द इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिक्स ऑफ द रोमानिअन अकॅडेमी, बुखारेस्ट : (स्थापना : २९ डिसेंबर १९४५; पुनर्स्थापना : ८ मार्च १९९०) बुखारेस्टमधील विविध संस्थांतील वीस गणितींनी बुखारेस्ट (Bucharest) विद्यापीठात एकत्र येऊन नामवंत रोमानियन गणिती दिमित्रि पॉम्पेयु (Dimitrie Pompeiu), यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा २९ डिसेंबर १९४५ रोजी घेतली होती. या सभेत द इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेस ही संस्था स्थापण्याची घोषणा करण्यात आली. व्याख्याने, संवाद, प्रकाशने, परिषदा, तसेच इतर मार्गांनी गणितशास्त्रामध्ये संशोधनाला प्रोत्साहन देणे हे संस्थेचे ध्येय ठरविले गेले. १९४६च्या जानेवारीत त्या संस्थेला स्वयंसेवी (NGO) संस्था म्हणून कायदेशीर मान्यता मिळाली. ९ जून १९४८च्या नवीन साम्यवादी (कम्युनिस्ट) राजवटीने तिचे रूपांतर सरकारी संस्थेमध्ये केले. ही संस्था अकॅडेमी ऑफ सायन्सेस ऑफ द यूएस.एस.आर.च्या धर्तीवर, म्हणजे अनेक संशोधन संस्थांसह ग्रंथालये, प्रकाशन सुविधा आणि रुग्णालये यांच्या विस्तृत जाळ्याच्या स्वरूपात रचली गेली. त्यानुसार १९६६ पर्यंत संस्थेशी संलग्न असलेल्या नवीन संशोधन केंद्रांची आणि संस्थांची संख्या ६६ झाली होती. ती सुरुवातीला केवळ सातच होती.
नव्याने उभारल्या गेलेल्या संस्थांपैकी एक म्हणजे सध्याची, द इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिक्स ऑफ द रोमानियन अकॅडेमी (आयएमएआर) होय. हिचे स्वरूप १९४५ मध्ये स्थापन केलेल्या स्वयंसेवी संस्थेसारखेच ठेवण्यात आले होते. संस्थेच्या उभारणीत रोमानियन गणितज्ज्ञ, सीमिऑन स्तोयलो (Simion Stoilow) यांचे महत्त्वाचे योगदान होते. मूळ संस्थेच्या वीस संस्थापकांपैकीच स्तोयलो होते. रोमानियन स्कूल ऑफ कॉम्प्लेक्स ॲनालीसिसची निर्मितीही स्तोयलो यांनी केली होती. त्यांच्या नांवावर १०० हून अधिक प्रकाशित शोधनिबंध आहेत.
बुखारेस्ट विद्यापीठाच्या गणित विभागातून १९७४ च्या सुमारास पदवी मिळविलेल्या, झोया चौशेस्कु (Zoia Ceauşescu), या तरुणीची नेमणूक आयएमएआरने संस्थेत केली. झोयाचे वडील, निकोलाय चौशेस्कु (Nicolae Ceauşescu), रोमानियातील तेव्हाच्या कम्युनिस्ट राजवटीचे प्रमुख होते. वडील व आई या दोघांनाही झोयाने गणित विषयात पदवी घेणे रुचले नव्हते. त्यामुळे एक हुकुमनामा काढून झोयाच्या वडलांनी एप्रिल १९७५ मध्ये संस्था तत्काळ बंद पाडली. परिणामी नाराज नामवंत गणितींनी देशच सोडला. १९७८ मध्ये झोयाने वैयक्तिक योगदानातून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायंटीफिक अँड टेक्निकल क्रिएशनमध्ये गणित विभाग स्थापन केला आणि परागंदा झालेल्या नामवंत गणितींना या गणित विभागाच्या सेवेत आणले.
रोमानियातील १९८९ मधल्या क्रांतीनंतर तेथील ४२ वर्षांची कम्युनिस्ट राजवट नेस्तनाबूत झाली. त्यानंतर आयएमएआरची पुनर्स्थापना नव्या लोकशाही पुरस्कृत सरकारकडून जानेवारी १९९०मध्ये झाली. यथावकाश कायदेशीररीत्या संस्थेची नोंदणी रोमानियन अकॅडेमीखालील संस्थांमध्ये करण्यात आली.
सध्या रोमानियातील गणित संशोधनातील सर्वांत आघाडीची संस्था म्हणजे आयएमएआर आहे. येथे एकूण शंभर संशोधक कार्य करीत आहेत. २००० साली यूरोपियन कमिशनने यूरोपमधील उत्कृष्ट केंद्र निवडीकरीता मागविलेल्या प्रस्तावातून संशोधनाचे उत्कृष्ट केंद्र म्हणून आयएमएआरचे नामांकन झाले.
आयएमएआर दोन शास्त्रीय नियतकालिके प्रकाशित करते. पहिले आहे, गणिती अहवाल प्रसिद्ध करणारे, Mathematical Reports तर दुसरे, शुद्ध आणि उपयोजित गणितातील संशोधने प्रसिद्ध करणारे, Romanian Journal of Pure and Applied Mathematics – Revue Roumaine de MathématiquesPures et Appliquées. याखेरीज, गणितांतील खास विषयांना धरून आयएमएआर परिषदांचे आणि अधिवेशनांचे आयोजनही करते. आयएमएआरच्या सदस्यांमध्ये अनेक सुप्रसिद्ध गणितींचा समावेश आहे.
आयएमएआरने थिटा प्रतिष्ठान (Theta Foundation) स्थापन केले आहे. हे विना नफ्यावर चालणारे स्वायत्त प्रतिष्ठान असून शास्त्रीय गणिती साहित्य नेमाने प्रकाशित केले जाते. रोमानियातील उत्तम विद्यार्थ्यांना संशोधनाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी SNS-B (Scoala Normala Superioara Bucharest) ची निर्मितीही आयएमएआरने केली आहे. ही देखील स्वायत्त संस्था असून ती पदव्युत्तर पातळीवर अध्यापन आणि संशोधन-मार्गदर्शन करण्यात नेहमीच पुढाकार घेते.
संदर्भ :
समीक्षक : विवेक पाटकर