केरळच्या लोकसाहित्याची मूलतत्त्वे : केरळ राज्याची निर्मिती १ नोव्हेंबर १९५६ साली झाली. या राज्यात एकेकाळी मद्रास प्रेसिडेन्सीतील तिरुकोची आणि तिरुविताम्कुर या भागांसहित असलेला मलबार प्रदेश जोडला गेला. तरीही केरळचा सांस्कृतिक आलेख हा ऐतिहासिक, भौगोलिक अचुकतेपेक्षा वेगळा आहे. भारताच्या नैऋत्य किनारपट्टीवरील गोकर्ण आणि दक्षिणेतील सुचिंद्रमपर्यंत केरळचा भाग विस्तारलेला आहे. केरळच्या पुराकथेत या संबंधी उल्लेख आढळतात. केरळच्या उत्पत्तीविषयी १८४३ च्या सुमारास संशोधक हर्मन गुंडर्ट यांनी अभिलेखन केले आहे. केरलोत्त्पत्ती मध्ये दिलेल्या पुराकथेनुसार परशुरामाने आपला परशू समुद्रात भिरकावून देत केरळची निर्मिती केली. एकवीस वेळा क्षत्रियांचा निःपात केल्याच्या पापातून मुक्ती प्राप्त व्हावी म्हणजेच पापक्षालन व्हावे म्हणून परशुरामाने समुद्रातून केरळची निर्मिती केली अशी आख्यायिका सांगितली जाते. इतकेच नव्हे तर परशुरामाने केरळ ब्राह्मणांना दान दिले. यात ६४ ग्रामांचा समावेश होता. ही पुराणकथा विद्वानांना मात्र मान्य नाही. ब्राह्मण वर्गाच्या वर्चस्वासाठी अशी पुराकथा निर्माण केल्याचा आक्षेप काही विद्वानांनी घेतला असून हे ऐतिहासिक प्रचाराचे साधन असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र या पुराणकथेला प्रतिकात्मक महत्त्व आहे. वनात राहणाऱ्या समूहांच्या हातातील परशु म्हणजेच कुऱ्हाड ही झाडे तोडण्यासाठी असते. केवळ झाडे तोडली जात नाहीत तर ती प्रमाणबद्ध छाटली जातात. पठारी प्रदेशात राहणारे समूह कुदळीचा उपयोग जमीन खणण्यासाठी करतात तसेच खडकाळ जमीन सपाट करण्यासाठी करतात. भारताच्या नैऋत्य किनारपट्टीवर खडकाळ जमिनीच्या या अस्तित्वाबद्दलचा उल्लेख केरळच्या भौगोलिक स्वरूपाचा विचार करता विपर्यस्त वाटतो. केरलोत्त्पत्तीमध्ये तसे नमूद करण्यात आले आहे. या खडकाळ मातीचा उपयोग केरळ मधील घरबांधणीसाठी झाला आहे. मच्छीमारांच्या हाती असणारा परशू हा बोटीच्या नांगरणीसाठी उपयोगात येतो. परशू किंवा कुऱ्हाडीचा प्रवास हा अतिशय रंजक आहे. हा प्रवास आदिवासींपासून सुरू होतो तो विश्वव्यापी नागर जनांपर्यंत येवून स्थिरावतो. परशूचा एकूणच कला प्रवास हा आदिम कलेपासून सुरू होतो त्याचे अनगढ रूप आजही लोकसाहित्यात कायम आहे.

