प्राचीन बॅबिलोनियातील एक प्रमुख देव. तो जलदेव एन्की (इआ) व डॅमकिना (दमकिना) यांचा मुलगा होय. मार्डुक हा सूर्याशी संबंधित देव म्हणून ओळखला जातो. तो पहिल्या राजवंशाच्या काळात बॅबिलनचा नगरदेव होता. इआचा पुत्र असल्याकारणाने तो जादूशी संबंधित तसेच सूर्यदेवतेच्या निःपक्षपाती, अनुकंपा तसेच न्याय या वैशिष्ट्यांनी युक्त आहे. तो एक तरुण योद्धा व ड्रॅगनवर वचक ठेवण्याची क्षमता असणारा असा आहे. सामान्यतः पंखधारी ड्रॅगन व शिंग ही त्याची ओळख आहे.

सातव्या शतकाच्या सुमारास लिहिले गेलेले ‘एन्युमा एलिश’ या महाकाव्याचा तो नायक आहे. या महाकाव्यात त्याच्या जन्माची कथा व योद्धा म्हणून असलेली त्याची ओळख कशी निर्माण झाली याचे वर्णन मृत्तिकापटलांवर सुमेरियन-अकेडियन लिपीमध्ये लिहिले आहे. यानुसार प्राचीन देवता ॲबझू व तैमात अनुक्रमे गोडे पाणी व खारे पाणी ह्यांच्यापासून बाकीचे तरुणदेव निर्माण झाले. त्यांच्या हालचालींमुळे ॲबझू व तैमात यांच्यात हालचाली निर्माण झाल्या. त्यामुळे ॲबझू ह्या नवीन देवांना मारून टाकण्याविषयी बोलू लागतो, मात्र तैमात याच्याविरुद्ध असते. हे सर्व इआच्या कानावर जाते. तो ॲबझूवर मंत्र टाकून त्याला गाढ झोपवून त्याची जागा स्वतः बळकावतो.

ॲबझूच्या ह्या विचित्र अवस्थेमुळे तैमात प्रचंड रागावते आणि इआ व इतर देव ह्यांच्याशी लढण्यासाठी स्वतःचे सैन्य उभारू लागते. ती अकरा सशस्त्र असे राक्षस निर्माण करते आणि या सैन्याचे नेतृत्व किंगू ह्या तिच्या दुसऱ्या सहचारावर सोपवते. किंगूकडे ‘टॅबलेट ऑफ डेस्टिनीज’ (Tablet of Destinies) सुद्धा सोपवते. बाकीचे तरुणदेव आणि इआसुद्धा ह्या युद्धाच्या तयारीबद्दल ऐकतात आणि प्रचंड घाबरतात. इआ अँशरशी बोलून त्यातून मार्ग काढायला सांगतो. मात्र तैमातशी लढण्याशिवाय पर्याय नसतो; पण कोणीही तिच्याविरुद्ध जायला तयार होत नाही, अगदी इआसुद्धा. त्यामुळे सर्व देव मार्डुकची प्रार्थना करतात. तो हे आव्हान स्वीकारतो. मार्डुक चार वाऱ्यांसह, जाळे, धनुष्य घेऊन तैमातसमोर जातो. ती जेव्हा त्याला गिळू पाहाते, तेव्हा तो तिच्या मुखामध्ये वारा सोडून तिला फुगवून तिच्या हृदयाचा छेद घेतो. त्यामुळे दोन भागात विभागलेले तिचे शरीर पृथ्वी व स्वर्गात स्थापन करतो. तसेच तो ‘टॅबलेट ऑफ डेस्टिनीज’ किंगूकडून काढून घेऊन स्वतःच्या छातीवर धारण करतो आणि किंगूच्या रक्तापासून मनुष्याने निर्माण करतो. ह्यामुळे सर्व देव आनंदाने मार्डुकचे भव्य मंदिर बॅबिलोनियामध्ये उभारतात.

वास्तविक पाहता मार्डुक वादळीवाऱ्यांचा देव असावा, असे लक्षात येते. ‘एन्युमा एलिश’च्या शेवटच्या पटलावर त्याच्या पन्नास नावांची यादीसुद्धा आढळते. ‘टॅबलेट ऑफ डेस्टिनीज’ हस्तगत झाल्यावर तो सर्व पृथ्वी, स्वर्ग, देव, मनुष्य, दानव ह्यांच्यावर आधिपत्य गाजवू लागला. बॅबिलनमधील इसझील व इटमेनॅन्की ह्या ठिकाणी त्याची मंदिरे होती. इसझीलमध्ये वार्षिक उत्सवामध्ये ‘एन्युमा एलिश’चे कथन किंवा गायन होते. मार्डुकचे प्रतीक म्हणून बुध तारा दाखवला जातो. त्याच्या हातात राजदंड व धनुष्य असते. मार्डुकच्या हातातील कंदील, त्रिकोणाकृती कुदळ हे प्रजननाचे व धनधान्याचे प्रतीक आहे. काही चित्रांमध्ये तो त्याच्या रथामध्ये किंवा चालताना दिसतो. त्याच्या अंगरख्यावर तारे काढलेले दिसते. तर हातात धनुष्य, वज्र, जाळे इत्यादी दिसून येते. नंतरच्या काळात तो बेल या नावाने ओळखला जाऊ लागला. या शब्दाचे मूळ सीरियन भाषेमध्ये सापडते, ज्याचा अर्थ स्वामी असा होतो.

संदर्भ :

                                                                                                                                                                                       समीक्षक : शकुंतला गावडे