रत्नागिरी जिल्ह्यातील पावसजवळील समुद्र किनारपट्टीलगत असलेला किल्ला. तो मुचकुंदी नदीच्या उत्तर तीरावर वसलेला आहे. हा किल्ला भूशिरावर ५० मी. उंचीवर बांधलेला असून तो खाडीच्या मुखाजवळ आहे. पूर्णगड गावातील महादेवाच्या मंदिराशेजारील पायवाटेने गडाकडे जाता येते.
गडाच्या मुख्य दरवाजाबाहेर हनुमानाचे मंदिर आहे. दरवाजा उत्तम बांधणीचा व पूर्णावस्थेत आहे. दरवाजावर द्वारशिल्प कोरलेले असून जांभा दगडात गडाचे बांधकाम केलेले दिसते. दरवाजावर चंद्र-सूर्य व मधोमध गणेशाची प्रतिमा आहे. दरवाजाच्या आत दोन्ही बाजूंस देवड्या बांधलेल्या आहेत. यांपैकी एका देवडीमध्ये दगडी पात्र ठेवलेले आहे. देवड्यांमध्ये दिवा लावण्यासाठी कोनाडे ठेवलेले आहेत. किल्ल्यात प्रवेश केल्यावर मोठी सपाटी व उजवीकडे ५ मी. उंचीवर बालेकिल्ला सदृश्य भाग दिसतो, पण तो बालेकिल्ला नाही. किल्ला उत्तर दक्षिण पसरलेला असून उत्तरेकडील भाग दक्षिणेकडील भागापेक्षा ५ मीटरने उंच आहे. मुख्य दरवाजाच्या कमानीतून पुढे गेल्यावर दुसरी कमान पार केल्यावर किल्ल्यात प्रवेश होतो. दुसऱ्या कमानीच्या आतील बाजूस दरवाजाच्या कमानीच्या भिंतीवर फुलाचे एक शिल्प कोरलेले आहे. दरवाजातून प्रवेश केल्यावर डावीकडे म्हणजेच दक्षिणेकडे एक समाधी असून त्यात दिवा लावण्याची जागा आहे. दरवाजाच्या उत्तरेकडील बांधीव पायऱ्यांच्या वाटेने तटबंदीवर जाता येते. दरवाजाच्या वरती मेघडंबरी असावी, असे तेथील अवशेषांवरून दिसते. तटबंदीवरून उत्तरेकडे गडाच्या सर्वोच्च भागात पोहोचता येते. गडावरील सर्व वास्तू या ठिकाणाहून दिसू शकतात.
महादरवाजातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच जुन्या बांधकामाच्या तीन जोत्यांचे अवशेष दिसतात. तसेच या जोत्यांमागे गडाची पश्चिमेकडील तटबंदी दिसते. या पश्चिमेकडील तटबंदीमध्ये भक्कम असा समुद्राकडे जाणारा दरवाजा बांधलेला आहे. दरवाजाशेजारील तटबंदीची भिंत कोसळलेली आहे. या दुसऱ्या दरवाजातून बाहेर पडून दरवाजाची बांधणी पाहता येते. सुंदर रेखीव चौकटीमधे बांधलेला कमानयुक्त दरवाजा अंदाजे १० फूट उंच आहे. या दरवाजामार्गे समुद्राकडे उतरता येते. दरवाजाच्या आतील बाजूस एकच देवडी आहे. दरवाजा पश्चिमाभिमुख बांधलेला असून पहिला म्हणजे मुख्य दरवाजा हा पूर्वाभिमुख बांधणीचा आहे. पश्चिमेकडील तटबंदी उत्तम असून फक्त सागरी दरवाजाजवळील थोडा भाग कोसळला आहे. किल्ल्यातील बांधकामाची जोती ही पश्चिमेकडील तटाजवळ आहेत. किल्ल्यात पिण्याच्या पाण्याची सोय नाही. मुख्य दरवाजाबाहेर मारुती मंदिराजवळ एक तलाव बांधलेला आहे. तेथूनच किल्ल्यामध्ये पाणीपुरवठा केला जात होता. किल्ल्यातून तोफा व बंदुकीचा मारा करण्यासाठी ठिकठिकाणी तटबंदीत व बुरुजात जंग्या आहेत. उत्तरेकडील तटबंदीला लागून एका राहत्या वाड्याचे अवशेष असून त्याच्या भिंती अजूनही उभ्या आहेत. दोन्ही दरवाजांच्या मधोमध एक मोठे बांधकामाचे जोते आहे. गडावरील कारभार पाहण्यासाठीची ही सदरेची जागा असावी. गडाच्या तटबंदीवर जाण्यासाठी तीन ठिकाणांवरून पायऱ्या बांधलेल्या आहेत. किल्ल्याच्या तटबंदीमध्ये एकूण सात बुरूज बांधलेले आहेत. २०१९ पासून किल्ल्याच्या जतन व संवर्धनाचे काम सुरू आहे.
