इंडियन कार्डमम रिसर्च इन्स्टिट्यूट : ( स्थापना १९७८ )

इंडियन कार्डमम रिसर्च इन्स्टिट्यूट (आयसीआरआय) किंवा भारतीय वेलदोडा संशोधन संस्था ही वेलदोडा किंवा इलायची या मसाल्याच्या पदार्थावर संशोधन करणारी केरळमधील एक भारतीय संस्था आहे. भारतीय मसाला मंडळाची (Spice Board India) या व्यापार व उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत शाखा म्हणून ती अस्तित्वात आली. याचा प्रारंभ केरळ राज्यातील मैलादुमपारा या ठिकाणी झाला. प्रारंभीचे संशोधन लहान आकाराच्या वेलदोड्यावर चालू झाले. कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील सकलेसपूर येथे एक व दुसरे तामिळनाडू राज्यातील थडियंकुदिसाइ अशी दोन केंद्रे १९८० मध्ये सुरू करण्यात आली. मोठ्या वेलदोड्यावर संशोधन करण्यासाठी तिसरे संशोधन केंद्र गंगटोक (सिक्किम) येथे १९८१ मध्ये सुरू करण्यात आले. सिक्किम आणि दार्जीलिंग या दोन्ही ठिकाणी मोठ्या आकाराचा वेलदोडा मोठ्या प्रमाणावर नगदी पीक म्हणून उत्पादीत केला जात असे आणि हे उत्पादन वैज्ञानिकदृष्ट्या वाढावे हा तिसरे संशोधन केंद्र सुरू करण्यामागील उद्देश होता.

संस्थेचा मुख्य उद्धेश छोट्या आणि मोठ्या वेलदोड्याची उत्पादकता वाढवावी असा आहे. मसाला उत्पादकाकडे निर्यात करण्यासाठी पीक हाताशी असेल आणि निर्यातीतून त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळेल अशासाठी संशोधनाचा मुख्य रोख केरळ, कर्नाटक आणि तामिळ्नाडू राज्यातील छोट्या आणि मध्यम उत्पादक क्षेत्रावर व पूर्वोत्तरक्षेत्रातील मोठ्या आकाराचे वेलदोडे पिकविणाऱ्या क्षेत्रावर आहे.
पीक सुधारणा, जैव तंत्रज्ञान, पीक उत्पादन, पीक संरक्षण, पीक काढल्यानंतरचे तंत्रज्ञान आणि सेंद्रीय शेती हे संशोधनाचे मुख्य विषय आहेत. शेतकऱ्यांच्या गरजेच्या विषयावर संशोधन करणे आणि तंत्रज्ञान मूल्यमापन या दोन गोष्टींवर भर दिला जातो. त्यात परिसंस्था संवर्धन व संरक्षण कार्यक्रम, किंवा जननद्रव्य (germ plasma) संवर्धन, कीड आणि रोग सर्वेक्षण, कीड व रोगासाठी जननद्रव्य चाचणी, हवामान निरिक्षण त्याचा पिकावरील परिणाम, पिकांवरील जंतुनाशकाचे अवशेष अभ्यासणे, जमिनीचे आरोग्य तपासणे, पीक काढण्याचे तंत्रज्ञान आणि शेतीतील यांत्रिकीकरण आणि शाश्वत उत्पादन तंत्रज्ञान असे कार्यक्रम येथे घेण्यात येतात. नवनवीन जातींचा विकास, एकात्मिक कीड आणि रोग नियंत्रण व्यवस्थापन त्याबरोबरच एकात्मिक पोषण व्यवस्थापन यांचाही संशोधनात समावेश आहे. इतर संस्थांनी मागणी केल्यास त्यांच्यासाठीही संशोधन केले जाते.
आयसीआरआयकडे मैलादुमपारा येथे राष्ट्रीय वेलदोडा जननद्रव्य संरक्षणगृह असून त्यात वेलदोड्याच्या ५६३ जातींचे संरक्षण केले आहे आणि १२ इतर संरक्षीत जाती आहेत. सकलेसपूर आणि गंगटोक येथेही लहान आणि मोठ्या वेलदोड्याच्या जननद्रव्याच्या जाती संरक्षित केल्या आहेत.
इंडियन कार्डमम रिसर्च इन्स्टिट्यूट – मैलादुमपारा, कर्नाटक येथील मुख्य संस्था राष्ट्रीय जननद्रव्य संरक्षण गृह
आयसीआरआयचे क्षेत्रिय केंद्र कर्नाटकातील सकलेसपूर जवळील दोनिगल येथे आहे. २० हेक्टर क्षेत्रावर येथे पीक सुधारणा कृषिविद्या, मृदा विज्ञान, कीटकविज्ञान आणि पीक विकृतिशास्त्र हे चार विभाग कार्यरत आहेत. येथील जननद्रव्य संरक्षण गृहात वेलदोड्याच्या २३६ जातींचे संरक्षण केले असून या शिवाय दालचिनी, कोकम (गारसिनिया) आणि सर्व प्रकारच्या इतर मसाल्यांचा त्यात समावेश आहे.
दोनिगल येथील विभागीय संशोधन केंद्र
मोठ्या वेलदोड्यावर संशोधन करण्यासाठी पूर्व सिक्किमच्या पँगथँग येथे १९८१साली विभागीय संशोधन केंद्र निर्माण करण्यात आले होते. या केंद्रात स्थानिय हवामानाला अनुसरून विशिष्ट संशोधन आणि पूर्वोत्तर विकास कार्यक्रमला अनुसरून संशोधन हाती घेण्यात आले. मोठ्या वेलदोड्याच्या २५४ जातींचे येथे संरक्षण करण्यात आले आहे. त्यात उच्च उत्पादन देणा-याजातींचा समावेश आहे.
संदर्भ :
- https://www.indianspices.com/indian-cardamom-research-institute-0.html
- http://www.kau.in/
- https://www.uasbangalore.edu.in/
समीक्षक : मोहन मद्वाण्णा
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.