हार्वे, विलियम : ( १ एप्रिल,  १५७८ ते ३ जून, १६५७ ) 

विलियम हार्वे यांचा जन्म इंग्लंडमधील फॉल्कस्टोन, केंट येथे झाला. १५८८ ते १५९३ या काळात हार्वे यांनी कँटबरीतील किंग्ज शाळेतून शिक्षण घेतले. १५९३ ते १५९९ या दरम्यान त्यांनी गाविल (Gaville) आणि कायस (Caias) केंब्रिजमधून कला आणि वैद्यक शास्त्राचे शिक्षण घेतले. इटलीतील पदुआ (Padua) विद्यापीठात त्यांनी वैद्यकीय शिक्षण सुरू ठेवले. इटालियन शरीरशास्त्रज्ञ आणि शल्यविशारद हेरोनियम फॅब्रिशियस (Heronium Fabricious) यांचे ते शिष्य होते. हार्वेना १६०२ मध्ये डॉक्टरेट मिळाली आणि वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी ते इंग्लंडला परत आले. १६०७ मध्ये ते रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनचे फेलो झाले. १६१५ मध्ये त्यांची शल्यचिकित्सेमध्ये ल्युमिनियन व्याख्याता म्हणून रॉयल कॉलेजला नेमणूक झाली. १६०९ ते १६४३ ते सेंट बार्थोलोमेस दवाखान्यात फिजिशियन म्हणून कार्यरत होते. १६१८ पासून ते राजा जेम्स (१) चे फिजिशियन म्हणून नेमले गेले होते. त्या राजाच्या मृत्यूनंतर ते राजा चार्ल्सचे परंतु फिजिशियन होते. या दोघा राजांनी हार्वेच्या प्रयोगांना प्रोत्साहन दिले. राजवाड्यातील हरणांवर प्रयोग करण्याची त्यांना मुभा होती.

त्या काळात चेटकीण/जादूटोणा इत्यादीवर लोकांचा खूप विश्वास असायचा. कुठल्याही संशयास्पद किंवा विचित्र वागणुकीसाठी जादूटोणा कारणीभूत आहे असे गृहित धरले जायचे. परंतु हार्वेनी अशा घटनांसाठी वैज्ञानिक कारण शोधायचा प्रयत्न केला.

हार्वे यांनी १६२८ मध्ये  Exercitatio Anatomica de Motu Cordis et Sanguinis in Animalibus (लॅटिन) म्हणजेच ‘प्राण्यांमधील हृदय आणि रक्ताच्या हालचालींचा अभ्यास’ (Anatomical Exercise on the Motion of the Heart and Blood in Animals) हा महत्त्वाचा ग्रंथ लिहून पूर्ण केला. १३ व्या शतकात इस्लाम फिजिशियन इब्न अल नफिस आणि १६ व्या शतकात स्पेनचे फिजिशियन सर्व्हेटस यांनी असे सुचविले होते की मानवी शरीरात रक्त हृदयातून फुप्फुसाकडे जाते आणि परत हृदयाकडे येते. हे रक्त पूर्ण शरीरात फिरत नाही. अशी ही एक मान्यता होती की शरीरात दोन वेगवेगळ्या रक्तभिसरण संस्था आहेत. एकामध्ये जांभळे (पौष्टीक) रक्त असते जे शिरांमार्फत (Vein) यकृतातील पोषकद्रव्य बाकीच्या शरीराला पोहोचविते. तर दुसऱ्या संस्थेमध्ये लाल (जीवनावश्यक) रक्त असते जे रोहिणींमार्फत (Artery) फुप्फुसातून जीवनदायी तत्त्वाचे पूर्ण शरीरात वितरण करते. आज आपल्याला हे कळले आहे की हे प्राणवायूरहित (जांभळे) आणि प्राणवायूयुक्त (लाल) रक्त आहे. परंतु त्या काळात रक्त आणि ऑक्सिजन यांचे समीकरण अजून उलगडले नव्हते. तसेच त्या काळी हे माहित नव्हते की  रक्त पूर्ण शरीरात संचलन करते. त्यांचा असा समाज होता की जेवढे रक्त शरीराद्वारे वापरले जाते, तेवढेच रक्त रोज उत्पन्न होत असते. रोहिणी आणि शिरांना जोडणाऱ्या छोट्या रक्तवाहिन्याही (केशिका-Capillaries) तेव्हा लोकांना माहित नव्हत्या. १७ व्या शतकातील सूक्ष्मदर्शकाच्या शोधानंतर केशिकांच्या अस्तित्वाला पुष्टी मिळाली.

