जिनोमिक्स व एकात्मिक जीवविज्ञान संस्था (सीएसआयआर) : ( स्थापना १९७७ )

दिल्ली येथील, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च-सीएसआयआर) संस्था समूहातील जीवविज्ञानात संशोधन करणारी ही एक केंद्रीय संस्था आहे. १९७७ साली या संस्थेचा प्रारंभ सेंटर फॉर बायोकेमिकल टेक्नॉलॉजी या नावाने झाला. कालांतराने संस्थेमध्ये एकात्मिक जीवविज्ञान व जीनोम विज्ञानातील संशोधन करण्यात येऊ लागले. म्हणून २००२ साली या संस्थेचे नाव जिनोमिक्स व एकात्मिक जीवविज्ञान संस्था (इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स अँड इंटेग्रेटीव्ह बायालॉजी – थोडक्यात आयजीबीआय) असे बदलण्यात आले. सध्या या संस्थेचे कार्य दिल्ली विद्यापीठामधील परिसरात मॉल रोड (ज्युबिली हॉलच्या समोर) व दक्षिण दिल्ली मधील मथुरा रोडवर नवा परिसर सुखदेव विहार या दोन ठिकाणामधून चालते.

संस्थेचे उद्दीष्ट जीवविज्ञानातील पायाभूत संशोधनाचा मानवी आरोग्यासाठी व्यावसायिक दृष्ट्या व्यवहार्य तंत्रज्ञान विकसित करणे हे आहे.

सन २००९ मध्ये आयजीबीआय संस्थेने हिमालयात आढळणाऱ्या स्थानिक झेब्रा फिशचा जीनोम क्रम (जीनोम सीक्वेन्स) शोधून काढला. एखाद्या पृष्ठवंशी प्राण्याचा पूर्ण जीनोम शोधून काढणे ही भारतीय वैज्ञानिकांसाठी अभिमानाची बाब होती. यापूर्वी भारतीय वैज्ञानिकांनी काही जीवाणू व वनस्पतींचे जीनोम शोधले होते.

आयजीबीआय संस्थेने २००९ मध्ये भारतीय व्यक्तींच्या जीनोमचे पुन्हा क्रम निर्धारण केले. यापूर्वी जागतिक पातळीवर मानवी जीनोम प्रकल्प पूर्ण झाला असला तरी भारतीय जीनोमच्या क्रम निर्धारणामुळे भारतीय व्यक्तींच्या रोगावर उपचार करताना त्यांची जनुकीय विविधता माहित होण्यास मदत झाली. या संशोधनाबरोबर श्रीलंका व मलेशिया येथील व्यक्तींचा जीनोम याच संस्थेमध्ये शोधण्यात आला. मुक्त वैयक्तिक जीनोम संघाची ही संस्था एक सभासद आहे (open personal genomics consortium).

आयजीबीआय या संस्थेमध्ये जीनोम विषयक अद्ययावत तंत्रज्ञान वापरून भारतातील जनुकीय रोगावरील नेमकी उपाययोजना शोधण्याचे पथदर्शक कार्य सुरू करण्यात आले आहे. याचा एक भाग म्हणून जिनोमिक्स फॉर अंडरस्टंडिंग रेअर डिसिझेस इंडिया अलायन्स नेटवर्क (Genomics for Understanding Rare Diseases, India Alliance Network – GUaRDIAN) या भारत व शेजारील देशात चिकित्सा करताना जेनोमिक्सचा वापर करण्यासाठी उत्तेजन दिले जाते. नेहमीपेक्षा वेगळे जनुकीय आजार शोधण्यासाठी याचा उपयोग व्हावा अशी योजना आहे.

भारतातील १,००० विविध वंशातील व्यक्तींचा जीनोम अभ्यास हा महत्वाकांक्षी प्रकल्प संस्थेने हातात घेतला आहे. एकदा जनुकीय विविधता समजली म्हणजे नेमके रोग किंवा आजाराचे निदान व उपाय करणे सुलभ होईल.

सध्या या संस्थेमध्ये रेण्वीय औषधी अंतर्गत (मॉलेक्युलर मेडिसिन) छिन्नमनस्कता (स्किझोफ्रेनिया), मधुमेह यांसारख्या दीर्घकालीन आजारावर संशोधन कार्य चालू आहे. याशिवाय श्वसनमार्ग आजारामध्ये क्षय, दमा, अधिहर्षता (अ‍ॅलर्जी) दीर्घकालिक अवरोधी फुप्फुसरोग (क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसऑर्डर–सीओपीडी) अशा रोगावर संशोधकांनी लक्ष केंद्रित केले आहे. रेण्वीय औषधी बरोबरच जैवमाहितीविज्ञान (बायोइन्फॉरमँटिक्स) आणि प्रथिनांचा विस्तृत अभ्यास (प्रोटिओमिक्स) या विषयी संशोधन चालू आहे.

दिनांक २७ ऑक्टोबर २०१९ या दिवशी आयजीआयबी व आयसीएआर (भारतीय कृषि संशोधन परिषद ) या दोन संस्थांच्या सहकार्याने मुरा जातीचा एक बहुमूल्य म्हैसा म्हणजे रेडा कृत्तक (क्लोनिंग) तंत्राने निर्माण केल्याचे जाहीर केले आहे. दूध उत्पादनासाठी मुरा जातीच्या म्हशी सर्वोत्तम आहेत. या म्हैसाच्या कायिक पेशीतील केंद्रकापासून भ्रूण मिळवण्यात वैज्ञानिक यशस्वी झाले आहेत. मुरा म्हैसाच्या त्वचा पेशी व शुक्रपेशी पासून हे भ्रूण तयार केले होते. म्हशीच्या गर्भाशयात हे भ्रूण वाढवले गेले. या म्हशीच्या वेतातून जन्मलेला म्हैसा  चाळीस महिने वयाचा झाल्यानंतर त्याच्या शुक्रपेशीची  तपासणी केल्यावर असे आढळले की त्यांच्या मूळ (आधीच्या) पिढी प्रमाणेच कृत्तक रेड्यात गुण आढळले आहेत.

संदर्भ :

समीक्षक : किशोर कुलकर्णी