छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी. तुळजापूर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांमधील आद्य पीठ मानले जाते. देवी भागवतात तुळजापूरचा उल्लेख भारतातील ५१ शक्तिपीठांमध्ये केलेला आहे. विविध ग्रंथांत ‘त्वरजा’, ‘तुरजा’, ‘त्वरिता’ या नावांनी एका देवीच्या उपासनेचा उल्लेख येतो. ‘त्वरजा’ व ‘तुरजा’ या शब्दांपासून ‘व’ चे संप्रसारण व, ‘र’ चा ‘ल’ किंवा ‘ळ’ होऊन ‘तुलजा’ किंवा ‘तुळजा’ असा शब्द बनणे शक्य आहे, असे ग. ह. खरे यांचे मत आहे. तुळजापूर हे ठिकाण सोलापूरच्या ईशान्येस ४५ किमी. व उस्मानाबाद (पूर्वीचे धाराशिव) या जिल्ह्याच्या ठिकाणापासून दक्षिणेला २२ किमी. अंतरावर वसलेले आहे. तुळजाभवानी ही महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा राज्यातील अनेकांची कुलदेवता असल्याने अनेक भाविक येथे तीर्थयात्रेच्या निमित्ताने येत असतात.

तुळजाभवानीची प्रतिमा, तुळजापूर.

तुळजापूरचा प्राचीन इतिहास ठामपणे सध्यातरी सांगता येत नसला तरी, ‘तेर’ हे प्रसिद्ध सातवाहनकालीन व्यापारी केंद्र याच प्रदेशात असल्याकारणाने तुळजापूर परिसरातून इंडो-रोमन व्यापारी मार्ग जात असावा. तुळजापूरपासून जवळच आपसिंगा, तीर्थ बु., काटी-सावरगाव इ. ठिकाणी सातवाहनकालीन अवशेष आढळून आले आहेत. या प्रदेशांवर पुढच्या काळात बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट, कल्याणीचे चालुक्य, यादव, बहमनी, आदिलशाही, मोगल व निजाम या राजवटींचा अंमल होता. पुढे काही काळ ब्रिटिश अधिकारी कर्नल मेडोज टेलर हे या भागाचे आयुक्त (कमिशनर) होते.

तुळजापूर येथील मुख्य आकर्षण म्हणजे तुळजाभवानीचे मंदिर. हे मंदिर बालाघाट डोंगररांगेतील ‘यमुनाचल’ नावाच्या डोंगरावर बांधलेले आहे. रा. चिं. ढेरे यांच्या मते, ‘यमुनाचल’ हे पर्वतनाम ‘यम्मन गुड्ड’ (यमाईचा डोंगर) या कन्नड नावाचे संस्कृतीकरण असावे. सध्याच्या तुळजाभवानी मंदिरात मूळ जुन्या मंदिराचे काही अवशेष दिसून येतात. मंदिराच्या सभामंडपातील काही स्तंभ, तसेच मंदिर परिसरातील इतर प्राचीन अवशेषांवरून हे मंदिर साधारणतः १३ व्या शतकात बांधले असावे, असे दिसते. सध्या गर्भगृह, सभामंडप, होमकुंड, कल्लोळ तीर्थ, गोमुख तीर्थ इ. स्थापत्य मंदिर परिसरात दिसते. देवीचे मंदिर हे दगडी प्राकाराने बंदिस्त असून, त्याच्या पूर्व आणि पश्चिमेस उंच कमानींची भव्य प्रवेशद्वारे आहेत. प्राकाराला लागून असणाऱ्या ओवर्‍यांत विभिन्न परिवारदेवता आहेत. साधारणतः अठराव्या शतकात मंदिराच्या बांधणीत निजामाचे सरदार व निंबाळकर घराण्याचे मोठे योगदान असल्याचे येथील वास्तुस्थापत्यावरून दिसून येते. निंबाळकर दरवाजाच्या बाहेरील भागात दोन्ही बाजूंना ‘मातंगी देवी’ व ‘भैरवा’ची मंदिरे आहेत. ही मंदिरे त्यांच्या स्थापत्यरचनेवरून साधारणतः चौदाव्या शतकात बांधली असावीत, असे दिसते.