शिरांमधील झडपांचा (Valves) शोध आधीच लावला गेला होता. या झडपा रक्त संचलन फक्त एका दिशेने होऊ देतात आणि उलट्या दिशेने वाहण्याला विरोध करतात हे आधीच माहित होते. तेव्हा असेही समजले जायचे की या झडपा गुरुत्वाकर्षणामुळे होणारा रक्तसंचय टाळतात. हार्वेनी हे सिद्ध केले की सर्व झडपा हृदयकेंद्रित (म्हणजे हृदयाकडे रक्त वाहू देणाऱ्या) आहेत. उदा., मानेतील जुगुलर शिरेतील झडपा खालच्या दिशेने उघडतात जेणेकरून रक्तप्रवाह हृदयाच्या दिशेने होईल, उलटीकडे नाही. या झडपांच्या अभ्यासातूनच रक्ताभिसरणाचा शोध सुचला असा हार्वेचा दावा आहे.

हार्वेचा प्रमुख प्रयोग हृदयातून वाहणाऱ्या रक्ताचे घनफळ (Volume) शोधणे हा होता. त्यांनी जवनिकांचे (Ventricle) घनफळ, रक्त बाहेर टाकण्याची त्यांची क्षमता, तसेच एका मिनिटामध्ये हृदयाचे किती ठोके असतात याचा अंदाज लावला. या अंदाजावरूनच त्यांनी हे सिद्ध केले की, जेवढे रक्त हृदयातून जात आहे असे वाटतेय, वास्तवात त्यापेक्षा जास्त प्रमाणातच हृदयातून जात असणार. त्यांच्या आकडेवारीनुसार दर मिनिटाला अर्धा ते एक लिटर रक्त हृदयातून पंप केले जायचे. परंतु आता आपल्याला माहिती आहे की सुमारे ४ लिटर रक्त दर मिनिटाला हृदयातून जाते आणि व्यायामाच्या वेळी हा आकडा २५ लिटरपर्यंत जाऊ शकतो. मानवी शरीरात साधारण ५ लिटर रक्त असते. त्यामुळे एका मिनिटामध्ये एवढे रक्त वापरणे आणि उत्पन्न करणे शक्यच नाही याचाच अर्थ हे रक्त शरीरात फिरत असले पाहिजे. हार्वेनी हृदयाच्या ठोक्यांचा परंतु अभ्यास केला. हार्वेच्या आधी अशी धारणा होती की ठोक्याच्या सक्रिय टप्प्यामध्ये (active phase) हृदयाचे अंतर्गत घनफळ वाढते म्हणजेच हृदय आकुंचन पावते तेव्हा रक्त आत ओढले जाते. हार्वेनी बऱ्याच प्राण्यांमध्ये (विशेषतः शीतरक्ताचे प्राणीआणि  मरायला टेकलेले प्राणी) यांच्यामध्ये हृदयाचे ठोके अभ्यासले. (कारण या प्राण्यांमध्ये हृदयाची गती संथ असते) या अभ्यासावरून त्यांनी असा निष्कर्ष काढला की हृदय आकुंचन पावते तेव्हा हृदयातून रक्त बाहेर टाकले जाते.

हार्वेच्या रक्ताभिसरणाच्या सिद्धांताला तत्कालीन पुराणमतवादी डॉक्टरांनी खूप विरोध केला. परंतु हार्वेच्या मृत्यूपर्यंत ही संकल्पना बऱ्यापैकी स्थिर झाली होती. हार्वेनी हा शोध साधारण १६१८-१६१९ च्या दरम्यानच लावला होता, परंतु योग्य प्रयोग आणि वितर्काच्या अभावी ही संकल्पना धुडकावून लावू नये या कारणांनी बहुधा उशिरा प्रकाशित केला. १६४९मध्ये समकालीन शरीरशास्त्रज्ञ जॉन रिओलन यांच्या रक्ताभिसरणाच्या सिद्धांताच्या टीकेला उत्तर म्हणून हार्वेनी रक्ताभिसरणाच्या संदर्भातील दोन शरीरशास्त्रीय प्रयोग (‘Two Anatomical Exercises on the Circulation of Blood’) हे प्रकाशित केले.

मानव आणि इतर सस्तन प्राण्यांमध्ये प्रजनन अंडी आणि शुक्राणूंच्या गर्भाधानामुळे (Fertilization) होते हे सुचवणारे हार्वे हे पहिले शास्त्रज्ञ होते. परंतु सस्तन प्राण्यांमध्ये अंड्याचे निरीक्षण साधारण दोन शतकांनंतर करण्यात आले. त्यावेळी हार्वेच्या शोधाचा गौरवपूर्ण उल्लेख केला गेला.

त्यांच्या नावाचे टपाल तिकीट काढण्यात आले. केंट या त्यांच्या जन्म ठिकाणी त्यांचा पुतळा आहे तसेच तेथील दवाखान्यालाही त्यांचे नाव दिले गेले आहे. अनेक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये त्यांच्या नावाने शिष्यवृत्त्या दिल्या जातात तसेच व्याख्यानेही आयोजित केली जातात.

हार्वे विनोदी स्वभावाचे होते. अर्धांगवायूच्या झटक्याने त्यांना मृत्यू आला.

संदर्भ:

समीक्षक : राजेंद्र आगरकर