. एन. व्ही. कुरूप : (२७ मे १९३१ – १३ फेब्रुवारी २०१६).ओट्टापलक्कल नीलाकंगन वेलुकुरुप. प्रसिद्ध मल्याळम् कवी,गीतकार व पर्यावरणतज्ञ. ओ. एन. व्ही. कुरूप यांना भारतीय साहित्यातील उत्कृष्ट योगदानाबद्दल २००७ चा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. केरळमधील साहित्यात स्वच्छंदतावादी चळवळीचे ते प्रतिनिधी होत.कुरूप यांनी पुरोगामी लेखक म्हणून कारकीर्दीला सुरुवात केली आणि नंतर ते मानवतावादी लेखक म्हणून नावारूपाला आले. त्यांनी त्यांच्या समाजवादी विचारसरणीचा आणि तिच्याशी असणाऱ्या बांधिलकीचा अखंडपणे पुरस्कार केला.

केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील छावरा येथे काव्य,संगीताचे वातावरण असलेल्या परिवारात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांना संगीत आणि कथकली या नृत्याचा मोठा व्यासंग होता.घरामध्ये रामायणाची पारायणं होत असल्याने त्यांचा प्रभाव त्यांच्या लेखनावर पडला आहे. ओ. एन. व्ही. यांचे प्राथमिक शिक्षण छावरा गावीच झाले.लहानपणापासूनच त्यांना साहित्याची आवड होती.कोलमच्या श्री नारायण कॉलेजमधून पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पुढे तिरूवनन्तपूरमच्या विद्यापीठात त्यांनी मल्याळममध्ये उच्चशिक्षण घेतले.नंतर शिक्षणक्षेत्रातच १९५७ मध्ये एरनाकुलमच्या महाराजा कॉलेजात त्यांनी अध्यापन सुरू केले.प्रगतीवादी लेखक संघाचे अध्यक्ष (१९९३), साहित्य अकादमी, दिल्लीच्या कार्यकारिणीचे सदस्य, केरळमधील केरळ कलामंडळाचे अध्यक्ष (१९९६-२००१) अशी अनेक पदे त्यांनी भूषविली आहेत.

वडिलांच्या अकाली निधनाने बालपणीच एकाकीपण जाणवू लागले तेव्हा त्यांनी कवितेचा आधार घेतला आणि ते कविता लिहू लागले. स्वत:चे दु:ख,अवतीभवतीच्या समाजातील दु:ख,पर्यावरणाचा गंभीर प्रश्न,इतर देशातील अनुभव या साऱ्यांचा वेध घेत कुरूप यांनी काव्यलेखन,गीतलेखन केलेले आहे.१९४६ मध्ये लिहिलेली ‘मुनाटु’ ही त्यांची पहिली कविता. मल्याळममध्ये कुरूप यांची पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून त्यापैकी तीस काव्यसंग्रह आहेत.दाहीकन्ना पनपाथ्रम् (१९४६) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. मायिलपीलि, अक्षरम्’, भूमिक्कु, ओरू चरमगीथम्, मृगया, उज्जयिनी, स्वयंवरम्, दीनानाथम इ. प्रमुख काव्यसंग्रह आहेत.कुरूप यांच्या कविता सुरुवातीच्या काळात तत्त्वज्ञानाच्या अंगाने जाणाऱ्या होत्या व नंतर त्या जीवनातील निखळ आनंदाकडे वळल्या. मल्याळी बोलीभाषेमुळे त्यांच्या गीतांनी जनमानसाची पकड घेतली आहे.दैनंदिन जीवनातील प्रतिमा चित्रण त्यांच्या काव्यातून दिसते. वेदनेची छाया हे त्यांच्या कवितेचे व्यवच्छेदक लक्षण आहे.त्यांच्या कवितांत मल्याळी जनसामान्यांच्या चिंता, व्यथा आणि विद्रोहाच दर्शन घडतं. यामुळेच कदाचित त्यांना केरळचे राजकवी समजलं जातं.सामाजिक विषमतेविरुद्ध आपल्या कवितातून आवाज उठविण्याची प्रेरणा सुरुवातीपासूनच त्यांना मिळाली होती.ज्या छावरा गावात त्यांचे बालपण गेले.तेथील मिल मजुरांच्या कष्टाचे, दु:खी जीवनाचे दर्शन त्यांना घडले होते.फॅक्टरीतील मजुरांच्या दु:खाला जीवन संघर्षाला कवितेतून वाचा फोडण्याचा निर्णय तेव्हाच त्यांनी घेतला होता. यामुळे त्यांच्या मनातील सामाजिक परिवर्तनाची तीव्र इच्छा त्यांच्या सुरुवातीच्या कवितातून प्रकट झालेली दिसते.

