न्यूझीलंडमधील सर्वांत मोठे, तसेच ओशियॅनातील दुसऱ्या क्रमांकाचे गोड्या पाण्याचे सरोवर. न्यूझीलंडच्या नार्थ (उत्तर) बेटाच्या साधारण मध्यभागी असलेल्या ज्वालामुखी पठारावर सस.पासून ३५७ मी. उंचीवर हे सरोवर स्थित आहे. सरोवराचा आकार साधारण त्रिकोणी आहे. या सरोवराची उत्तर-दक्षिण कमाल लांबी ४६ किमी., पूर्व-पश्चिम कमाल रूंदी ३३ किमी., सरासरी खोली ११० मी., कमाल खोली १६० मी., परिघ १९३ किमी. आणि क्षेत्रफळ ६०६ चौ. किमी. आहे. सरोवराला मिळणाऱ्या नद्यांचे जलवाहनक्षेत्र ३,२८९ चौ. किमी. आहे. सरोवराच्या विशेषतः दक्षिणेकडून वाहत येणाऱ्या अनेक प्रवाहांद्वारे ताउपो सरोवराला पाणीपुरवठा होतो. त्यांपैकी न्यूझीलंडमधील सर्वाधिक लांबीची वाइकॅटो नदी नैर्ऋत्येकडील रूअपेहू या जागृत ज्वालामुखी शिखराच्या परिसरात उगम पावते. तिचा वरच्या टप्प्यातील प्रवाह (स्थानिक नाव टाँगरिरो) दक्षिणेकडून या सरोवराला मिळतो. वाइकॅटो याच नावाने सरोवराच्या ईशान्य भागातून खालच्या टप्प्याच्या स्वरूपात ती बाहेर पडते. या नदीमुळे सरोवराच्या अतिरिक्त पाण्याचे नियंत्रण होते. वायटॅहॅनुई, ताउरँग ताउपो या सरोवरास पाणीपुरवठा करणाऱ्या इतर नद्या आहेत. वाइकॅटो नदी सरोवरातून जेथे बाहेर पडते, तेथे ताउपो हे नगर आहे. सरोवराच्या आग्नेय भागात मोटूटाइको बेट आहे.

ताउपो सरोवरात अनेक ज्वालाकुंडांचे अवशेष समाविष्ट आहेत. त्यांपैकी ताउपो हा निद्रिस्त ज्वालामुखी सरोवराच्या ईशान्य भागात आहे. सुमारे ३,००,००० वर्षे हा ज्वालामुखी जागृत असावा असे अनुमान काढले गेले आहे. भूशास्त्रीय नोंदीनुसार गेल्या २७,००० वर्षांत येथील ज्वालामुखीचे २८ वेळा उद्रेक झालेले आहेत. सुमारे २६,५०० वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीय महाउद्रेक मालिकांमुळे आणि लाव्हाशंकू कोसळल्याने तयार झालेल्या महाकुंडामध्ये (ज्वालामुखी काहील) एक मोठी द्रोणी निर्माण होऊन, नंतर त्यात पाणी भरले जाऊन हे सरोवर निर्माण झाल्याचे मानण्यात येते. हा महाउद्रेक ‘ऑरूआन्यू उद्रेक’ या नावाने ओळखला जातो. भूशास्त्रीय नोंदींनुसार गेल्या ७०,००० वर्षांमध्ये जगामध्ये झालेल्या ज्वालामुखी उद्रेकांमध्ये हा सर्वांत मोठा ज्वालामुखी उद्रेक होता, असे मानले जाते. या सरोवराच्या निर्मितीसंबंधी अशीही एक शक्यता वर्तविली जाते की, सुमारे १,८०० वर्षांपूर्वी ताउपो ज्वालामुखी आणि त्याच्या जवळपासच्या ज्वालामुखींच्या महाउद्रेक मालिकांमुळे एक मोठी ज्वालामुखी काहील निर्माण होऊन त्याजागी आजचे सरोवर निर्माण झाले. काही तज्ज्ञांच्या मते सरोवराच्या काही खोलगट भागाची निर्मिती प्रचंड प्रमाणावरील ज्वालामुखी उद्रेकांमुळे झाली असून उर्वरित भाग प्रस्तरभंगालगतच्या खडकयुक्त गटाचे अधोगमन होऊन निर्माण झालेला असावा. त्यामुळेच सरोवराच्या पश्चिम किनाऱ्यावर उभे कडे आढळतात.

