महाराष्ट्रातील मध्ययुगातील एक इतिहासप्रसिद्ध राजघराणे म्हणजे यादव घराणे. हे (बारावे-तेरावे शतक) देवगिरी (सध्याचे दौलताबाद, जि. औरंगाबाद) येथून राज्य करत होते. वेंगींच्या चालुक्य घराण्याने पूर्व मध्ययुगीन काळात (१०-११वे शतक) अतिप्राचीन काळी रूढ असलेल्या आहत पद्धतीने सोन्याची नाणी पाडावयास सुरुवात केली. त्यानंतर त्यांचे अनुकरण दख्खनमधील अनेक राजवटींबरोबर यादव राजवंशानेही केले.
यादव राजवंशाची नाणी मुख्यतः सोने या धातूमध्ये आढळून येतात. तथापि त्यांनी चांदी व काही प्रमाणात तांबे या धातूंमध्येही नाणी पाडली. धातूची शुद्धता हे यादवकालीन नाण्यांचे वैशिष्ट्य दिसून येते.
यादव घराण्याची सोन्याची नाणी : यादव घराण्याची सोन्याची नाणी पद्मटंक या नावानेही प्रसिद्ध आहेत. त्यावर मध्यभागी असलेल्या अष्टदल पद्म या चिन्हामुळे या नाण्यांना ब्रिटिश काळात हे नाव मिळाले.
यादव राजवंशातील भिल्लम पाचवा (११७५–११९१) या पहिल्या स्वतंत्र राजाने प्रथम सोन्याच्या नाण्यांची निर्मिती केली. त्याच्या नंतर सिंघण दुसरा (कार. १२१०–४६), कृष्ण ( कार. १२४६–६१), महादेव (कार. १२६१–७१), आमण (कार. इ. स. १२७१) व रामचंद्र (कार. १२७१– १३११) या राजांची नाणी सापडली आहेत. पाचव्या भिल्लमनंतर काही काळ गादीवर आलेला त्याचा मुलगा जैतुगी याची नाणी अद्यापि सापडलेली नाहीत.
नाण्यांचे वर्णन : यादवांची सोन्याची नाणी आहत पद्धतीने म्हणजे वेगवेगळ्या चिन्हांसाठी वेगवेगळे ठसे वापरून तयार केलेली आढळतात. मध्यभागी अष्टदल पद्म, त्याच्या वरच्या बाजूस नाणे पाडणाऱ्या राजाचे नागरी लिपीतील नाव व त्याच्या खाली धनुष्य अथवा म्यानासहित तलवार, अष्टदल पद्माच्या खालील बाजूस आडवा शंख, तर डाव्या बाजूस तेलुगू-कानडी लिपीतील श्री हे अक्षर व उजव्या बाजूस चक्राकार आकृती असे नाण्यांचे स्वरूप आहे. नाण्यांची मागील बाजू कोरी दिसते. मधील अष्टदल पद्माच्या चिन्हाचा ठसा शेवटी व जोरात मारला जात असून त्यामुळे तिथे खळगा निर्माण होऊन नाण्याला बशीसारखे स्वरूप प्राप्त झालेले दिसते. सर्व चिन्हांमध्ये वैविध्य आढळते. जागा व कालानुरूप वापरल्या गेलेल्या विविध छापांमुळे हे वैविध्य आढळते. छाप पत्र्याच्या बाहेर गेल्यामुळे बहुतेक वेळा चिन्हे अर्धवट आढळतात. याला नाण्यांवरील लेख देखील अपवाद नाही. लेखांमध्ये सिंघण, कान्हा, महादेव, आमण, रामदेव असे राजांच्या नावांचे लेख सापडतात. यांपैकी भिल्लम पाचवा व काही प्रमाणात सिंघण दुसरा या राजांची नाणी मुळच्या कल्याणी चालुक्यांच्या नाण्यांवर पुनः चिन्हांकित केलेली दिसून येतात, या नाण्यांवर आधीच्या चिन्हांच्या खुणा दिसतात. महादेव यादवांच्या काही नाण्यांवर वर उल्लेख केलेल्या चिन्हांव्यतिरिक्त काही वेळा डाव्या बाजूस श्री व शंख या चिन्हांच्या मध्ये हत्ती किंवा वराह ही चिन्हे सापडतात, तर त्याचा मुलगा असणाऱ्या आमणच्या नाण्यांवर त्याच ठिकाणी सिंहाचे चिन्ह आढळले आहे.