अलीकडच्या काळात दक्षिण आशियातील पुरातत्त्व अनुवंशशास्त्रीय संशोधनानुसार भारतीय समाज हा सहजीवनावर विश्वास ठेवणारा समाज आहे. तरीही आनुवांशिक रीत्या उत्तर भारतीय पिढ्या आणि दक्षिण भारतीय पिढ्या या एकमेकांपासून वेगळ्या आहेत. दक्षिण भारतातील पिढीजात समूह हे दक्षिण भारतातील आदिवासी समूह आहेत. आदिवासी समूह आणि अन्य समूहांच्या मोठ्या प्रमाणातील सरमिसळीची उदाहरणे मात्र केरळ मध्ये सापडत नाहीत. केरळ मधील अनेक लोककला प्रकारात उच्च पुराणकथा आणि निम्न पुराणकथा असे दोन प्रकार आढळतात. उत्तरेपासून दक्षिण केरळ पर्यंत निनावली, मुदीयेततु, पडायनी, परनेहू हे लोककला प्रकार आहेत की जे ‘काली’ च्या संकल्पनेवर केंद्रित झालेले आहेत. केरळमधील जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरील विविध संस्कारांमध्ये देखील विविधता आढळते. उच्च पुराणकथांच्या स्तरावर विधीयुक्त मंत्रोच्चारांची परंपरा आहे. जन्म आणि मृत्यूसह विविध संस्कारात आदेश संस्कारांचा अंतर्भाव झालेला आढळतो. निम्न पुराणकथांच्या स्तरावर कलासम कुलिपातु आणि जावूपातु संस्कारांचा अंतर्भाव झालेला आढळतो. लोककलांची विभागणी ज्याप्रमाणे उच्च सामाजिक स्तर आणि निम्न सामाजिक स्तर या निकषांवर करण्यात येते त्याचप्रमाणे भौगोलिक स्तरावरही करता येते. समुद्रसपाटीपासूनचे अंतर उंच भाग, सखल भाग, किनारपट्टीचा भाग हे भौगोलिक स्तर विचारात घ्यावे लागतात तसेच या लोककलांमधील आकाश, पाताळ, स्वर्ग आदी संकल्पनांचाही विचार करावा लागतो. जो त्या विशिष्ट लोककलांच्या दैवतांशी, दैवतकथांशी निगडित असतो. केरळमधील बहुतांश लोककला प्रकार हे जमिनीवर सादर होतात. याला अपवाद देखील आहेत. पारनेट्टु दारिका हा कलाप्रकार लढाईचे निदर्शन करत असून तो आकाशात घडत असल्याचा संकेत आहे, त्यामुळे या कलाप्रकारातील कलावंत २० फूट उंचीच्या रंगमंचावर टांगून घेतात. आकाशात घडत असलेल्या आणखी एका एलावूर थुकम ह्या विधीस्वरूप कला प्रकारांवर बंदी आणण्यात आली आहे. विधीनृत्यानंतर ४१ दिवस शरीर एका हुकाला अडकवून समांतर ठेवण्याचा मंदिर परिसरातील विधी केरळात प्रसिद्ध आहे ( या विधीला महाराष्ट्रात बगाडाचा विधी म्हणतात). या विधीत हे बगाड तीन वेळा मंदिराभोवती फिरवले जाते. ढाल – तलवारी सहित गरुड आणि असुराचे प्रतीकात्मक युद्धही दाखविले जाते. बगाड (चाडू) ओढणारे कलावंतही युद्ध पोशाख करतात आणि मंदिराभोवती नृत्य करीत फिरतात. आकाशातल्या प्रतीकात्मक प्रयोगात थय्यम सारख्या गुलिकन प्रयोगाचा उल्लेख करावा लागेल. यातील पूर्वरंगात झाडावर चढण्याचा विनोदी प्रसंग दाखविण्यात येतो. वेलन प्रवृत्ती आणि पाताल होमम हे काळया जादूशी संबंधित प्रकार भूमिगत प्रयोग म्हणून ओळ्खले जातात. एक भगत – जादूगार ६ फूट लांब आणि २ फूट रुंद अशा खणलेल्या खड्ड्यात शिरल्यावर तो खड्डा लाकडी फडताळांनी बंद केला जातो. अर्ध्या फुटावर या भगत – जादूगाराला पुरले जाते. या बळी विधीनंतर होम हवन केले जाते आणि भगत – जादूगार खड्ड्यातून वर येतो.

