अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील कॅलिफोर्निया राज्यातील एक निसर्गरम्य शहर. लोकसंख्या ९०,५५५ (२०२०). कॅलिफोर्निया राज्याच्या दक्षिण भागात, पॅसिफिक महासागराच्या सँता मोनिका उपसागराच्या किनाऱ्यावर आणि याच नावाच्या पर्वतश्रेणीच्या पायथ्याशी हे शहर वसले आहे. हे शहर लॉस अँजेल्स परगण्यात असून या शहराच्या सभोवती प्रसिद्ध लॉस अँजेल्स शहराचा विस्तार झालेला आहे. कर्नल आर. एस. बेकर व सिनेटर जॉन पी. जोन्स यांनी १८७५ मध्ये याची स्थापना केली. १८८६ मध्ये याला नगराचा, तर १९०२ मध्ये शहराचा दर्जा प्राप्त झाला. शहराच्या स्थापनेपूर्वीच ४ मे १७७० रोजी कॅप्टन गॅस्पर द पॉर्तोला या स्पॅनिश समन्वेषकाने या स्थळाला भेट दिली असल्याचे मानले जाते. तो सेंट मोनिका दिन होता. एका आख्यायिकेनुसार पॉर्तोलाच्या एका सहयोगी योद्ध्याला येथे एक लहानसा धबधबा नजरेस पडला. तेव्हा त्यांना ख्रिश्चन संत सेंट मोनिका आपल्या ऑगस्टीन या स्वच्छंदी पुत्रासाठी अश्रू ढाळत असल्याची वदंता आठवली. म्हणून त्यांनी या स्थळाला लास लाग्रीमास दे सँता मोनिका (टिअर्स ऑफ सेंट मोनिका) असे नाव दिले.

पहिल्या महायुद्धानंतर डोनाल्ड डग्लस यांनी येथे विमानांची निर्मिती करणाऱ्या डग्लस एअरक्राफ्ट (मॅकडॉनेल-डग्लस) या कंपनीची स्थापना केली (१९२०). या कंपनीमुळेच शहरातील आधुनिक हवाई वाहतूक व संदेशवहन उद्योगाच्या विकासाचा पाया घातला गेला. साहजिकच इलेक्ट्रॉनिकी क्षेत्रात प्रगत उच्च संशोधनाला येथे चालना मिळाली. क्षेपणास्त्रे, विमानांचे सुटे भाग, इलेक्ट्रॉनिक सामग्री, प्रकाशीय उपकरणे, लाकडी सामान, मृत्तिकाशिल्प, रसायने, चामडी उत्पादने, प्लॅस्टिक व धातूच्या वस्तू बनविणे असे अनेक छोटेमोठे उद्योग येथे चालतात. लॉस अँजेल्स अँड इंडिपेन्डन्स लोहमार्गाचे हे पॅसिफिक महासागर किनाऱ्यावरील अंतिम स्थानक म्हणून विकसित झाले आहे. सॅन पेद्रो बंदराच्या विकासामुळे बंदर म्हणून सँता

मोनिकाचे महत्त्व कमी झाले असले, तरी सागरकिनाऱ्यावरील एक निवासी व पर्यटनस्थळ म्हणून त्याची भरभराट झाली आहे. येथील समुद्रकिनाऱ्यावर अनेक अमेरिकन सिनेअभिनेत्यांचे आणि उच्च पदस्थांचे राजप्रासादसदृश भव्य बंगले आहेत. शहरालगतच्या सागरकिनाऱ्यावर विस्तृत व सुंदर पुळणी असून पर्यटकांसाठी मनोरंजनाच्या अनेक सोयी तसेच समुद्रस्नान व हौशी मासेमारीच्या सुविधा उपलब्ध आहेत. शहरालगत अनेक राज्य उद्याने असून किनाऱ्यावर असलेल्या पॅलिसेड्स राज्य उद्यानाचे सुंदर विहंगम दृश्य लगतच्या उंच सुळक्यावरून दिसते. या शहरात सँता मोनिका (कम्युनिटी) कॉलेज (स्था. १९२९), जे. पॉल गेट्टी वस्तुसंग्रहालय, कलावीथी, रंगमंदिर, कॅलिफोर्निया हेरिटेज म्यूझीअम, म्यूझीअम ऑफ फ्लाईंग इत्यादी उल्लेखनीय आहेत. येथील सँता मोनिका कलासंघ, सिंफनी वाद्यवृंद व संगीतिका मंडळामार्फत विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. सँता मोनिका नागरी प्रेक्षागृहात अधिवेशने व व्यापारी प्रदर्शने भरविली जातात. येथील मॅलिबू क्रीक स्टेट पार्क हे पक्षिनिरीक्षण, अश्वारोहण, पायी भटकणे, हौसी मासेमारी, चित्रपट व दूरदर्शन मालिकांचे चित्रीकरण इत्यादींसाठी विशेष प्रसिद्ध आहे. सँता मोनिका श्हराच्या जवळच विल रॉजर्स स्टेट बीच व विल रॉजर्स स्टेट हिस्टॉरिक पार्क आहेत.
समीक्षक : नामदेव गाडे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.