फिनलंडच्या उत्तर भागातील लॅपलँड प्रांतातील सर्वांत मोठे सरोवर. हे सरोवर रशियाच्या सीमेलगत आहे. आर्क्टिक वृत्ताच्या उत्तरेस स. स.पासून ११९ मी. उंचीवर असलेल्या या सरोवराची कमाल लांबी ८० किमी., कमाल रूंदी ४० किमी., सरासरी खोली १५ मी., कमाल खोली ६१ मी. आणि क्षेत्रफळ १,१०२ चौ. किमी. आहे. या सरोवरास नैर्ऋत्येकडून वाहत येणाऱ्या इव्हॅलो नदीपासून पाणी पुरविले जाते, तर पूर्वेस आर्क्टिक महासागराकडे वाहत जाणाऱ्या पात्स नदीद्वारे जलनिस्सारण होते. हे सरोवर नोव्हेंबर ते मे या कालावधीत गोठलेले असते.

सरोवराच्या नैर्ऋत्य काठावर वसलेले इनारी शहर हे एक व्यापारी व सांस्कृतिक केंद्र असून येथील मासेमारी आणि नौकाविहाराच्या उत्कृष्ट सुविधांमुळे पर्यटनाच्या दृष्टीने ते विशेष प्रसिद्ध आहे. १९५६ मध्ये स्थापन झालेले लेमेनजोकी हे फिनलंडमधील सर्वांत मोठे (क्षेत्रफळ २,८५० चौ. किमी.) राष्ट्रीय उद्यान इनारी आणि किट्टीला परिसरातच वसलेले आहे. सरोवरामध्ये ३,००० पेक्षा जास्त बेटे आहेत. त्यांपैकी हौतुमासारी (ग्रेव्हर्ड आयलंड) हे बेट महत्त्वाचे असून येथे प्राचीन सामी लोकांची स्मशानभूमी होती. सरोवरात ट्राउट, सॅल्मन, पर्च, पाइक इत्यादी मासे आढळतात.

समीक्षक – वसंत चौधरी

प्रतिक्रिया व्यक्त करा