सरोवराच्या उत्तर भागातील रॉटोकावा आणि दक्षिण भागातील तूरांगी यांसारखे अनेक उष्ण पाण्याचे झरे सरोवराच्या किनारी भागात आढळतात. त्यावरून सरोवराच्या तळाशी आजही भूगर्भीय जलौष्णिक हालचाली सुरू आहेत, असे संशोधकांचे मत आहे. हे झरे आरोग्यधामे म्हणून प्रसिद्ध आहेत. तसेच त्या झऱ्यांचा उपयोग भूऔष्णिक वीज निर्मितीसाठी केला जातो. या झऱ्यांमध्ये अतिउष्ण वातावरणामध्ये देखील जिवंत राहू शकतील, असे विशिष्ट सूक्ष्मजीव आढळतात. सरोवराच्या परिसरात उष्ण पाण्याचे झरे आहेत,  तसेच तेथील भूकवचातील सूक्ष्म फटींमधून (प्रस्तरांमधून) वाफ आणि वायू बाहेर पडताना आढळते. त्यांवरून ताउपो ज्वालामुखी मृतावस्थेपेक्षा निद्रिस्तावस्थेत असल्याचे मानले जाते.

सरोवरातील पाण्याची पातळी न्यूझीलंडच्या मर्क्यूरी या ऊर्जानिर्मिती कंपनीकडून नियंत्रित केली जाते. त्यासाठी १९४०-४१ मध्ये येथे बांधलेल्या दरवाज्यांचा उपयोग केला जातो. पूरनियंत्रण, जलसंधारण आणि वाइकॅटो नदीत किमान ५० घ. मी. इतका पाण्याचा प्रवाह कायम राखण्यासाठी या दरवाजांचा उपयोग केला जातो.

सरोवराच्या परिसरात सर्व ऋतूत पाऊस पडत असला, तरी जून ते डिसेंबर या कालावधीत तो अधिक असतो. सरोवराच्या पाणलोट क्षेत्रामध्ये प्रामुख्याने बीच आणि पादफल (पोदोकार्प) वनस्पतींचे जंगल आहे. यामध्ये नेचेदेखील मोठ्या प्रमाणात आढळतात. सरोवराच्या तळाशी असलेल्या भूऔष्णिक निर्गमद्वाराभोवती स्पंज प्राण्यांच्या तसेच अपृष्ठवंशी प्राण्यांच्या वसाहती आढळतात.

सरोवराला दरवर्षी सुमारे २० लाख पर्यटक भेट देतात. त्यामुळे पर्यटन हा ताउपो येथील व्यवसाय क्षेत्रातील प्रमुख घटक आहे. समशीतोष्ण कटिबंधीय हवामान, निसर्गसुंदर परिसर, उष्ण पाण्याचे झरे, विविध खेळांच्या व मनोरंजनाच्या सुविधा इत्यादींमुळे मोठ्या संख्येने पर्यटक येथे येत असतात. उन्हाळ्यात विशेषतः नाताळ आणि नववर्षाच्या कालावधीमध्ये तर हा परिसर पर्यटकांनी गजबजलेला असतो. येथे ‘ताउपो सरोवर सायकल आव्हान’ नावाची सरोवराभोवती फेरी मारण्याची स्पर्धा भरविली जाते. याशिवाय स्कायडाइव्हिंग आणि पॅरशूटिंग (हवाई छ्त्रीचा खेळ) हा येथील लोकप्रिय स्थानिक खेळ असून तो पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. या सरोवरातील ४०.२ किमी. अंतर पोहूण पार करणे हे खुल्या पाण्यात पोहणाऱ्यांसमोर मोठे आव्हान असते. ऑस्ट्रेलियातील डार्विन येथील मायकेल वेल्स यांनी २०२० मध्ये हे सरोवर पोहूण पार करण्याचा पहिला विक्रम नोंदविला.

ताउपो पर्यटनातील प्रमुख आकर्षण म्हणजे सरोवराच्या वायव्य भागात असलेले ‘माइन बे माओरी शैलशिल्प’ होय. सरोवराच्या वायव्य भागातील माइन बे नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका डोंगर कड्यावर १९७० च्या उत्तरार्धात मताही व्हाकटका-ब्राइटवेल आणि जॉन रँडल यांनी १० मीटरपेक्षा जास्त उंचीचे शिल्प कोरले. माओरी जमातीच्या आख्यायिकेनुसार हजारो वर्षांपूर्वी तुव्हारेटोआ आणि तीअरावा या जमातींना ताउपो परिसरात एंगाटोरोइरंगी यांनी मार्गदर्शन केले होते. त्यांच्या आदराप्रीत्यर्थ त्यांचे शिल्प येथे कोरण्यात आले आहे. हे शिल्प सरोवराच्या परिसरात होत असलेल्या भूगर्भीय हालचालीपासून देखील रक्षण करतो, अशी येथे समजूत आहे. हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनले असून दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेट देतात.

जे. एस्. पोलॅक आणि रेव्हरेंड टॉमस चॅपमन यांनी १८३० च्या दशकात हे सरोवर पाहिले. हे सरोवर पाहणारे तेच पहिले यूरोपीयन होत.

समीक्षक : वसंत चौधरी