हेसे, फॅनी : ( २२ जून, १८५० )
आजच्या सूक्ष्मजीवांच्या अभ्यासातील अविभाज्य घटक असणाऱ्या आगार या पदार्थाचा वापर सर्वप्रथम केला तो फॅनी हेसे यांनी. त्यांचे पूर्ण नाव अँजेलिना फॅनी एलिशमियस (Angelina Fanny Elishemius, लग्नानंतर फॅनी हेसे) त्यांचा जन्म न्यूयॉर्क मध्ये झाला.
लहानपणापासूनच आईकडून व घरातील नोकरांकडून स्वयंपाक व घर आवारण्यासंबंधीचे धडे तिने घेतले. वयाच्या पंधराव्या वर्षी तिला स्वित्झर्लंड येथील शाळेत गृहअर्थशास्त्र व फ्रेंच शिकण्यासाठी पाठविण्यात आले. दहा वर्षे वैद्यकी केल्यानंतर वॉल्थर या तिच्या पतीने ठरवले की रोग्याच्या आजाराच्या मुळाशी असू शकणाऱ्या जिवाणूंचा अभ्यास करायचा. त्यासाठी १८८१ मध्ये तो रॉबर्ट कॉखच्या प्रयोगशाळेत रुजू झाला. वॉल्थरचे सुरुवातीचे प्रकल्प होते, हवेतील जीवाणूंना स्वतंत्ररित्या वाढविणे. परंतु त्याच्या सहकाऱ्यांप्रमाणेच त्याला विशेष काही यश आले नाही. त्याच्याकडे मोजकेच पर्याय होते. पहिल्या पर्यायामध्ये बटाट्याला उकडायचे, उष्ण सुरीने बटाट्याची चकती करायाची आणि जीवाणूंना त्या चकतीवर निर्जंतुक वातावरणात वाढीसाठी ठेवायचे असे ते तंत्र होते. दुसऱ्या पर्यायामध्ये द्रवरूप मांसार्काला जिलेटीन टाकून स्थायूरुप (solidify) करणे व त्यावर जीवाणूंना वाढवणे याचा समावेश होता. पहिल्या पर्यायाला मर्यादा अशी होती की, बटाट्याच्या चकतीवर ठराविक प्रकारचेच जीवाणू वाढू शकत होते आणि दुसऱ्या पर्यायाचा तोटा असा होता की बऱ्याच जीवाणूंकडे जिलेटीनचे खंडन करून त्याला विरघळविणारे उत्प्रेरक असल्यामुळे संपूर्ण खाद्यान्न हे द्रवरूप होऊन जायचे. जरी एखाद्या जिवाणूकडे जिलेटीन विरघळविणारे उत्प्रेरक नसले तरी प्रयोगशाळेत वातावरणाचे तापमान वाढले की जिलेटीन द्रवरूप होऊन जायचे.
वॉल्थरने त्याच्या या अडचणींबाबत त्याच्या पत्नीला म्हणजेच फॅनीला सांगितले. फॅनीने विचार केला की कदाचित या अडचणी दूर करण्यासंदर्भात तिच्याकडे एखादा उपाय मिळू शकेल. फॅनी जेंव्हा न्यूयॉर्कमध्ये होती तेव्हा तिची एक शेजारीण होती जी, बराच काळ जावा येथे राहिली होती. त्या शेजारणीने फॅनीच्या कुटूंबाला आगार-आगार या समुद्री शेवाळापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांविषयी सांगितले होते. आगार-आगार हा जेलीला स्थायुपण आणण्यासाठी तसेच सूप या पदार्थाला किवा द्रव खाद्याला घट्टपणा आणण्यासाठी वापरण्यात येत होता. बरीच वर्षे फॅनीने जॅम बनविण्यासाठी आगार-आगारचा वापर केला. त्यामुळे फॅनीने सांगितले की ही युक्ती नक्कीच काम करेल.
वॉल्थरने प्रयोग करून आगार-आगार हा द्रवरूप मांसार्काला स्थायूरुप बनविण्यासाठीचा आदर्श घटक आहे असे सिद्ध केले. १०० अंश सेंटीग्रेड तापमानावर आगार-आगारला द्रवरूप केल्यानंतर त्यामध्ये द्रवरूप मांसार्क मिसळून, या मिश्रणाला निर्जंतुक भांड्यात (पेट्री डिशमध्ये) ओतायचे. असे हे नवीन स्थायूरुपी खाद्यान्न खोलीतील तापमानाला स्थायूरुपच राहते. जीवाणू त्यावर व्यवस्थितरीत्या वाढतात परंतु त्याचे विघटन करू त्यास द्रवरूप करू शकत नाहीत. आगार-आगार हा अतिशय पारदर्शी असल्यामुळे जिवाणूंच्या समूहाचे निरीक्षण व त्याचे गुणधर्म ओळखण्यास खूप मदत होते.
पुढे वॉल्थरने सूक्ष्मजीवशास्त्रात बरेच योगदान दिले. पाण्यामधील जीवाणूंच्या मोजणीसंदर्भात त्याने नवीन पद्धती विकसित केल्या. तसेच क्षयरोगाच्या निदानासंदर्भात त्याने काम केले. पाश्चरायझेशन या पद्धतीची जर्मनीला ओळख करून देण्यासाठी मदत केली. या सगळ्यांत फॅनीने अचूक आणि विस्तृत असे वैज्ञानिक वर्णन करण्यात योगदान दिले. परंतु या सर्वांपेक्षा त्यांनी सांगितलेल्या आगार-आगारच्या वापरामुळे वॉल्थर आणि फॅनी प्रसिद्धी झोतात आले.
रॉबर्ट कॉखने हा नवीन स्थायूरुपी खाद्यान्न वापरून विविध प्रकारच्या २१ रोगांना, जसे की क्षयरोग, मलेरिया इन्स्टिट्यूट , कॉलरा, प्लेग याला कारणीभूत असणारे जैविक घटक शोधून काढले. वॉल्थर आणि फॅनी यांना कुठल्याही प्रकारचा आर्थिक मोबदला याबद्दल मिळाला नाही. त्यांच्या या योगदानाचा त्याकाळच्या लेखनामध्ये कुठे उल्लेखही झाला नाही. परंतु आज आपल्याला त्यांच्या कार्याची जाणीव आहे आणि आजही आपण त्यांच्या शोधाचा वापर करीत आहोत, त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांचे संशोधन हे अमूल्यच म्हणावे लागेल.
संदर्भ :
- https://www.condalab.com/news/details/articulo/-e111a3802b/
- https://www.revolvy.com/page/Fanny-Hesse
- https://wikivisually.com/wiki/Fanny_Hesse
समीक्षक : रंजन गर्गे