पट्ट्याच्या संपूर्णपणे बाहेर आहे, असे समजून आले. थोड्याच कालावधीत अशा दूरच्या बाह्यग्रहांच्या दरम्यान माध्यांतरांच्या कक्षा असणारे अनेक लघुग्रह सापडले. या साऱ्यांना आता लघुग्रह नाही तर ‘सेंटॉर’ असे म्हणतात.

जडणघडणीत ‘सेंटॉर’ हे, धूमकेतू आणि लघुग्रह दोघांशी साम्य दाखवणारे, बर्फाळ पृष्ठभाग असणारे, पण खडकाळ धातुमय अंतरंग असणारे आहेत. गुरू ते युरेनस-नेपच्यून या बाह्यग्रहांच्या कक्षांच्या दरम्यान कक्षांची माध्यांतरे असणाऱ्या या सर्व वस्तू आहेत. सेंटॉरच्या कक्षाही बऱ्याच प्रमाणात मोठ्या ग्रहांशेजारून जात असल्याने, या मोठ्या ग्रहांच्या गुरुत्वीय प्रभावाखाली त्या अस्थिर बनलेल्या आहेत, मार्ग बदलू शकणाऱ्या आहेत. त्यांच्या कक्षांमध्ये अचानक बदल होऊन, हे लघुग्रह मार्ग बदलून सरळ सूर्यावर जाऊन आदळण्याची किंवा कधी कधी ग्रहमालेबाहेर दूर भिरकावले जाण्याचीही शक्यता आहे. यातल्या अनेक वस्तूंची कक्षाप्रतले आयनिक वृत्ताशी मोठ्या प्रमाणात (सुमारे ८० अंशापर्यंत) तिरपी, कललेली आहेत.

                     ९४४ हिडाल्गो माध्यमांतर

आजपर्यंत (जून २०२०) आपल्याला एकूण १,१६० सेंटॉर वस्तूंची माहिती झालेली आहे. त्यातल्या २४ वस्तूंचे आजपर्यंत नामकरणही (विशेषनामे देऊन) करण्यात आले आहे. परंतु, यांपैकी कोणाचेच जवळून घेतलेले प्रकाशचित्र मात्र उपलब्ध नाही. तिरप्या कक्षांमुळे त्यांच्या कक्षांचे फारच कमी भाग, तेही कमी कालावधीसाठी (त्यांच्या उपसूर्य स्थितीच्या कक्षीय कमानीवर ते प्रवास करत असताना) दृष्टिपथात येणे शक्य होते. सध्या एक किलोमीटरहून मोठे, सुमारे ४४,००० सेंटॉर ५.२ ख.ए. ते ३२.५ ख.ए. या माध्यांतरांच्या दरम्यान असावेत, असा एक अंदाज आहे. मुळातच या वस्तू नेपच्यूनच्या कक्षेबाहेर असणाऱ्या ‘क्यूपर’ पट्ट्यातल्या असाव्यात आणि ग्रहांच्या गुरुत्वीय परिणामांनी कक्षाबदल होऊन त्या आता ग्रहमालेत आतमध्ये आल्या असाव्यात असा अंदाज आहे. शिवाय यातल्या काही (सुमारे १९) वस्तू, त्यांच्या विकेंद्री आणि अधिक तिरप्या कक्षांमुळे आपल्या ग्रहमालिकेबाहेरून आलेल्या असाव्या आणि गुरुत्वीय प्रभावामुळे सूर्याभोवती फिरू लागल्या असाव्या असे अनुमान आहे.

इ.स. १९९७ ला शोधला गेलेला ‘१०१९९ चारिक्लो’ हा सरासरी २५२ किलोमीटरचा (कदाचित थोडा लांबट २९६×२६४×२०४ किमी आकाराचा) लघुग्रह, सेंटॉर गटातला आकाराने सर्वात मोठा आहे. परंतु लघुग्रहाच्या मुख्य पट्ट्यातल्या वस्तूंच्या तुलनेत हा मध्यम आकाराचाच ठरतो. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चारिक्लोला शनीच्या कड्यांसारखी कड्या आहेत.