‘उज्जयिनी’ आणि ‘स्वयंवरम्’ यासारख्या दीर्घ कवितांद्वारा त्यांनी मल्याळी कवितांना वेगळे वळण दिले. त्यांनी निवेदनाची नवी शैली विकसित केली.‘उज्जयिनि’ हे काव्य कुरूप यांच्या काव्यसाधनेचा उत्तम नमुना असलेले पुरस्कार प्राप्त दीर्घकाव्य आहे. ‘उज्जयिनि’ या कवितेत कवी कुलगुरु कालिदासाच्या व्यक्तिरेखेला वेगळ्या दृष्टिकोनातून व्यक्त करण्याचा प्रयत्न या कवितेत केला आहे. राज्याधिकारापेक्षा काव्याधिकाराचे महत्त्व अधिक मानणाऱ्या कालिदासाचे एक वेगळे रूप इथे शब्दबद्ध केले आहे. कालिदासाला समजून घेण्याची एक संधी त्यांनी वाचकांना दिली आहे.ययातिची मुलगी माधवीची कथा सांगत, स्त्रीचे स्वातंत्र्य आणि स्वनिर्णय क्षमतेचे महत्त्व, व्यक्त करणारे ‘स्वयंवर’ हे आख्यान काव्य आहे. महाभारतातील या कथेचा आधार घेत. कुरूप यांनी हे आख्यानकाव्य लिहिले आहे.‘मृगमा’ हे त्यांचे एक मिथकीय लघुकाव्य आहे. महाभारतातील पांडूच्या संदर्भातील एका घटनेवर हे लिहिले आहे. पांडुने मुनी किंदमनाचा वध केला. तेव्हा मरण्याअगोदर या मुनीने पांडुला शाप दिला की, कामातूर होऊन पत्नीजवळ गेलास की, तुला अकाली मृत्यू येईल. माद्रीने विरोध करूनही पांडूने ऐकले नाही आणि त्याचा मृत्यू ओढवला. या कथेच्या आधारावरच ‘मृगया’ काव्याची रचना आहे.

१९६० नंतर मात्र त्यांच्या कवितेत परिवर्तन झालेले दिसते.भारतावर चीनने आक्रमण केले आणि त्याचा परिणाम असा झाला की,साम्यवादी पार्टीचे विभाजन झाले.‘निगलेने कम्युनिस्टाकी’ या नाटकाद्वारे त्यांनी दक्षिण केरळात कम्युनिस्ट विचारसणीचा प्रसार केला. वर्गसंघर्ष मांडला. कुरूप यांनी १९७० च्या सुमारास, पर्यावरणाविषयीची जाणीव तीव्रपणे व्यक्त करणाऱ्या काही कविता लिहिल्या.पर्यावरण संरक्षण आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि या जन आंदोलनाला नव्याने स्फूर्ती दिली.‘नारसिसिण्टे कण्णुकल’ (नार्सिसचे डोळे), ‘मन्दिर मस्जिद’ ही कविता आजकालच्या धार्मिक संघर्षावर संकेत करणाऱ्या आहेत.अमेरिका, काबूल, रशिया इ. देशातील भेटी दरम्यान आलेल्या अनुभवावर लिहिलेल्या या कविता आहेत. न्यूयार्कच्या गल्लीमध्ये सर्कस दाखवून भीक मागणाऱ्या एका बांगलादेशीयाने आपल्या देशाचे नाव लपवून, त्या कार्यक्रमात ‘भारत के गरीब’ हे बॅनर लावले होते. यामागचे कारण न समजल्याने त्यांचे मन  विचलित झाले आणि त्यांनी  ‘भारत पुअर’ ही कविता लिहिली.ओ. एन. व्ही. हे कवितांपेक्षा गीतांमुळे लोकांच्या आठवणीत राहतील. २०० चित्रपटासाठी २०० गीते त्यांनी लिहिली आहेत. त्यांची अनेक गाणी देवराजन, दक्षिणामूर्ती, सलील चौधरी, रवी यांच्या संगीताचा साज घेऊन आली आणि लोकप्रिय झाली आहेत.

‘वैशाली’ या चित्रपटातील गाण्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे (१९८९). तसेच पद्मश्री, केरळ साहित्य अकादमी पुरस्कार, सोविएट लँड नेहरू पुरस्कार, वयलार पुरस्कार, नॅशनल फिल्म ॲवार्ड आणि ज्ञानपीठ पुरस्कार (२००७ ) इ.पुरस्कारांनी त्यांना गौरान्वित करण्यात आले आहे.

तिरुवनन्तपुरम येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :