जॉन हॉल : ( २१ ऑगस्ट १९३४ )

जॉन हॉल यांचा जन्म अमेरिकेतील कोलेरैडोमधील डेन्व्हर येथे झाला. आपले डॉक्टरेटचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टॅन्डर्डस ऍन्ड टेक्नालजी येथे हॉल कार्यरत झाले. तेथे त्यांनी लेसर तंत्रज्ञानावर आधारित वर्णपटमापनासाठी विविध प्रकारचे विशेषतः वारंवारता फणी (फ्रिक्वन्सी कोंब) हे, तंत्रज्ञान विकसित केले. त्यामुळे एक लाख अब्ज भागातला एक भाग एवढ्या अचूकतेने वर्णपट मापन करता येऊ लागले. वर्णरेखांची वारंवारता अचूकपणे मोजून कालच्या अतिशय छोट्यातल्या छोट्या भागाचे मापन करणे साध्य झाले. अचूक कालमापनानद्वारे अंतराचेही अचूक मापन या लेसर तंत्रज्ञानामुळे शक्य झाले. पूर्वी अंतर आणि वेळ यांच्या मापनासाठी पृथ्वीचा आकार आणि भ्रमण यांचा वापर केला जात असे. परंतु त्यात त्रुटी आढळून आल्या होत्या. रोय ग्लाउबर यांची पुंजप्रकाशिकीची सैद्धांतिक सूत्रे आणि जॉन हॉल व थिअडोर हांश यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान यामुळे सूक्ष्म वेळ अत्यंत अचूक मोजणे, अतिवेगवान संगणक बांधणे, नैसर्गिक स्थिरांक कालानुसार खरोखर स्थिर आहेत का हे तपासणे, जागतिक स्थान निश्चितता प्रणालीमध्ये सुधारणा करणे हे सर्व शक्य झाले. हॉल यांना अनेक सन्मान प्राप्त झाले, त्यापैकी मुख्य म्हणजे चार्ल्स हार्ड टाउन्स अवार्ड, आइनस्टाइन पारितोषिक, मॅक्स बार्न अवार्ड आणि भौतिकशास्त्राचे २००५ सालचा नोबेल पुरस्कार.

 समीक्षक : हेमचंद्र प्रधान