कान्होजी आंग्रे यांनी १७२४ मध्ये पूर्णगड व जयगड हे दोन किल्ले बांधले, अशी माहिती शं. ना. जोशी यांनीआंग्रे शकावलीमध्ये दिली आहे. पेशव्यांच्या काळात सरदार हरबारराव धुळुप यांच्याकडे हा किल्ला होता (१७३२). त्यांनी गडावरील कारभारासाठी भोसले, गवाणकर, कनोजे, आंब्रे यांची नेमणूक केली होती. या लोकांचे वंशज किल्ले परिसरातील किल्लेकर वाडी येथे राहतात. १८१८ मध्ये पेशव्यांची सत्ता संपुष्टात आल्यानंतर किल्ला इंग्रजांकडे गेला.
किल्ल्याचे भौगोलिक स्थान पाहता हे मध्ययुगीन कालखंडात एक व्यापारी बंदर असण्याची शक्यता जास्त आहे. इंग्रजांच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यात तीन महत्त्वाची बंदरे होती ती म्हणजे रत्नागिरी, जयगड आणि पूर्णगड. या बंदरातून नारळ, भात, तेल, मीठ, मासे आणि गूळ यांचा व्यापार होत असे. पूर्णगड या बंदरातून मुंबई व कालिकत या बंदरांशी व्यापार होत असे. फातेमारी (१० ते ८० टन), शिबाडी (१०० ते २५० टन), तसेच काही वाफेवर चालणाऱ्या बोटी जयगड, रत्नागिरी आणि पूर्णगड बंदरात येत होत्या. वाफेवर चालणाऱ्या बोटी पूर्णगडच्या किनाऱ्याला लागत नसून काही अंतरावर समुद्रात नांगर टाकत असे. १८१९ साली पूर्णगड हे रत्नागिरी परिसरातील व्यापाराचे बंदर होते. १८६२ साली पूर्णगड किल्ल्याच्या तटबंदीची दुरुस्ती झाली होती. किल्ल्यामध्ये त्या वेळी सात तोफा आणि ७० तोफगोळे होते. त्या वेळी देखील पूर्णगड जवळून साटवलीपर्यंत बोटी जात होत्या. आदिलशाही कालखंडापासून मुचकुंदी नदीच्या खाडीतून साटवलीमार्गे कोल्हापूरपर्यंत व्यापार चालत असे.
संदर्भ :
- गोगटे, चिं. ग. महाराष्ट्र देशातील किल्ले (भाग – २), पुणे, १९०५.
- जोशी, शं. ना. आंग्रे शकावली, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे,१९३९.
- जोशी, सचिन विद्याधर, दुर्गजिज्ञासा, पुणे, २०१३.
- ढबू, दा. गो. कुलाबकर आंग्रे सरखेल, मुंबई, १९३९.
- रत्नागिरी आणि सावंतवाडी गॅझेटिअर, मुंबई, १८८०.
समीक्षक : जयकुमार पाठक