लघुग्रहांच्या शोधांच्या याद्या सांभाळणारी सध्या जगातली तीन महत्त्वाची आस्थापने आहेत. त्यांचे सेंटॉर गटातील वस्तूंसाठी लावलेले निकष मात्र वेगवेगळे आहेत. ‘मायनर प्लॅनेट सेंटर’ च्या निकषांप्रमाणे या वस्तूंचे उपसूर्य बिंदू गुरूच्या कक्षेपलीकडे, ५.२ ख.ए. पेक्षा अधिक अंतरावर आणि अपसूर्य बिंदू नेपच्यूनच्या कक्षेहून कमी, म्हणजे ३०.१ ख.ए. पेक्षा कमी अंतरावर असले पाहिजेत. ‘जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरी’ नुसार हीच अंतरे ३.५ ख.ए. ते ३०.१ ख.ए. पर्यंत धरली आहेत, तर ‘डीप एक्लिप्टिक सर्व्हे’ वेगळ्याच निकषांवर हे वर्गीकरण करतात. यात या वस्तूंच्या कक्षांची संगणकीय प्रारूपे करून त्यांची बदलती माध्यांतरे तपासतात. त्यात या कक्षांच्या माध्यांतरात पुढील एक कोटी वर्षात कसे बदल होतील, ते पाहण्यात येते. यात या कालावधीत सेंटॉरांची कक्षा नेपच्यूनच्या कक्षेपेक्षा कमी माध्यांतर राखणारी आढळली, तरच त्यांना सेंटॉर गटात सामील करून घेतले जाते. यात त्यांच्या कक्षा इतर ग्रहांच्या कक्षा ओलांडून आत-बाहेर करणाऱ्या असतील, तर ते योग्य आहे असेही यात गृहित धरतात.

सेंटॉर गटातल्या वस्तूंच्या कक्षांची माध्यांतरे गुरू ते शनीच्या दरम्यान असतील तर त्यांना ‘गुरूच्या कुटुंबातील सेंटॉर’ असे ठरवले जाते. तर ज्या वस्तूंचे अपसूर्य बिंदू नेपच्यूनच्या पलीकडे आहेत त्यांना ‘विखुरलेल्या-असंबद्ध कक्षा’ गटातील ठरवले जाते.

काही महत्त्वाचे सेंटॉर खालील कोष्टकात दिले आहेत.

नाव शोधवर्ष संशोधक कक्षांचा अर्धायुष्य कालावधी माध्यांतरे
५५५७६ॲमिकस

(55576 Amycus)

2002 पालोमर येथील ‘नीट’ प्रकल्प (NEAT at Palomar) 11.1

दशलक्ष वर्षे

युरेनस ते क्यूपर पट्टा
५४५९८ बिएनोर (54598 Bienor) 2000 मार्क बुइए आणि सहकारी

(Marc W. Buie et al.)

 – युरेनस
१०३७० हायलोनोम

(10370 Hylonome)

1995 ‘मौना की’ येथील वेधशाळा

(Mauna Kea Observatory)

6.3

दशलक्ष वर्षे

युरेनस ते नेपच्यून
१०१९९ चारिक्लो

(10199 Chariklo)

1997 स्पेसवॉच (Spacewatch) 10.3

दशलक्ष वर्षे

युरेनस
८४०५ अस्बोलस

(8405 Asbolus)

1995 स्पेसवॉच (जेम्स व्ही. स्कॉटी)

Spacewatch (James V. Scotti)

0.86

दशलक्ष वर्षे

शनी ते नेपच्यून
७०६६ नेस्सस

(7066 Nessus)

1993 स्पेसवॉच (डेव्हिड एल. रॅबिनोविच)

Spacewatch (David L. Rabinowitz)

4.9

दशलक्ष वर्षे

शनी ते क्यूपर पट्टा
५१४५ फोलस

(5145 Pholus)

1992 स्पेसवॉच (डेव्हिड एल. रॅबिनोविच)

Spacewatch (David L. Rabinowitz)

1.28

दशलक्ष वर्षे

शनी ते नेपच्यून
२०६० चिरॉन

(2060 Chiron)

1977 चार्लस टी. कोवल

(Charles T. Kowal)

1.03

दशलक्ष वर्षे

शनी ते युरेनस

संदर्भ :

समीक्षक : माधव राजवाडे