तुळजाभवानी मंदिर, तुळजापूर.

तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहातील देवी ही अष्टभुजा महिषासूरमर्दिनीच्या रूपात आहे. प्रतिमा एका उंच पीठावर विराजमान असून, तिच्या मस्तकावरील मुकुटावर सयोनी-लिंग आहे. हातात त्रिशूळ, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र धारण केलेले आहे. पाठीवर बाणांचा भाता आहे. डावा पाय भूमीवर टेकलेला असून, उजवा पाय महिषासुराच्या शरीरावर दाबलेला आहे. देवीमुखाच्या उजव्या-डाव्या बाजूंना चंद्र-सूर्य कोरलेले आहेत. महिषासुराच्या धडाच्या उजवीकडे सिंह हे देवीचे वाहन आहे; त्याच्या खालच्या भागात एक ऋषी आणि डावीकडे एक तपस्वी आहे. देवीमूर्तीवर चक्राकार कुंडले, केयूर, अंगद, काकणे, कंठा, माला, मेखला आणि साखळ्या कोरलेल्या आहेत. ग. ह. खरे यांच्या मते, ही मूर्ती सतराव्या-अठराव्या शतकात घडविलेली असावी.

तुळजापूर व तुळजाभवानी संबंधित माहिती काही कोरीव लेखांद्वारेही प्राप्त होते. ‘अंबादेवी’ असा उल्लेख असलेला तुळजापूर परिसरातील महामंडलेश्वर कदंब मुरुडदेवच्या काळातील (इ. स. ११६४) एक शिलालेख काटी-सावरगाव या गावी सापडला आहे. तुळजाभवानी संबंधित सर्वांत जुना शिलालेखीय स्पष्ट निर्देश तुळजापूर तालुक्यातील ‘काटी’ येथे १३९७ (शके १३२०) सालच्या एका शिलालेखात पहावयास मिळतो. या शिलालेखात ‘परसरामाजी गोसावी’ (संभवतः दसनामी गोसावी) नावाच्या व्यक्तीचा तुळजापूरच्या यात्रेस आल्याचा उल्लेख देखील आहे. तुळजाभवानी मातेला एकशे एक मोहरांची माळ अर्पण केली गेली होती. तिच्यातील प्रत्येक पुतळीवर ‘श्री राजा शिव छत्रपती’ व ‘श्री जेगदंबा [प्रसन]’ ही अक्षरे कोरण्यात आलेली आहेत. सदर माळ छत्रपती शिवाजी द्वितीय किंवा छत्रपती शिवाजी तृतीय यांनी देवीला अर्पण केली असावी, असे अमोल बनकर यांचे मत आहे. उर्वरित उपलब्ध सर्व कोरीव लेख शिवोत्तर काळातील आहेत. त्यामध्ये अहिल्याबाईंच्या विहिरीतील लेख, धाकट्या तुळजापुरातील तुळजामातेच्या पादपीठावरील लेख, मंकावती गल्लीतील शिलालेख इ. शिलालेखांचा समावेश होतो.

तुळजापूरचा एक उल्लेख (इ. स. १७६५) औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील बिलोणी या गावी तुकाई मंदिरासमोरच्या दीपमाळेवर दिसून येतो. तुळजाभवानी मंदिराच्या दक्षिणेकडील पितळी प्रवेशद्वारावर १८८१ चा एक प्रदीर्घ रजतलेख आहे. ह्यात एक स्तोत्र असून याची रचना मध्य प्रदेशातील देवासच्या पवार घराण्यातील राजपुरुष ‘नारायणराव पवार’ यांनी केली होती.