वर उल्लेख केलेल्या ज्ञात प्रकारांशिवाय इतरही काही प्रकारच्या नाण्यांचा यादवांशी संबंध लावला जातो. त्यांमध्ये दर्शनी भागावर चक्र व शंख प्रतिमा व मागील बाजूवर श्री सिंघमदेव कांचला देवी असा लेख असणारे ठसा पद्धतीचे नाणे, दर्शनी भागावर गरुड व मागील बाजूवर स्त्री- पुरुष युगूल असणारे ठसा पद्धतीचे नाणे, देवळाचे चिन्ह असणारे आहत पद्धतीचे नाणे या नाण्यांचा समावेश होतो. या प्रकारांचे श्रेय काही विद्वानांनी सिंघण दुसरा याला दिले आहे; तथापि पुरेशा पुराव्यांअभावी त्यांचा यादवांशी संबंध लावणे संदेहपूर्ण आहे. याशिवाय लक्षुमा हा लेख असणारे पद्मटंक पद्धतीचे नाणे व दर्शनी भागावर पद्मटंकावर आढळणारी चिन्हे व मागील बाजूवर धनुष्य-बाण घेतलेल्या दोन मनुष्य आकृती असणारे ठसा पद्धतीचे नाणे या नाण्यांचे श्रेयही यादवांना दिले जाते. यादवांची सोन्याची नाणी ३.७५-३.८० ग्रॅम वजनाची असून शुद्ध सोन्याची आहेत. यादवांच्या सोन्याच्या नाण्यांचा उल्लेख गद्याण व आसू म्हणून यादव काळातील लेख व महानुभावीय साहित्यात आढळतो.
चांदीची नाणी : सेऊणचंद्र दुसरा (११वे शतक) या राजाने प्रथम चांदीची नाणी पाडली. त्यानंतर भिल्लम पाचवा पासून जैतुगी सोडून त्याच्या नंतर आलेल्या सिंघण दुसरा, कृष्ण, महादेव, आमण, रामचंद्र या यादव नृपतींची नाणी आढळली आहेत. यादवांची चांदीची नाणी आकाराने अतिशय लहान (०.४ सेंमी. – ०.८ सेंमी.) व वजनाने कमी (०.२२८८ ग्रॅम – १.८८१० ग्रॅम) वजनाची असतात. नाण्यांच्या दर्शनी भागावर सिंह प्रतिमा, तर मागील बाजूस राजाचे नाव असणारा लेख दिसून येतो. चांदीची नाणी ठसा पद्धतीने ( die- struck) तयार केलेली आहेत.
याशिवाय काही तांब्याची नाणी काढल्याचे श्रेय यादवांना जाते; तथापि त्यांच्या अतिशय कमी उपलब्धीमुळे त्यांविषयी काही ठोस विधान करणे शक्य नाही.
नाण्यांची उपलब्धी : यादवांची नाणी दख्खनच्या सर्व भागांत आढळून येतात. आतापर्यंत ती महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, ओडिशा या राज्यांमध्ये सापडली आहेत.
संकेतशब्द: वेंगीचे चालुक्य घराणे, यादव घराणे, भिल्लम पाचवा, जैतुगी, सिंघण दुसरा, कृष्ण यादव, महादेव यादव, आमण, रामचंद्र यादव, पद्मटंक, हाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, ओडिशा.
संदर्भ :
- Bhagwat, Vaidehi, History of Coinage in Deccan with Special Reference to Padmatankas (6th-13th Century A.D.), Karnataka Historical Research Society, Dharwad, 2017.
- Chattopadhyay, B. D. Coins and Currency Systems in South India, c. A. D. 225- 1300, Delhi, 1997.
- Deyell, John, Living Without Silver, Delhi, 1990.
- Elliot, Walter, Coins of South India, Delhi, 2005.
- Ganesh, K., Karnataka Coins, Banglore, 2007.
- Mitchiner, Michale, The Coinage and History of South India, Karnataka Andhra, Part I, London, 1998.
समीक्षक : अभिजित दांडेकर