इब्न रुश्द : (?११२६—१० डिसेंबर ११९८). एक अरबी तत्त्ववेत्ते. संपूर्ण नाव अबुल-वलीद मुहंमद बिन अहमद बिन रुश्द. मध्ययुगीन यूरोपात ‘आव्हेरोईझ’ (Averroes) ह्या नावाने ते ओळखले जाई. ‘स्पेनमधील सर्वश्रेष्ठ अरबी तत्त्ववेत्ते’, असे त्यांचे वर्णन करता येईल. जन्म कॉर्डोव्हा येथे. त्यांचे वडील व आजोबा काजी होते. कॉर्डोव्हा येथे कायदा व वैद्यकशास्त्र ह्यांचा इब्न रुश्द ह्यांनी अभ्यास केल्यानंतर ते ११५३ मध्ये मर्राकुशला गेले. ११६९ मध्ये त्यांना सेव्हिलचा काजी नेमण्यात आले व दोन वर्षांनी कॉर्डोव्हाचे काजी म्हणून त्यांची नेमणूक झाली. आपले सर्वांत महत्त्वाचे ग्रंथ त्यांनी कॉर्डोव्हा येथेच लिहिले. आयुष्याच्या अखेरच्या काळात उलेमांना विरोध केल्यामुळे ते अवकृपेला पात्र ठरले. त्यांची मते पाखंडी आहेत, ह्या आरोपावरून त्यांच्यावर खटला भरण्यात आला व कॉर्डोव्हाजवळ लूसेना येथे त्यांना हद्दपार करण्यात आले. पण त्यांच्यावर परत मेहेरनजरही झाली. मर्राकुश येथे त्यांचे निधन झाले.
अरबी भाषेतील त्यांची बरीचशी ग्रंथरचना आज लुप्त आहे; पण त्यांच्या अनेक ग्रंथांची व भाष्यांची हिब्रू व लॅटिन भाषांतरे उपलब्ध आहेत. तहाफुत्-अल्-तहाफुत् (खंडनाचे खंडन) हा अल्-गझालीला उत्तर म्हणून लिहिण्यात आलेला ग्रंथ बेरूत येथे संपादून प्रसिद्ध करण्यात आला. ॲरिस्टॉटलवर त्यांनी लिहिलेली भाष्ये लघु, मध्यम व बृहत अशी तीन प्रकारची आहेत. मदरसातील (मुस्लिम पाठशाळा) अभ्यासक्रमाला अनुसरून भाष्यांचे हे तीन प्रकार पडले आहेत. शिवाय त्यांनी प्लेटोच्या रिपब्लिकवरही भाष्य लिहिले आहे; अल्-फाराबीवर टीका लिहिली आहे व इब्न सीना ह्यांच्या सिद्धांतांचे विवेचनही केले आहे. बिदायत् अत्-मुज्तहिद हा त्यांचा कायदेशास्त्रावरील ग्रंथ पाठ्यपुस्तक म्हणून मान्यता पावला आहे.
ख्रिस्ती व मुस्लिम अशा दोन्ही धर्मशास्त्रवेत्त्यांनी इब्न रुश्द ह्यांच्यावर हल्ले चढविले. यूरोपीय विद्वान इब्न रुश्द ह्यांची गणना मौलिक विचारवंतांत करीत नाहीत; पण त्यांचे फारच थोडे मूळ ग्रंथ आज उपलब्ध असल्यामुळे ह्याविषयी निश्चित मत बनवायला पुरेसा आधार नाही. त्यांच्या मतांविषयी एवढे वादंग माजलेले आहे की, त्यांची मते खरोखर काय होती, हे सांगणे कठीण झाले आहे. पण इब्न रुश्द मूलतः एक तत्त्ववेत्ते होते. त्यांनी स्वीकारलेल्या सिद्धांताचे ‘ॲरिस्टॉटलिअन’ असे वर्णन करण्याऐवजी ‘नव-प्लेटॉनिक’ असे वर्णन करणे योग्य ठरेल. प्रस्थापित नव-प्लेटॉनिक सिद्धांतच थोड्याफार फरकांनी त्यांनी स्वीकारले होते. कित्येकदा त्यांनी ॲरिस्टॉटलचा अर्थ चुकीचा लावला आहे आणि त्यांच्या विरोधकांनी ही गोष्ट दाखवूनही दिली आहे.
ॲरिस्टॉटलच्या पोस्टीरिअर ॲनॅलिटिक, फिजिक्स, डी सीलो, डी ॲनिमा व मेटॅफिजिक्स ह्या ग्रंथांवरील त्यांची अरबी भाष्ये लुप्त झाली असली, तरी त्यांची हिब्रू किंवा लॅटिन भाषांतरे उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे ॲरिस्टॉटलचे पॉलिटिक्स, र्हेटॉरिक हे ग्रंथ तसेच तर्कशास्त्रावरील ग्रंथ यांवरील त्यांची मध्यम भाष्ये अरबीत उपलब्ध आहेत. यांशिवाय अल्-फाराबीच्या तर्कशास्त्रावर आणि निकल्झच्या तत्त्वमीमांसेवर त्यांनी भाष्ये रचली आहेत. महदी इब्न तूमार्त ह्यांच्या अकीदा (श्रद्धा) ह्या ग्रंथावरही त्यांनी लिखाण केले आहे. कायदेशास्त्र, वैद्यक व ज्योतिष ह्या शास्त्रांवरही त्यांनी प्रबंध लिहिले आहेत.
त्यांचे बहुतेक मूळ ग्रंथ नष्ट झाले असल्यामुळे व त्यांच्या विरोधकांनी त्यांच्यावर अनेकदा खोटे आक्षेप घेतले असल्यामुळे, आपले आजचे ज्ञान लक्षात घेता, त्यांचे सिद्धांत खरोखर काय होते, ह्याविषयी चिकित्सक व निःपक्षपाती असा निर्णय घेणे अशक्य आहे. बॅरन कॅरा द व्हॉक्स ह्यांनी म्हटल्याप्रमाणे ‘इब्न रुश्द ह्यांना यापुढे ॲरिस्टॉटलिअन मानता येणार नाही; पण तो मौलिक विचारवंतही नव्हता. त्यांच्या काळचे जे जग होते, त्याला अनुरूप अशी त्यांची वृत्ती होती; म्हणजे ते संग्रहवादी होते. गूढवादाचा एका तात्त्विक दर्शनाशी ते समन्वय साधू पाहात होते; पण हे तात्त्विक दर्शन अनेक दृष्टींनी गूढवादाशी काहीसे विरोधी होते’.
संदर्भ :
- de Boer, T. J. History of Philosophy in Islam, Leiden, 1903.
- Gauthier, Leon, Ibn Rochd, Paris, 1948.
- Sarton, George, Introduction to the History of Science, Vols. I, II, Baltimore, 1927, 1931.
- https://iep.utm.edu/ibnrushd/
- https://www.ibn-rushd.org/English/BiographicalInfoIbnRushd.htm
- https://plato.stanford.edu/entries/ibn-rushd-natural/
- https://www.oxfordbibliographies.com/view/document/obo-9780195390155/obo-9780195390155-0039.xml