मध्ययुगातील अनेक ग्रंथ व बखरींत या देवीचा व क्षेत्राचा उल्लेख आढळतो. पंधराव्या शतकातील नरसिंह सरस्वती लिखित गुरुचरित्र, महिकावतीची बखर, १६ व्या शतकातील गुणकीर्ती लिखित धर्मामृत  व अबुल फजल लिखित ऐने अकबरी  या ग्रंथांतून तुळजाभवानीचे संदर्भ प्राप्त होतात. सोळाव्या-सतराव्या शतकातील संत एकनाथ व संत रामदास या संतांच्या लिखाणातही देवीचे संदर्भ आढळून येतात. सभासद बखरीमध्ये अफझलखानाने तुळजापुरात तुळजाभवानी मंदिराची विटंबना केल्याचे वर्णन आलेले आहे.

उत्तर मध्ययुगात तुळजाभवानीचे माहात्म्य वाढत गेले असल्याचे तत्कालीन कागदपत्रांच्या आणि इतर पुराव्यांच्या आधारे स्पष्ट होते. याचेच प्रतिबिंब तत्कालीन महत्त्वाच्या राजघराण्यांच्या त्या राजघराण्यातील व्यक्तींच्या संबंधाच्या आधारे निदर्शनास येते. या राजघराण्यात छ. शाहू महाराज, मुधोजी निंबाळकर, रावरंभा निंबाळकर, दमाजी गायकवाड, महादजी शिंदे, अहिल्यादेवी होळकर व पेशवे घराण्यातील स्त्रियांनी तुळजापूरला भेटी दिल्याचे संदर्भ आढळतात.

तुळजापुरात अनेक तीर्थे असून, त्यांपैकी ‘कल्लोळतीर्थ’, ‘गोमुखतीर्थ’ आणि ‘सुधाकुंड’ ही तीर्थे भवानी मंदिराच्या प्रकारात आहेत. ‘पापनाशी तीर्थ’ गावाच्या दक्षिणेस बालाघाट डोंगराच्या कड्यावर आहे. ‘म्हंकावती’ अथवा ‘मंकावती’ तीर्थ भवानी मंदिराच्या पूर्वेकडे आहे. स्थलपुराणात या तीर्थाचा उल्लेख ‘विष्णुतीर्थ’ या नावाने आलेला आहे. ‘नागझरी’ हे तीर्थ भवानी मंदिराच्या उत्तरेस, काळभैरवाच्या वाटेवर दक्षिण बाजूस डोंगरदरीत आहे. याशिवाय भारतीबुवांच्या मठाच्या मागील बाजूस ‘काशीकुंड’ आहे; रामवरदायिनी जवळ ‘रामकुंड’ आहे; अरणबुवांच्या मठाजवळ ‘चंद्रकुंड’ आणि ‘सूर्यकुंड’ ही दोन कुंडे आहेत. ‘मातंगी कुंड’ हे मातंगीदेवीशी संबंधित तीर्थ आहे. याशिवाय भगवतीबाईंची विहीर, सोंजीबुवाची  विहीर, कोटाची विहीर, पिराची विहीर, लिंगाप्पा नाइकांची विहीर अशा अनेक विहिरी तुळजापुरात आहेत.

कर्नाटकातील विशेषतः सेन, कर्नाट आणि संभवतः कदंब ही राजकुळे तुळजाभवानीच्या उपासनेशी संबंधित होती. सेन व कर्नाट या दोन राजकुलांनी तिचा महिमा सुदूर बंगाल, मिथिला, हिमाचल आणि नेपाळपर्यंत पोहोचविला. नेपाळमधील काठमांडू व भक्तपूर येथे तुळजाभवानीची मंदिरे आहेत. येथे भवानीमातेला ‘देगु तलेजू’ या नावाने ओळखले जाते.  नेपाळी परंपरेनुसार भक्तपूर येथील मंदिर १३२४ साली उभारले गेले.

