ज्वालामुखीच्या स्फोटक उद्रेकातून (Volcanic explosive eruption) बाहेर पडलेले घन पदार्थ एकत्रित साचून तयार झालेल्या राशींस अग्निदलिक किंवा स्फोटशकली खडक म्हणतात. ज्वालामुखीतून बाहेर पडलेले सर्व प्रकारचे पदार्थ (ज्वालामुखीय खडकांचे द्रवित व घनित, लहान मोठ्या आकारातील तुकडे, राख, पाण्याची वाफ, वायू, लाव्हा बॉम्ब इत्यादींचे असमान मिश्रण) आणि त्यांच्यात अडकलेले – स्फोटापूर्वीचे; त्याठिकाणी असलेले भोवतालचे वा आजूबाजूच्या खडकांचे तुकडे एकत्रितरित्या/दृढीत (Consolidation) जेव्हा खडक बनतात, तेव्हा त्यांनाही अग्निदलिक खडक म्हणतात.

या उद्रेकाच्या प्रचंड स्फोटक शक्तीमुळे आजूबाजूच्या खडकांचे लहान वा मोठे तुकडे होतात, त्याचप्रमाणे ज्वालामुखीच्या अंतर्गत घटकांचे आणि खडकांचेही तुकडे आणि राख होते. या खडकांचे वर्गीकरण त्यांच्यातील घटक पदार्थांच्या आकारमानानुसार केले जाते. या घटकांपैकी धुळीसारखे सूक्ष्म कण असणाऱ्यास ज्वालामुखी राख (Ash) म्हणतात. ज्वालामुखीतून बाहेर फेकल्या गेलेल्या वाटाण्यापासून ते लिंबाएवढ्या आकारमानाच्या पदार्थास लॅपिली (Lapilli) म्हणतात. त्यापेक्षा मोठ्या तुकड्यांना जर घटक पदार्थ वितळून तयार झाले असतील; तर ज्वालामुखीय बॉम्ब (Volcanic Bomb) किंवा न वितळता अंतर्गत खडकांचे मोठे तुकडे बाहेर पडले असतील तर त्यांना ज्वालामुखीय ठोकळे (Volcanic Blocks) म्हणतात. अणकुचीदार, कोनीय किंवा गोलाकार, लहान व मोठे तुकडे तसेच ज्वालामुखी राख एकत्र मिळून बनलेल्या खडकाला ज्वालाश्मचय (ॲग्लोमरेट; Agglomerate) म्हणतात. लॅपिलीपेक्षा मोठे अनियमित व अणकुचीदार आकारमान असलेले तुकडे राखेसमवेत एकत्र आल्यास त्यांना ज्वालामुखी संकोणाश्म (Volcanic breccia) म्हणतात. ज्वालामुखी राख व लहान आकारमानाचे राखेतर ज्वालामुखीय घनपदार्थ जेव्हा एकत्रित चिकटलेल्या कणांसह थरांच्या राशी रुपात निक्षेपित झालेले आढळतात, तेव्हा त्यांना ज्वालामुखी टफ (Volcanic Tuff) म्हटले जाते.

साधारणत: सूक्ष्मकणी राख आणि इतर लहान आकारमान असलेले घन पदार्थ लांब अंतरापर्यंत वाहत जाऊन निक्षेपित होतात, तर आकारमानाने मोठे असलेल्या घन पदार्थांचे लांब अंतरापर्यंत वहन होत नाही. हे घन पदार्थ काही वेळा हवेत फेकले जाऊन ज्वालामुखीच्या मुखाजवळच निक्षेपित होताना आढळतात. अग्निदलिक ज्वालामुखीय पदार्थ व प्रवाह हे राखेच्या ढगाचे, हवेच्या माध्यमातून वाहणार्‍या खडक व लाव्हांच्या तुकड्यांचे आणि वाफेचे मिश्रण असल्याने प्रसंगी त्यात लाव्हारस मिसळल्याने असा प्रवाह सामान्यतः खूप गरम असतो आणि तो वायू व द्रवीभूत उत्तेजनामुळे वेगाने ज्वालामुखीपासून लांब काही किमी. पर्यंतचा प्रवास करून मोठ्या प्रमाणात विस्तारीत होऊ शकतो. त्यांच्यातील तीव्र उष्णतेमुळे व वेगवान वाहणार्‍या विनाशकारी प्रवाही लोंढ्यामुळे त्यांच्या मार्गांमधील व परिसरातील सजीवसृष्टी व संपत्ती यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते किंवा ते संपूर्णपणे जळून वा गाडले जाऊन नष्टही होऊ शकतात.

संदर्भ :

समीक्षक : पी. एस. कुलकर्णी