केरळमधील अनेक लोककलाप्रकारात शारीरिक शक्तीचा कस लागतो.  कोलकली, पुराकली, कलारीपयत्तु, वेलाकल्ली, थय्यम, थिरायट्ट्म आदी कलाप्रकारांचा शारीरिक शक्तीच्या कौशल्यात समावेश होतो. अनेक असे लोककला प्रकार आहेत ज्यात मानसिक सामर्थ्याचा कस लागतो. धगधगत्या अग्नीच्या राखेवर स्वतःला झोकून देण्याचा प्रकार अनेक लोककला प्रकारात आढळतो. कंडनरकेलंन थय्यमसारख्या प्रकारात आगीवरून धावण्याची परंपरा आहे. थय्यम आणि थिरा या प्रकारात आगीवरून चालण्याची तसेच आगीचे पलिते वागविण्याची परंपरा आहे. मानवी नैसर्गिक प्रतिक्षिप्तपणावर वर्षनुवर्षांच्या साधनेनुसार विजय मिळविल्यानंतरच आगीवरून चालण्याचे धाडस एखादा कलाकार करू शकतो.

पुराणकथा आणि दंतकथांपासून आविष्कृत झालेली पात्रे ही विविध लोकाविष्कारांतून सादर होत असतात. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात या पात्रांबद्दल नायक भक्तीची भावना असते. या कलाप्रकारातील कलाकारांची वेशभूषा आणि त्यांच्या अभिनय सामर्थ्याने योग्य ते वातावरण तयार होते.  केरळ मधील लोककला प्रकारात प्रहसन सदृश्य काही लोककलांचा समावेश होतो. चक्यारकूयू आणि ओट्टन थूल्लाल या सारख्या शास्त्रीय प्रकारांसारखेच कोथामुरी, पट्टन, थय्यम, गुलिकन, पुथम, कक्कारीसी नाट्कम, कुरथीयाट्ट्म, मुडीयेडू अशा लोककला प्रकारात प्रहसन म्हणजेच व्यंगात्मक भागाचा समावेश असतो. आपल्या नायकत्वाने अद्भुत गोष्टी घडवितो त्याच्या कार्यकर्तृत्वाने प्रभावित झालेले लोककलावंत हा संवाद साधताना स्वतःवर विनोद करतात, हसतात आणि देवासोबतच प्रेक्षकांशी सहज संवाद साधतात. हा एक प्रकारचा मनोविनोद ते साधतात.

कोणत्याही लोककला प्रकारची चर्चा ही भौतिक संस्कृतीचा विचार केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. भौतिक संस्कृती म्हणजे वापरात येणाऱ्या वस्तूंसंबंधी संस्कृती. संघमकली या व्यंगात्म लोककला प्रकार आयोजित होणाऱ्या  आधीच्या दिवशी विशेष भोजन समारंभात स्वयंपाकाच्या वस्तू वाद्ये म्हणून उपयोगात आणली जातात. या  प्रसंगी अग्नी भोवतीच्या नृत्यातून प्रेक्षकांना जखडून ठेवले जाते. हे भौतिक संस्कृतीचेच उदाहरण आहे. फणसाच्या झावळ्या थय्यमच्या मुखोट्यांवर बांधल्या जातात ज्यामुळे किडे मकोडे आणि प्रतिकूल हवामानातून संरक्षण होते.  नारळाच्या झावळ्यांचे दोर काढून ते थय्यम पंतम म्हणजे सुमारे २० फूट उंचीच्या मांडवावर बांधले जातात. तांदळाच्या लेपाने तोंड आणि शरीरावर लेपन केले जाते. त्यामुळे आगीच्या अस्तित्वात निर्जलीकरणाचा धोका निर्माण होत नाही. केरळ मधील लोककलांमधून तेथील भौतिक आणि मानसिक वास्तवाचे दर्शन घडते. या कलांचा प्रभाव इथल्या लोकमानसावर पडलेला आहे. सामाजिक स्थितीचा विचार करता हे लोककला प्रकार अतिशय शीघ्र गतीने बदलत आहेत.

संदर्भ :

  • Narayaṇappaṇikkar, Kavalaṃ, Folklore of Kerala, New Dehli, 1991.

भाषांतर : प्रकाश खांडगे