तुळजामातेच्या पुजाऱ्यांसाठी वापरली जाणारी ‘भोपा’ ही संज्ञा कदमराव पाटलांना लावली जाते. रा. चिं. ढेरे यांच्या मते, ‘भोपा’ ही संज्ञा संस्कृतेतर देशी भाषेतील आहे. भोपा या संज्ञेचा निःशंक लिखित उल्लेख उत्तर कोकणातील शिलाहारांच्या कोरीव लेखांत आढळतो. एकूणच पुजाऱ्यांसाठी ‘भोपा’ ही संज्ञा उपयोगात आली असावी. तुळजापूरच्या भोपे घराण्यात भगवतीबाई ही कर्तबगार महिला होऊन गेली. महाराणी ताराबाईंचे नातू रामराजे हे भाऊबंदकीच्या कारस्थानात बळी पडण्याचे भय असल्यामुळे महाराणी ताराबाईंनी त्यांना जन्मक्षणापासून गुप्तपणे भगवतीबाईंच्या घरी तुळजापुरात सुरक्षित ठेवले होते, असे सांगितले जाते. तुळजापूरच्या भोपे घराण्याचा आणि महादजी शिंदे यांचाही विशेष संबंध होता. त्यांनी तुळजापूरच्या आनंदराव कदम भोपे यांच्या मुलीशी १७९२ साली विवाह केला होता. प्रख्यात दत्तोपासक माणिकप्रभू (शके १७३९—१७८७) हे देवीचे भोपी होते.

तुळजापुरात काही मध्ययुगीन मठही आहेत. हे सर्व मठ तुळजाभवानी मातेच्या विभिन्न पूजा-विधी व अन्य सेवाकार्यांशी जोडले गेले आहेत. या मठांमध्ये ‘रणछोड भारती मठ’, ‘गरीबनाथ मठ’, ‘वाकोजीबुवांचा मठ’, ‘हमरोजीबुवांचा मठ’, ‘अरणबुवांचा मठ’, ‘सोमवारगिरजी मठ’ प्रमुख आहेत. रणछोडदास मठाची परंपरा दसनामी गोसाव्यांपैकी ‘भारती’ शाखेची आहे. गरीबनाथ या नाथपंथीय मठात हिंगलाजदेवीचा तांदळा असून या मठाला औरंगजेबासह अनेक राजेरजवाड्यांनी दिलेल्या सनदा आहेत.

तुळजाभवानी मंदिराव्यतिरिक्त यमाई मंदिर, रामवरदायिनी मंदिर, घाटशिळ, आडातला गणपती, लवनी गुंबद इ. अन्य स्थळे तुळजापूर येथे आहेत.

संदर्भ :

  • Bankar, Amol, ‘The enigma of the gold Mohurs of Chhatrapati Shivaji’, Issue 203, The Journal of oriental numismatic Society, London, U.K., 2010.
  • कुलकर्णी, अमोल, ‘उस्मानाबाद जिल्ह्याच्या मध्यभागातील आद्य ऐतिहासिक ते मध्ययुगीन कालखंडातील स्थळांचे पुरातत्त्वीय अध्ययन’, पीएच.डी. प्रबंध (अप्रकाशित) डेक्कन कॉलेज, पुणे, २००९.
  • खरे, ग. ह., महाराष्ट्राची चार दैवते, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, १९५८.
  • ढेरे, रा. चिं., श्रीतुळजाभवानी, पुणे, २००७.
  • तुळपुळे, शं. गो. प्राचीन मराठी कोरीव लेख, पुणे विद्यापीठ प्रकाशन, पुणे, १९६३.
  • रोडे, सोमनाथ, मध्ययुगीन तुळजापूर, संशोधक, धुळे, २००५.

                                                                                                                                                                                             समीक्षक : गोपाल जोगे